मर्यादेचे बंध तोडावे लागतील

मर्यादेचे बंध तोडावे लागतील

mns

नाशिक दौऱ्यात राजसाहेब ठाकरे यांनी एक महत्त्ववाची घोषणा केली ती म्हणजे आगामी काळात येणाऱ्या १० महानगरपालिका निवडणूका महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्ण ताकतीने लढेल. त्यामुळे कार्यकर्त्यांच्यात उत्साहाचे वातावरण आहे. कारण पक्ष स्थापनेनंतर मनसेने मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिक अशा काही मोजक्याच निवडणूका लढवल्या. काही नगरपालिका, ग्रामपंचायतीच्या निवडणूका कार्यकर्त्यांनी लढवल्या पण त्या स्थानिक पातळीवर निर्णय घेऊन लढवल्या. बाकी गेल्या १० वर्षात पक्ष मुंबई, पुणे, ठाणे आणि नाशिक पर्यंतच मर्यादित राहिला. कार्यकर्ते महाराष्ट्रात सर्वदूर शहरापासून ते खेड्यापर्यंत अगदी वाड्या-वसत्यापर्यंत आहेत. पण पक्षात आणि त्यांच्यात योग्य समन्वय नसल्याने ते दिशाहीन झाले आहेत. पदाधिकारी आहेत पण त्यांनाही पक्षाकडून काही मार्गदर्शन नसल्याने मिळालेल्या पदाचा वापर पक्षवाढीसाठी कसा करावा या विवंचनेत ते सापडले आहेत. पक्ष स्थापनेनंतर इतर पक्षातील काही नेत्यांनी राज यांना भेटून पक्षात प्रवेश करण्याविषयी इच्छा व्यक्त केली असे मीडियातून वाचायला मिळाले पण प्रत्यक्षात असे काही किरकोळ अपवाद वगळता पाहायला मिळाले नाही. त्यामुळे नवीन पक्ष, नवीन कार्यकर्ते यांची वाटचाल तशी संथच राहिली. सुरुवातीचा जो झपाटा होता तो टिकवता आला नाही. पहिल्याच विधानसभेत मुंबई, पुणे, आणि नाशिक इथे भरघोस यश मिळाले त्याचा वापर करून उर्वरित महाराष्ट्रात पक्ष वाढायला हवा होता पण तसे झाले नाही. निवडून आलेले आमदार मुंबई आणि नाशिकमध्येच गुंतून राहिले. राजसाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाचा वापर त्यांना उर्वरित महाराष्ट्रात करता आला नाही किंवा त्यांनी तसे प्रयत्न केले नाहीत. गेली १० वर्षे झाले ग्रामीण महाराष्ट्रात राजसाहेबांच्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते पक्षाकडून कोणीतरी येईल आणि आपल्याला ताकत देईल, मार्गदर्शन करेल याची वाट पाहत बसले आहेत.


ADVERTISEMENT : SHOP books online written DR. MANOHAR SASANE CLICK HERE

ADVERTISE
Click on image to buy

मनसेने आता कात टाकून उठले पाहिजे. पक्षाकडे चांगले नेतृत्व आहे. गरज आहे नेटके नियोजन आणि संघटन करण्याची आणि परिस्थिती ओळखून राजकारण करण्याची. एवढ्या वर्षाच्या काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला आणि केंद्रातील काँग्रेस आघाडीच्या कारभाराला कंटाळून लोकांनी केंद्रात व राज्यात भाजपाला सत्ता दिली. मध्यमवयीन आणि नव्या पिढीने प्रथमच बिगर काँग्रेसी सरकार पाहिले आहे. त्यामुळे काँग्रेसच्या कारभाराला कंटाळलेली लोकं नव्या सरकारवर समाधानी असली तरी १२५ कोटी लोकांच्या अपेक्षा एकावेळी कोणतेही सरकार पूर्ण करू शकत नाही. कुठे ना कुठे तरी उणीवा या राहतातच. त्याच उणीवा शोधून जनतेपुढे मांडणे विरोधी पक्षाचे काम असते. त्यादृष्टीने जनहिताचे मुद्दे आणि व्यापक दृष्टीकोन घेऊन जर मनसे उभी राहिली तर जनमत निश्चितच पक्षाच्या बाजूने फिरेल. तसेही विरोधी पक्ष आता कमजोर आहेत. त्यामुळे ती जी स्पेस निर्माण झाली आहे ती भरून काढण्याची संधी पक्षाला निश्चितच आहे. जरी पक्षाचा विधिमंडळात एकच आमदार असला तरी राज यांचे आक्रमक नेतृत्त्व आणि राज यांच्या इशाऱ्यावर मनसैनिकांची रस्त्यावर “खळ्ळ-खटयाक” करण्याची तयारी याआधारे जनहिताचे प्रश्न घेऊन मनसे रस्त्यावर उतरली तर सरकारला AC मध्ये घाम फुटू शकतो. शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कर्जमाफी, दुधाला उत्पादन खर्चाच्या आधारे दर, शेती मालाला योग्य दर, शेतकऱ्यांना चांगल्या दर्जाची खते आणि बी-बियाणे, शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, नवीन छावण्या चालू करणे, त्यांना अनुदान देणे, दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या समस्या सोडवणे, त्यासाठी सरकार बरोबर संघर्ष करणे, दहशतवाद, हिंदी चित्रपटातील नंगा-नाच, ओवेसी सारख्या डुकरांचा बंदोबस्त करणे, हे सर्व करत असताना मा. बाळासाहेबांच्याकडून वारसा हक्काने आलेली प्रखर हिंदूत्वाची प्रतिमा जपणे गरजेचे आहे. हिंदूत्वाविषयी राजसाहेबांनी भूमिका पक्ष स्थापनेच्या सभेतच स्पष्ट केली आहे. “हिंदूत्व हेच राष्ट्रीयत्व असेल तर मला राष्ट्रीयत्व मान्य आहे” त्याचा प्रत्यय त्यांनी आझाद मैदानावर पोलिस आणि शहीद स्मारकावर जो देशद्रोह्यांनी हल्ला केला त्यावेळी दिला आहे. स्वतःला हिंदूतत्वादी म्हणवून घेणारे सगळे पक्ष मूग गिळून गप्प बसले पण राज त्यांच्या विरोधात ठोस भूमिका घेऊन उतरले आणि लोकांनी त्यांना पाठिंबाही दिला. त्यामुळे ठाकरेंचे रक्त कधीही सेक्युलर होऊ शकत नाही हे राज यांनी त्यावेळी दाखवून दिले.
आरएसएसच्या हिंदूत्त्ववाची परिभाषा मा. शिवसेनाप्रमुखांनी कधीच स्विकारली नाही. त्याबाबतीत ते नेहमीच संघावर टीका करायचे. ते म्हणायचे माझे हिंदूत्त्व संघाच्या पठडीतले नाही. त्यांची हिंदूतत्वाची व्याख्या सोपी होती जो देशाचा, हिंदूंचा, समाजाचा दुश्मन आहे मग तो कोणत्याही धर्माचा अथवा जातीचा असो त्याला ते दुश्मन मानायचे. राज यांनीही ही भूमिका जाहीर केली आहे. पण नवीन पिढीला त्याबाबत अजून स्पष्टता देण्याची आणि ते कृतीतून दाखवण्याची गरज आहे. करण्यासारख्या असंख्य गोष्टी आहेत. पक्ष, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यात योग्य समन्वय आणि मजबूत संघटन असेल तर या सगळ्या आघाड्यावर पक्ष प्रभावीपणे आपली प्रगती करून मोठी झेप घेऊ शकतो. नाशिक सारख्या ठिकाणी जिथे सत्ता आहे तिथे झालेली कामं लोकांच्यापुढे प्रभावीपणे मांडायला हवीत. प्रत्येक शहर, जिल्हा, तालुका, गाव पातळीवर मजबूत कार्यकर्त्यांची फळी उभी करायला हवी. निष्क्रिय लोकांना बाजूला करून चांगल्या निष्ठावान लोकांना संधी मिळायला हवी. कार्यकर्त्यांच्या सतत संपर्कात राहून त्यांच्यातील गुणवत्ता हेरून त्याप्रमाणे त्यांच्यावर जबाबदारी टाकायला हवी. आज जरी मोठे नेते पक्षात नसले तरी जे आहेत त्यांनाच मोठ्या जबाबदाऱ्या देऊन मोठे केले पाहिजे. येणारी प्रत्येक छोटी-मोठी निवडणूक पूर्ण ताकतीने लढवली पाहिजे. कार्यकर्त्यांना पदं मिळाली तर कार्यकर्ता मोठा होणार आहे कार्यकर्ता मोठा झाला तर पक्ष मोठा होणार आहे. मा. शिवसेनाप्रमुखांनी सुद्धा असेच सर्व महाराष्ट्रातून सर्वसामान्य कार्यकर्ते गोळा करून त्यांना पदे दिली व मोठे बनवले. त्याच धर्तीवर आता पक्ष बांधणी करण्याची वेळ आली आहे. त्यावेळी जनसंपर्काची एवढी साधनेही उपलब्ध नव्हती, की दळणवळणाची ही गैरसोय होती. आता याबाबतीत आपण प्रगती केली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी एवढे वर्षे सत्तेत होती त्याचे कारण त्यांनी सहकार क्षेत्रावर आपला दबदबा ठेवला. महाराष्ट्रातील सत्तेचा रस्ता सहकारातून जातो हे लक्षात घेऊन सहकार क्षेत्रातील सर्व अगदी पतसंस्था, सोसायट्या, बँका, साखर कारखाने, पंचायत समित्या, नगरपालिका, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद महानगरपालिका या सर्व निवडणूक लढवायला हव्यात. त्यातूनच कार्यकर्ता घडणार आहे. देशात, राज्यात घडणाऱ्या सर्व घटनांवर पक्षाने आपली भूमिका तातडीने स्पष्ट करायला हवी. पक्षाने आता सर्व बंध तोडून संपूर्ण महाराष्ट्रभर पसरले पाहिजे. खेडोपाड्यातील, ग्रामीण महाराष्ट्रातील कार्यकर्ता पक्षाची वाट पाहतोय. त्याच्यापर्यंत पक्षाने पोहोचायला हवे त्याला ताकत द्यायला हवी तरच तो पक्षाला ताकत देऊ शकेल. राजसाहेब जरी म्हणाले असले की ,”आमची सत्ता रस्त्यावर” तरी हे काही पक्षाचे ब्रीद वाक्य नाही. जनतेचे प्रश्न आणि नवनिर्माण रस्त्यावर उभे राहून होणार नाही, तर सत्ता हातात आल्याने होणार आहे. पराभवाच्या धक्क्यातून सावरण्यासाठी त्यांनी हे वाक्य कार्यकर्त्यांच्यात चैतन्य निर्माण करण्यासाठी वापरले आहे. खरे नवनिर्माण संपूर्ण सत्ता हातात असल्याशिवाय होणार नाही हे वास्तव लक्षात घ्यावे.

किशोर बोराटे.
१७/०३/२०१६

आपले मत व्यक्त करा