राजने दोस्ती की है ,चापलूसी नही की….

raaj

मैं सोचके बोलता हूं, बोलके सोचता नही.

राज ठाकरे जे बोलतात ते विचार करून बोलतात, एकदा बोलल्यानंतर त्यावर परत ते विचार करत नाहीत. काल-परवा किंवा यापूर्वीही त्यांनी मोदी यांच्यावर जेंव्हा-जेंव्हा टीका केली, तेंव्हा-तेंव्हा भाजपा नेत्यांचे पित्त खवळले. कारण राज रोज उठ-सूठ बोलत नाहीत, पण जेंव्हा बोलतात तेंव्हा देशभरातला मीडिया त्याची ब्रेकिंग न्यूज दाखवून आपला TRP वाढवून घेते. त्यामुळे भाजपा नेत्यांच्याकडून त्याला लगेच प्रतिउत्तर दिले जाते. लोकशाही मध्ये विरोधकांची टीका ही गांभीर्याने घ्यायची असते किंवा नसते हे टीका कोण करतेय त्यावर अवलंबून असते. त्यात खरोखर काही तथ्य असेल, टीका सकारात्मक असेल आणि त्यातून काही सुधारणा होणार असतील तर त्या निश्चितपणे सरकारच्याच पथ्यावर पडतात. पण सत्तेच्या धुंदीत असलेल्या भाजपा नेत्यांना याचा विसर पडलेला आहे. सत्तेच्या केंद्रस्थानी असलेल्यांना आपल्या चूका जरी दिसत नसल्या तरी बाहेर उभे राहून तुमचे निरीक्षण जो करत असतो, त्याला त्या चूका दिसत असतात, म्हणून त्याकडे दुर्लक्ष करायचे नसते. पण भाजपा नेते सध्या वेगळ्या मूड मध्ये आहेत. सत्तेची मस्ती आणि मोदींची स्तुती यामधून ते वास्तव जगात यायला तयार नाहीत. ते मोदींच्यावरील टीका सहन करू शकत नाहीत. ते करण्याशिवाय त्यांना पर्याय पण नाही, कारण मोदी कृपेनेच त्यांना सत्ता मिळाली आहे. त्यामुळे त्यांना मोदी यांचा उदो-उदो करायलाच हवा. पक्षशिस्तीचा भाग म्हणून ते ठिकही आहे. पण दुसऱ्या कोणी टीका केली तरी सहन करायची नाही, त्याला वेड्यात काढायचे, देशद्रोही ठरवायचे हे म्हणजे अति होतेय. मोदींची स्तुती ऐकून घेता मग टीका केली तर त्यातील तथ्य स्विकारून बदल करा ना. किमान टीका कोण करतेय हे ही महत्त्वाचे आहे ना. भाजपा आणि मीडिया म्हणतेय की कालपर्यंत राज मोदींची स्तुती करत होते आणि आज टीका करताहेत. अगोदर दोस्ती केलीत आणि आता टीका असे का? पण एक गोष्ट लक्षात घ्या. दोस्ती केली, स्तुती केली म्हणजे पुढच्या व्यक्तीच्या चूकाच दाखवायच्या नाहीत का? राज यांनी “दोस्ती की है, चापलूसी नही की.” राज यांनी सुरुवातीलाच स्पष्ट केले की मोदी यांनी सत्ता हातात घेतली त्यानंतर जवळ-जवळ एक ते सव्वा वर्ष मी काहीही बोललो नव्हतो. नवीन आहेत थोडा अवधी मिळायला हवा. आजही माझी अपेक्षा एकदम सगळ्या गोष्टी घडायला हव्यात अशी नाही. पण आता दोन वर्ष होत आली सत्ताबदलाचे काहीतरी सकारात्मक परिणाम सर्वसामान्य माणसाच्या, शेतकऱ्यांच्या आयुष्यात दिसायला हवेत ना? प्रचारादरम्यान शेतकऱ्यांच्या समस्याबद्दल भरभरून बोलणारे मोदी आता शेतकऱ्यांच्या बाबत काहीही बोलत नाहीत.

raaj modi

तुमचे परदेश दौरे गाजले. देशात गुंतवणूक वाढावी म्हणून तुम्ही एवढे दिवस परदेशात घालवलेत. त्याचा काय फायदा झाला? किती कंपन्या आल्या? फक्त करोडो-अब्जावधीचे करार झाल्याचे सांगितले पुढे काय? दोन वर्षात सगळे नाही होणार पण सुरुवात तरी झाली आहे का? की फक्त सगळे कागदावरच आहे? झाली असेल सुरुवात तर जनतेला, आम्हाला कळू तरी द्या?रोज लोकांना नवीन स्वप्न दाखवत आहात, पण अगोदर जी दाखवली त्यातील किती पूर्तता झाली किंवा होण्याच्या मार्गावर आहेत हे लोकांच्यासमोर येऊ द्या. ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याचे निश्चित कौतुक करू. मागे व्हायब्रण्ट गुजरात असा मोठ्या थाटा-माटात कार्यक्रम घेतला त्यातही मोठंमोठे करार झाल्याचे सांगितले त्याचे काय झाले पुढे? त्यातली किती कामं चालू झाली? झाली असतील तर जनतेला कळू द्या. आताही स्टार्ट-अप-इंडिया, मेक इन इंडिया यातही काही लाख कोटींचे करार झाले असे सांगण्यात आले. काही दिवसांनी का होईना पण हे प्रत्यक्ष कृतीत आलेले दिसायला हवे. हे सगळे नुसते कागदावर नको. कागदावरच्या “अच्छे दिना “मुळे लोकांना “अच्छे दिन” येणार नाहीत. पाकिस्तान बाबत पहिल्या सरकार प्रमाणेच बोटचेपी भूमिका आहे. सीमेवर रोज जवान शहीद होत आहेत. शेतकरी ओरडताहेत, उद्योपती ओरडताहेत हे काय एकटे राज ठाकरे बोलत नाहीत.

सत्तेच्या धुंदीत असलेल्या भाजपाच्या नेत्यांना लोकांचे हे ओरडणे ऐकू जात नाही यावर विश्वास कसा ठेवायचा? भाजपा नेत्यांनी राज यांच्यावर तोंड टाकण्यापेक्षा स्वतःचे आणि सरकारचे कुठे चुकते आहे का हे पाहावे. JNU प्रकरणी राज यांनी स्पष्ट सांगितले जे देशविरोधी घोषणा देत आहेत त्यांना चांगले फोडून काढा. कुणालाही सोडू नका. सगळे मोदी सरकारच्या विरोधी गळा काढत होते तरी राज यांनी मोदी सरकारच्या बाजूने स्पष्ट भूमिका घेतली. अजून काय करायला हवे? ही राष्ट्रवादीच भूमिका आहे. सेक्युलर किंवा हिंदूत्त्वाची तुमची व्याख्या सर्वमान्य होऊ शकत नाही. मुसलमानांना शिव्या घातल्या म्हणजे तुम्ही हिंदुत्त्ववादी झालात ही व्याख्या कुणाला मान्य नाही. मोदींनाही ती अपेक्षित नसावी. आज देशातील सर्वच मुस्लिमांच्या देशभक्तीवर संशय घेणे मूर्खपणा आहे. जो देशाचा दुश्मन तो आमचा दुश्मन मग तो हिंदू असो अगर मुसलमान ही ठाकरे घराण्याची भूमिका आहे. मीडिया “ध” चा “मा” करते भूमिकेविषयी स्पष्टता दाखवत नाहीत. राज यांची भूमिका स्पष्ट आहे फक्त वातावरण निर्मिती नको कामं व्हायला हवीत, ती लोकांना दिसायला हवीत. दुटप्पी भूमिका नको इकडे अफझल गुरूच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या म्हणून देशद्रोहाचे खटले भरायचे आणि तिकडे अफझल गुरुची फाशी रद्द व्हावी म्हणून काश्मीर विधानसभेत ठराव मांडणाऱ्या पीडीपी बरोबर सत्तेत भागीदारी करायची सगळ्यांना एकाच न्यायाने वागवा. राज यांनी उपस्थित केलेले मुद्दे दुर्लक्षित करता येणार नाहीत. शेवटी तुम्ही कितीही इव्हेंट करा, स्वप्न दाखवा लोकांना कामं दिसली नाहीत. तर ज्या लोकांनी तुम्हाला निवडून दिले आहे तीच लोकं तुम्हाला पाडणार. लोकांनी इंदिरा गांधींनाही पाडले होते. हा इतिहास विसरून चालणार नाही. विकासाच्या मुद्द्यावरून दुसरीकडे लक्ष हटवण्यासाठी धार्मिक वाद नियोजनबद्ध उभे केले जात आहेत. हा आरोप मोदी सरकारसाठी त्रासदायक होऊ शकतो. हा जो इशारा राज यांनी दिला आहे त्याकडे दुर्लक्ष करणे भाजपासाठी आत्महत्या ठरेल. जेष्ठ नेते शरद पवार साहेबांनीही असेच मत व्यक्त केले आहे. जी कामं झाली आहेत ती लोकांच्यापर्यंत पोहोचली पाहिजेत. शेतीप्रधान देश आहे मग देशात शेतकऱ्यांचे हाल का? त्यासाठी शेती धोरण कोण ठरवणार? शेतीप्रधान देशात शेतकऱ्यांसाठी वेगळे “शेती बजट” (कृषी बजट) का नाही? शेतकऱ्याला दर्जेदार बि-बियाने, खते, त्यांच्या मालाला योग्य भाव, पाणी बाजारपेठ, दुधाला योग्य भाव या गोष्टी शेतकऱ्यांसाठी कोण करणार?

click here to buy

या सर्व गोष्टींवर काम होत आहे की नाही कळायला मार्ग नाही. या देशातला सगळ्यात जास्त मतदार हा सर्वसामान्य माणूस आणि शेतकरी आहे. त्यांच्यासाठी काम व्हायला हवे. मोदी सरकार कॉर्पोरेट क्षेत्रासाठी जास्त काम करतेय अशी शेतकऱ्यांची भावना झाली आहे किंवा विरोधकांनी ते केली आहे. पण गंमत अशी आहे की शेतकरीही ओरडत आहेत आणि उद्योजक ही ओरडत आहेत. परवा रतन टाटा यांनीही सरकारवर टीका केली. सरकार फक्त बोलतेय करत काहीच नाही. सरकार आणि भाजपा नेते यांनी या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. झालेली कामं आणि प्रस्तावित कामं लोकांच्यापर्यंत पोहोचली पाहिजेत. राज यांनी टीका केली म्हणून नाकं मुरडणाऱ्यांनी आणि राज- मोदी दोस्तीचा वास्ता देणाऱ्यांनी हे लक्षात घ्यावे की, सगळ्यांनीच चापलूसी करून चालणार नाही, चूका दाखवणारं सुद्धा कोणीतरी हवं. चापलूसी करणं राज यांच्या रक्तात नाही. “राजने दोस्ती की है, चापलूसी नही.”

किशोर बोराटे.

आपले मत व्यक्त करा