वंचितांचे संचित कुणाच्या पथ्यावर…..?

प्रकाश आंबेडकर आणि असुद्दीन ओवेसी यांनी दलित आणि मुस्लिम व्होट बँक बांधण्यासाठी युती केली आणि त्याला वंचित बहुजन आघाडी असे नाव दिले. खरंतर फक्त महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशात पाहिले तर तसे दलित आणि मुस्लिम समाज खूप मोठ्या प्रमाणात आहे. एवढी वर्षे काँग्रेसने काही मूठभर दलित आणि मुस्लिम समाजातील नेत्यांना हाताशी धरून ठेवले, त्यांना खूश केले आणि दलित, मुस्लिम जनतेला हिंदुत्त्ववाद्यांची भीती दाखवून ढीगभर मतं आपल्या पदरात पाडून घेतली. एवढी वर्षे काँग्रेसने जी सत्ता भोगली त्यात या समाजाचे योगदान नाकारता येणार नाही. मुस्लिम, दलित नेत्यांनी स्वतःच्या व्यक्तीगत राजकीय स्वार्थासाठी आपला समाज अशा पद्धतीने वेळोवेळी काँग्रेस सह इतर राजकीय पक्षांच्या दावणीला बांधला.

कालपर्यंत हे घडत होते आणि आजही हेच घडत आहे. आंबेडकर आणि ओवेसींनी सध्या जाहीर सभांचा धडाका लावला आहे. कधी म्हणतात स्वबळावर लढणार, तर कधी काँग्रेसकडे जागांची मागणी करतात. पण चर्चेला पुढे येत नाहीत. काँग्रेस नेत्यांनी अनेकदा आवाहन करूनही ते चर्चेला आले नाहीत. त्यामुळेच परवा पृथ्वीराज बाबा बोलले ते फार महत्त्वाचे आहे. त्याचा अर्थ आणि संदर्भ किती लोकांना समजला माहिती नाही. पण ते एकच वाक्य बोलले, पण फार महत्त्वाचे बोलले. ते म्हणाले की प्रकाश आंबेडकर जागांची मागणी तर करतात, पण चर्चेला येत नाहीत. त्यांना नक्की काय करायचेय तेच कळत नाही. त्यांचा नक्की अजेंडा काय आहे? असा प्रश्न त्यांनी केला. खरोखरच प्रकाश आंबेडकर आणि ओवेसी यांना काँग्रेस बरोबर आघाडीत सामील व्हायचे असेल तर मग ते वाटाघाटीला का बसत नाहीत? काँग्रेसकडे जागांची मागणी ही जाहीर सभांच्या व पत्रकार परिषदेच्या माध्यमातून कशी होऊ शकते? खरोखरच त्यांना आघाडीत यायचे असेल तर मग अनेकदा अशोक चव्हाणांनी आवाहन करून सुद्धा ते एका टेबलवर येऊन चर्चा का करत नाहीत?

यावरूनच त्यांचे इरादे स्पष्ट होतात की यांना फक्त मतांचे धार्मिक ध्रुवीकरण करून त्याचा फायदा हा भाजपाला मिळवून द्यायचा आहे. असेही प्रकाश आंबेडकर आणि ओवेसी यांची वंचित बहुजन आघाडी ही भाजपाचीच #B टीम असल्याची चर्चा प्रथमपासूनच होत आहे. आत्तापर्यंतच्या घडामोडी पाहता चर्चेला यांच्या वागण्यातून दुजोराच मिळत आहे. या दोघांच्याकडे ना कोणती सत्ता होती, ना आहे. मग यांच्या या ज्या मोठमोठाल्या इव्हेंट सभा होताहेत त्या कशाच्या आणि कुणाच्या बळावर होताहेत? यांना कोण रसद पुरवतेय? प्रकाश आंबेडकर आणि ओवेसी यांची महाराष्ट्रात अशी किती राजकीय ताकत अथवा वलय आहे? हे जे काही चालले आहे ते सर्व preplan चाललेले आहे.

ही सगळी राजकीय गणितं आहेत. यात बेरजा आहेत, वजाबाक्या आहेत. धार्मिक ध्रुवीकरणामध्ये हिंदूंच्या व्होट बँकेवर बऱ्यापैकी भाजपाने कब्जा केलेला आहे. काँग्रेसचा मुख्यत्त्वे जनाधार जो आहे तो म्हणजे सेक्युलर, मुस्लिम आणि दलित हा आहे. भाजपाने कितीही प्रयत्न केले तरी ते ही मतं स्वतःकडे वळवू शकत नाहीत आणि हे त्यांना माहिती आहे. त्यामुळेच त्यांनी आंबेडकर आणि ओवेसींनी एकत्र आणून त्यांच्या युतीचे वंचित बहुजन आघाडी असे नामकरण करून आपली #B टीम कामाला लावली.

यामध्ये ही मतं भाजपाला नाही मिळाली तरी काँग्रेस आघाडीला मिळू नयेत एवढा भाजपाचा प्रयत्न आहे. काँग्रेस आघाडीकडे जर दलित आणि मुस्लिम समाज वळला तर त्याचा थेट फायदा काँग्रेसला होऊन भाजपाला तोटा होऊ शकतो. ओवेसी आणि आंबेडकरांनी प्रयत्न करून २-३ जागा जरी निवडून आणल्या तरी त्यांच्या इतर उमेदवारांनी घेतलेल्या मतांच्यामुळे आघाडीच्या अनेकजणांची दांडी गुल होऊ शकते. निवडणूकीनंतर मग या कामगिरीबद्दल भाजपाचे सरकार आले की मग प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष यांचा मान राखला जाऊ शकतो. लोकसभा निवडणूकीत जर हा प्रयोग यशस्वी झाला, तर मग विधानसभा निवडणूकीत देखिल याची पुनरावृत्ती होऊ शकते. मोठ्या प्रमाणावर होऊ शकते. पहिल्यापासून हेच होत आले आहे. दलित आणि मुस्लिम नेते कधीच वंचित नव्हते. वंचित ही जनता राहिली. या नेत्यांनी आपापल्या समाजाच्या मतांचा सौदा करून स्वतःचा राजकीय स्वार्थ साधून घेतला. आता बघा की रामदास आठवले गेले ५ वर्षे केंद्रात मंत्री आहेत. आता आगामी निवडणूकीसाठी त्यांना सेना-भाजपाच्या कोट्यातून एक लोकसभा जागा हवी होती. ती मिळाली नाही की लगेच दलित समाजावर अन्याय झाल्याची ओरड त्यांनी सुरू केली. स्वतःच्या मंत्रिपदाचा फायदा त्यांनी किती समाज बांधवांना करून दिला? हा प्रश्न अनुत्तरितच आहे.

वंचित आघाडीला मैदानात उतरवून भाजपाने खरोखरच एक उत्तम राजकीय चाल खेळली आहे. त्याबद्दल त्यांचे कौतुक करायलाच हवे. कुणी काही म्हणो, पण मी याला एक राजकीय चातुर्य म्हणेन. एक मुत्सद्देगिरी म्हणेन. सध्याच्या राजकीय परिस्थितीचा अभ्यास करून, विरोधकांचे कच्चे-पक्के दूवे शोधून क्रिकेटच्या भाषेत ज्याला bouncer म्हणतात तो भाजपाने विरोधकांच्यावर टाकला आहे. त्यासाठी भाजपातील थिंक टँकचे अभिनंदनच करायला हवे. राजकारणात यश मिळवण्यासाठी अनेक आघाड्यांवर लढावे लागते. विरोधकांनी भाजपावर मोदी-शहा यांच्यावर टीका जरूर करावी. पण त्यांच्या राजकीय कौशल्याचा, मुत्सद्देगिरीचा अभ्यास देखिल करावा. प्रत्येक आघाडीवर ते विरोधकांना ज्या पद्धतीने मात देत आहेत यावर विरोधकांनी आपल्याला सुधारणेला किती वाव आहे हे समजून घ्यावे. पूर्ण ब्लॉग वाचल्यानंतर आतातरी तुमच्या लक्षात आले असेल की वंचितांचे संचित हे कुणाच्या पथ्यावर पडणार आहे.

आपले मत व्यक्त करा