महाराष्ट्र सैनिकांचा विचार करा.

प्रत्येक राजकीय पक्षाची स्वतःची अशी एक रणनिती असते. त्यानुसार त्यांची राजकीय वाटचाल चालू असते. मनसेने पण आगामी निवडणुकीसंदर्भात त्यांनी त्यांची काही रणनिती आखली असणार. ती त्यांनी केंव्हा जाहीर करायची हा त्यांचा पक्षीय अधिकार असला तरी राजकारण हे एक टीमवर्क आहे. पक्षाचे लाखो कार्यकर्ते पक्षाच्या निर्णयाची वाट पाहत असतात. परिस्थिती पूर्वीसारखी राहिली नाही. राजकारणात आता जीवघेणी स्पर्धा चालू आहे. लोकसभा निवडणूका तोंडावर आल्या असताना आणि इतर पक्ष आपापल्या युत्या आणि आघाड्या जुळवत असताना मनसेत मात्र कमालीचा संथपणा दिसून येत आहे. ना मनसेप्रमुख काही स्पष्ट बोलत आहेत, ना मनसे नेते काही स्पष्टपणे बोलत आहेत. मनसेतले कोणी बोलत नाही. पण मनसे विषयी मात्र सगळेच बोलत आहेत.

शरद पवार अगोदर सर्वांना एकत्र येण्याचे आवाहन करतात. त्यात मनसेपण आमच्याबरोबर आहे असे म्हणाले. नंतर परत ते बोलले की काही मुद्द्यावर आम्ही बरोबर आहोत, पण याचा अर्थ असा नाही की निवडणूक एकत्र लढवू. परत अजितदादा बोलले की मनसेची राज्यात लाखो मतं आहेत आणि त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही असे म्हणून त्यांनी परत राज यांची भेट घेतली. तिकडून अशोक चव्हाण यांनी प्रथमपासूनच #न चा पाढा लावला होता. मधेच भाजपाचे आशिष शेलार आणि अगदी परवा परवा विनोद तावडे यांनी राज यांची कृष्णकुंजवर वेगवेगळी भेट घेतली. मिडिया वेळोवेळी मनाला येईल तशा बातम्या देत आहे. आता शरद पवार यांचे राजकारण राज यांना माहिती नाही असे बोलणे मूर्खपणाचे ठरेल. राज यांनी आत्तापर्यंत अनेकदा जाहीर सभांच्या माध्यमातून शरद पवार, अजितदादा यांचा अगदी ठाकरी शैलीत समाचार घेतला आहे. ते पवार कुटुंबाला ओळखून आहेत. त्यामुळे त्याबाबत राज यांना कुणी सल्ला देण्याची आवश्यकता नाही.

या सर्व पार्श्वभूमीवर मनसेप्रमुख आणि मनसे नेते मात्र गप्प आहेत. अजूनही भूमिका स्पष्ट करायला तयार नाहीत. लाखो महाराष्ट्र सैनिक पक्षाच्या निर्णयाकडे डोळे लावून बसलेत. पण पक्ष अद्याप भूमिका स्पष्ट करत नाही ही त्यांची खंत आहे. कुणाशी युती, वा आघाडी करायची हा विषय नंतरचा आहे. पण आम्ही १००% निवडणूका लढवणार आहोत, एवढे जरी स्पष्ट केले असते तरी महाराष्ट्र सैनिकांच्यात उत्साह संचारला असता. इतर पक्षाचे नेते, मिडिया पक्षाविषयी उलट-सुलट बोलत असताना किमान कार्यकर्त्यांना स्पष्टता यावी म्हणून तरी भूमिका स्पष्ट करणे गरजेचे आहे. पक्षाबाबत स्पष्टता देणे ही पक्षाची जबाबदारी आहे आणि ती जाणून घेणे हा त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचा अधिकार आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मनसेबाबत परस्परविरोधी विधाने करून मनसेचे जनतेत devaluation करत आहेत. यामध्ये पक्षाची विश्वासार्हता पणाला लागली आहे. याची जबाबदारी मनसेची आहे. एवढे ट्रोलिंग होत असताना त्यांनी पुढे येऊन आपली भूमिका महाराष्ट्रातील जनतेपुढे आणि महाराष्ट्र सैनिकांच्या समोर मांडणे महत्त्वाचे होते.

इतर पक्षाच्या नेत्यांनी काहीही बोलून आणि मनसेने न बोलून आपली विश्वासार्हता स्वतःच धोक्यात आणली आहे. पुढचा चुकीचा आहे हे जेंव्हा तुम्ही ओरडून सांगत असता, तेंव्हा मी कसा बरोबर आहे हे दाखवून देणे ही तुमची जबाबदारी असते. आज तुम्ही जेंव्हा मोदी सरकार विरोधात भूमिका घेता, त्यांचे अपयश जनतेपुढे आणि आपल्या कार्यकर्त्यांच्या समोर मांडता, त्यावेळी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी आणि ती अत्यंत महत्त्वाची आहे. मोदी सरकार पासून मतं तोडणे हा एक भाग झाला. पण तुटलेली मतं आपल्याकडे यायला हवीत हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यासाठीची म्हणून काही रणनिती पक्षाकडे आहे का? नाहीतर तुम्ही विरोध करायचा, सरकारचे failure जनतेसमोर मांडायचा. समजा जनतेलाही ते पटले तरी ते मतदान तुमच्याकडे वळायला हवे. नाहीतर कष्ट तुम्ही करणार आणि त्याचा फायदा इतर विरोधी पक्षांना होणार. महाराष्ट्र सैनिक आज महाराष्ट्राच्या प्रत्येक काना-कोपऱ्यात आहेत. त्यांना तुम्ही त्यांच्या हक्काचा उमेदवार देणार आहात काय? एकहाती सत्ता मागताना त्याप्रमाणात सर्व जागा तरी लढवायला हव्यात. तेवढी आपली संघटनात्मक बांधणी सक्षम आहे का? असे अनेक मुद्दे आहेत ज्यावर पक्षाला भूमिका घ्यायला लागणार आहे. पक्षाने एक समर्थ पर्याय बनून पुढे यायला हवे. निवडणूक लढवण्याबाबत पक्ष confirm असण्याऐवजी confuse असल्याचाच संदेश या निमित्ताने जनतेत जात आहे. समोरील चारही पक्ष हे तगडे पक्ष आहेत. त्यांचे आव्हान मोठे आहे. त्यांनी कधीच प्रचाराला सुरुवात देखिल केली. अशा परिस्थितीत त्यांच्याशी दोन हात करायचे म्हणजे आपली केवढी पूर्वतयारी हवी? पण याचा पक्ष विचार करतो की नाही तेच समजत नाही. राजकारण हे आपल्या कलाने चालत नाही.

मनसेचे नशीब चांगले आहे की, राज यांच्याकडे अजूनही महाराष्ट्रातील लाखो तरुणांची फळी खंबीरपणे त्यांच्या मागे उभी आहे. कोणतीही अपेक्षा न ठेवता लाखो महाराष्ट्र सैनिक आज मनसेचा झेंडा खांद्यावर घेऊन काम करत आहेत. राज जेथे जातील तेथे प्रचंड गर्दी जमते. ती बोलवावी लागत नाही. एकीकडे इतर पक्षाच्या नेत्यांच्या सभेला गर्दी जमवता जमवता कार्यकर्त्यांच्या नाकीनऊ येते. तर इथे राज यांनी कुठेही सभा असो तिथे लाखोंची गर्दी जमा होते. ही लोकं घरी वेळ जात नाही म्हणून येत नाहीत. त्यांच्या तुमच्याकडून काही अपेक्षा आहेत. त्या ओळखून त्या पूर्ण करण्याच्या दिशेने प्रयत्न व्हायला हवेत. हे सत्तेशिवाय शक्य नाही. पण सत्ताही संघटना शिवाय शक्य नाही. तुमच्याकडे भक्कम संघटन असेल, तुमच्याकडे व्हिजन असेल तर सत्ता झकमारत तुमच्याकडे येईल. पण त्यासाठी पक्ष नेतृत्त्व, पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते यांच्यात योग्य तो समन्वय आणि एकी हवी. संघटीतपणा नसेल तर विस्कळीतपणा येईल. विस्कळीतपणा असेल तर यश कोसो दूर आहे असे समजा. पक्ष कोणताही असो हे नियम सर्वांना लागू आहेत. नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी एकमेकांच्यात योग्य समन्वय ठेवायलाच हवा. एकी नसेल तर त्याचा पक्षाला तोटा होईल. पक्ष मोठा झाला तरच नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना मोठेपणा मिळेल. एकमेकांचे पाय ओढत बसलो तर सगळेच जमिनीवर रांगत बसू. व्यक्तिगत महत्त्वकांक्षा ही संघटनेला मारक असते. याची जाण सर्वांनी ठेवायला हवी. मतभेद विसरून सर्वांनी एकीने काम केले तरच यश मिळेल. नाहीतर पडीक पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते म्हणून किती दिवस असेच काढणार? तुमच्यात जर बदल झाला नाही तर लोकं तुम्हाला बदलतील. राजकीय महत्त्वकांक्षा कुणाला स्वस्थ बसू देत नाही. आजच्या काळात कार्यकर्ता टिकवणे हे राजकीय पक्षापुढील सर्वात मोठे आव्हान आहे. जाणारे सगळेच कावळे नसतात. काहीच सकारात्मक घडत नसेल तर ते तरी किती दिवस वाट पाहणार?

आज महाराष्ट्र सैनिक एवढ्या प्रतिकूल परिस्थितीत पण ते निष्ठेने किल्ला लढवत आहेत. मग ती लढाई रस्त्यावरची असो, अगर विषय सोशल मीडियावर बाजू मांडण्याचा असो. ते निष्ठेने आणि प्रामाणिकपणे बाजू मांडत आहेत. काही वर्षांपूर्वी कुणी पक्षाच्या विरोधात बोलले तर थेट शिव्या घालणारे महाराष्ट्र सैनिक आता समर्थपणे आणि अभ्यासू वृत्तीने पक्षाची बाजूनं मांडताना विरोधी पक्षांचे अपयश जनतेसमोर आणत आहेत. आता परिस्थिती नेमकी उलट झाली आहे. पूर्वी शिव्या देणारे आता अभ्यासूपणे आपली बाजू मांडताना समोरच्याचे अपयश जनतेसमोर आणत आहेत आणि समोरच्यांना सत्ता असूनही आपण काय केले हे सांगता येत नसल्याने ते व्यक्तिगत टीका करताहेत. खरंच मनसे नेतृत्त्वाने आणि नेत्यांनी महाराष्ट्र सैनिकांना संघटित करून ही ताकत बरोबर घेऊन नियोजनबद्ध काम केले तर त्यांना निश्चितच यश मिळेल. गरज आहे ती संघटनात्मक पातळीवर काम करण्याची आणि वेग घेण्याची गरज आहे.

11 comments

 1. जय मनसे मित्रांनो हा जो लेख लिहिला तो अगदी उत्तम आहे. आपल्या पक्षात पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक हे पूर्णपणे राजसाहेबांवर अवलंबून आहे.का साहेब काहीतरी चमत्कार करतील व आपले राजकारण सोपे होईल आपण जो पर्यंत ग्राउंड लेव्हलला जोमाने काम उभे करत नाही जनमानसात आपल्याला तो पर्यंत मानसन्मान भेटणार नाही कोणत्याही पक्षाकडे नाही असे सर्वगुणसंपन्न नेतृत्व अपल्याला लाभले आहे प्रत्येक मनसे पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिकांकडे एक स्वतःसाठी चे ध्येय पाहिजे तेव्हा खरी मनसे तळागाळा पर्यंत पोहचेल धन्यवाद जय मनसे

 2. मित्रा, माफ कर पण तुझ म्हणणे मला योग्य वाटत नाही. कारण अस की आपण जर राज साहेबांवर विश्वास ठेवता तर तो विश्वास पूर्णपणे असुदेत. राज साहेब नेहमी म्हणतात की समोरच्याला जितके खेळायचे तेवढे खेळू द्यावे मग आपण आपला जलवा दाखवायचा. आत्ता सर्व कुत्री एकमेकांवर भुंकतायत, त्यांना भुकु द्या. ज्यावेळी राजसाहेब उत्तर भारतीयांच्या मंच वर जाणार होते तेव्हा सुद्धा सर्व जण असेच भुंकत होते. त्यावेळीही राज साहेबांनी सर्व मराठी माणसांना पटेल अशीच भूमिका घेतली. तेव्हा आताही त्याच्यावर विश्वास ठेवा आणि धीर धरा थोडा. ते योग्य तोच निर्णय घेतील जो पक्षाच्या आणि देशाच्या हिताचा असेल. निवडणूक म्हणजे पैशाचा खेळ सर्व जमून यायला हव… निर्णय कसा ही असो आपण त्याच्या मागे खंबीर पणे उभ रहायला हव

 3. आज हा ब्लॉग लिहून 25 दिवस झालेत तरी परिस्थिती तीच आहे त्यात बदल काहीच नहीं..निवडणुका ही राजकीय पक्षांचा आत्मा असते आणि तोच तुम्ही काढून घेतला तर कार्यकर्ते दुसर घर शोधतात.जर निवडणूक लढायची नव्हती तर आधीच स्पष्ट करायला पाहिजे होत जेणेकरून कार्यकर्त्यांना मनस्ताप झाला नसता .आपल्या राजसाहेब ना जर राष्ट्रवादी योग्य वाटतं असेल तर कार्यकर्त्यांनी आता राष्ट्रवादी मध्ये प्रवेश करा असे सल्ले मिळतात आणि हेच पवारांना हवं तर नसेल कारण ते बोलतात काय आणि करतात वेगळंच..अशाच धरसोड वृतीमुळे आता विधानसभेत पण यश मिळणे अवघड आहे आणि हे विरोधक अशाच प्रकारे वातावरण तयार करतील .शरद पवारांचा स्वतःचा पक्ष आहे ते काय आपल्या पक्षाला मदत करायला आणि स्वतःच नुकसान करून घेणार नाहीत ..त्यांच्यावर जास्त विश्वास ठेऊ नये..लोकसभा जर लढत नसाल तर शांत बसा कुठलाही क्रांतिकारी निर्णय घेण्याची गरज नाही..कही देश खड्ड्यात नाही चालला.देशहित साठी आपण मोदींना विरोध आणि राष्ट्रवादी ल पाठिंबा असला काहीतरी वेगळं राजकीय वेगळं पण दाखवायची कही गरज नाही..

 4. आज हा ब्लॉग लिहून 25 दिवस झालेत तरी परिस्थिती तीच आहे त्यात बदल काहीच नहीं..निवडणुका ही राजकीय पक्षांचा आत्मा असते आणि तोच तुम्ही काढून घेतला तर कार्यकर्ते दुसर घर शोधतात.जर निवडणूक लढायची नव्हती तर आधीच स्पष्ट करायला पाहिजे होत जेणेकरून कार्यकर्त्यांना मनस्ताप झाला नसता .आपल्या राजसाहेब ना जर राष्ट्रवादी योग्य वाटतं असेल तर कार्यकर्त्यांनी आता राष्ट्रवादी मध्ये प्रवेश करा असे सल्ले मिळतात आणि हेच पवारांना हवं तर नसेल कारण ते बोलतात काय आणि करतात वेगळंच..अशाच धरसोड वृतीमुळे आता विधानसभेत पण यश मिळणे अवघड आहे आणि हे विरोधक अशाच प्रकारे वातावरण तयार करतील .शरद पवारांचा स्वतःचा पक्ष आहे ते काय आपल्या पक्षाला मदत करायला आणि स्वतःच नुकसान करून घेणार नाहीत ..त्यांच्यावर जास्त विश्वास ठेऊ नये..लोकसभा जर लढत नसाल तर शांत बसा कुठलाही क्रांतिकारी निर्णय घेण्याची गरज नाही..कही देश खड्ड्यात नाही चालला.देशहित साठी आपण मोदींना विरोध आणि राष्ट्रवादी ल पाठिंबा असला काहीतरी वेगळं राजकीय वेगळं पण दाखवायची कही गरज नाही.

 5. किशोरभाऊ, पक्षातील सर्व स्तरावरील पदाधिकारीना tag केल पाहिजे असा हा ब्लॉग आहे. तुम्ही मांडलेल्या मुद्दयांना टाळून विचारच करता येणार नाही.
  मी माझ्या फेसबुक पेज निष्ठावंत नवनिर्माणाचे ! वर share करतो.

  पक्षाने या ब्लॉग वरील मुदयांचा विचार करावा आणि आपली निवडणूक विषयी भूमिका स्पष्ट करावी.

 6. किशोर सर तुमच्या ब्लॉगची लिंक MNS Adhikrut आणि Raj Thackeray या दोन्ही अधिकृत पेजेसवर शेअर करा.

 7. अगदी समर्पक लेख आहे.मला वाटत प्रत्येक महाराष्ट्र सैनिकाला अपेक्षित असे मत आहे….

 8. यात काही चुक कार्यकर्त्यांची देखील आहे. एखादा कार्यक्रम असला की त्यासाठी त्यांना राज साहेबच हवे असतात. त्याऐवजी मनसेच्या नेत्याला बोलवून, त्याला भाषण करायला लावले पाहिजे. त्यामुळे पक्षातील नेत्यांची सुद्धा मोठी आयडेंटिटी तयार होईल. पण सध्या परिस्थिती अशी आहे की, राजसाहेब प्रचंड मोठे झाले आहेत आणि त्यामानाने नेते थोडे लहान राहिले आहेत.
  म्हणूनच इथे नेत्यांनी झपाटून कामाला लागले पाहिजे. पक्षाची भूमिका नेत्यांना माहित असते. त्यांनी स्वतंत्र प्रचार दौरे केले पाहिजेत आणि ती भूमिका कार्यकर्तेच नव्हे तर सामान्य माणसाला देखील पटवून दिली पाहिजे.
  तरच #नवनिर्माण शक्य आहे.

आपले मत व्यक्त करा