सत्तेसाठी वाट्टेल ते…….

राजकीय पक्ष सत्तेसाठी वाट्टेल ते करायला तयार आहेतच पण मिडिया पण टीआरपी साठी वाट्टेल ते करत आहे. निवडणूका तोंडावर असताना कुणाची किती ताकत आहे? कोण किती नगरसेवक फोडतोय? कुणाची युती कुणाबरोबर होतेय? सगळी चर्चा आणि सगळ्या बातम्या अशाच फिरत आहेत. सेना-भाजपा जोरात, मनसेचे काही खरं नाही आणि काँग्रेस-राष्ट्रवादीचे नावच नाही. हेच रोज ऐकायला मिळतेय. या अशाप्रकारे बातम्या देताना मिडिया जागरूकपणे हे पाहत नाही की विकासाची दृष्टी कोणाकडे आहे? प्रत्येक पक्षाचे प्रगती पुस्तक मिडिया जनतेपुढे का मांडत नाही? प्रत्येक राजकीय पक्ष जाहीरनामा, वचननामा, वचकनामा जसा मांडतो तसा निवडणूकीला सामोरा जाताना आपले प्रगती पुस्तक का मांडत नाही? गेल्यावेळी तुम्ही जी आश्वासने दिली आणि सत्तेवर आलात, तर मग त्यातील किती पूर्ण झाली? याची विचारणा मिडिया का करत नाही?

गेली २५-३० वर्षे सेना-भाजपा युती जर मुंबई महापालिकेत सत्तेत आहे तरी अजूनही म्हणतात आम्ही विकास करू. भाजपा म्हणतेय रस्ते चांगले हवेत, आंतरराष्ट्रीय हवेत, गटारे तुंबायला नकोत, कामात पारदर्शकता हवी. हे असे बोलून तुम्ही तुमच्या निष्क्रियतेचा पाढाच वाचताय. ३० वर्षे सत्तेत असतानाही हे प्रश्न शिल्लक आहेत हेच तुमचे अपयश आहे. मग तुम्ही कोणत्या तोंडाने निवडणूकीला सामोरे जाणार? हे प्रश्न मिडीयाला का पडत नाहीत? का ते सेना-भाजपाच्या नेत्यांना विचारत नाहीत? वर्षानुवर्षे कर भरूनही मुंबईकरांच्या प्राथमिक गरजा का पूर्ण होत नाहीत? तरीही आता परत जनतेपुढे येणार मोदी यांचा फोटो दाखवणार आणि मतं मागणार. हो मोदी यांचा फोटो दाखवल्याशिवाय भाजपाला मतं देणार कोण?

मुंबईत आशिष शेलार, पुण्यात बापट यांच्याकडे पाहून यांना कोण मतदान करणार? नाशिकमध्ये कोण महाजन? यांच्याकडे पाहून यांना कोण मतदान करणार? यांचे काही सांगता येत नाही वेळ पडली तर ते पंतप्रधान असलेल्या मोदींना पण प्रचारासाठी बोलावतील. लोकसभा, विधानसभा, महापालिकेपासून ते नगरपालिका अगदी ग्रामपंचायत निवडणूकीत सुद्धा मोदी यांच्याच नावाचा वापर करतात. यांच्याकडे बघून कोण मतं देणारं? मुंबई महापालिकेत किती भ्रष्टाचार झालाय तो भाजपाच्याच आशिष शेलार आणि किरीट सोमय्या यांनी चव्हाट्यावर आणलाय. जर शेलार आणि सोमय्या बरोबर असतील तर मग सेना चुकीची आहे आणि सेना बरोबर असेल तर मग भाजपा खोटे आरोप करतोय असे समजायचे का? आणि तरीही युतीच्या वल्गना करता? लोकांना मूर्ख समजता? आत्तापर्यंत मुंबई, ठाणे महापालिका आपण दोघे भाऊ-भाऊ जे काही मिळेल ते वाटून खाऊ या न्यायाने धुवून खाल्ली आणि आता एकमेकांच्या विरोधात डरकाळ्या फोडताय. मधेच गळ्यात-गळे घालताय. फडणवीस माणूस म्हणून चांगले असले तरी महाराष्ट्राला त्याचा काय उपयोग? त्यांना स्वतंत्र विदर्भाचे पहिले मुख्यमंत्री होण्याचे डोहाळे लागले आहेत. माझे शब्द लिहून ठेवा या आगामी निवडणूका झाल्या की बघा स्वतंत्र विदर्भाचे आंदोलन कसे पेटतेय. सगळे बिनकामाचे मुद्दे काढायचे आणि त्यात सर्वांना गुंतवून खल करत बसायचे हेच यांचे धंदे. यात कसला जनतेचा विकास? कुठे दिसतोय विकास? जो तो आपल्या वतनदारीसाठी भांडतोय. ३० वर्षे ज्यांनी अविरत सत्ता भोगली ते मनसेला नाशिकमध्ये ५ वर्षात काय केले विचारत आहेत. अरे विचारता कशाला? जाऊन बघा नाशिकला काय विकास झाला ते लगेच कळेल. नाहीतर एखादी मॅनेज न होणारी संस्था गाठा त्यांना सर्व्हे करायला सांगा ते वस्तुस्थिती स्पष्ट करतील. उगीच हवेत गोळ्या मारू नका. मतदान लोकं करणार आणि मिडिया सांगणार काय कुणाची हवा आहे? कुणाची सरशी होणार? तुमचे काम आहे बातम्या देण्याचे तेवढ्या द्या बाकी सगळं जनतेवर सोडा. तुम्ही तुमची मतं जनतेवर लादू नका. सत्तेतून पैसा, पैशातून सत्ता या दलदलीत तुम्ही सुद्धा स्वतःच्या तुंबड्या भरून घेताय हे काय लोकांना कळत नाही? रात्रभर तुमचे कॅमेरे कुठे चार्ज होतात आणि मग दिवसभर तुम्ही कुणाच्या नावाने बोंब ठोकता, ये पब्लिक है सब जानती है.

किशोर बोराटे.

आपले मत व्यक्त करा