लिव्ह इन रिलेशनशिप- शाप की वरदान?

काल अभिनेत्री परिणीती चोप्राचे एक स्टेटमेंट मी वाचले त्यात ती म्हणते की मी लग्न करण्यापेक्षा लिव्ह इन रिलेशनशिपलाच प्राधान्य देते. त्यामुळे लग्न करण्याचा माझा विचार नाही. तिचे हे स्टेटमेंट वाचल्यावर मला याबाबत अभिनेता राहुल बोसचे लग्न या व्यवस्थेबाबतचे ते विचार जे त्याने काही वर्षांपूर्वी मांडले होते ते आठवले. त्यावेळी ते आजिबात पटले नव्हते. आज पटतात असेही नाही. पण पूर्वी माझा लिव्ह इन रिलेशनशिपला जो कडाडून विरोध होता तो बाजूला ठेवून किमान यावर चर्चा व्हावी असे आज मला वाटते. तसे राहुलने जे मत व्यक्त केले होते ते जरी त्यावेळी पटले नव्हते तरी त्याने जे तोटे सांगितले आहेत त्यात तथ्य आहे आणि त्याने मांडलेले विचार आपण आज नाकारू शकत नाही हे ही वास्तव आहे. याबाबत बोलताना तो म्हणाला होता की मला हिंदू धर्म, संस्कृती यांच्याविषयी नितांत आदर आहे. पण लग्न या व्यवस्थेला माझा विरोध आहे. त्यात त्याने म्हटले होते की ही व्यवस्था कोणी अस्तित्त्वात आणली माहिती नाही. पण एका व्यक्तीसोबत संपूर्ण आयुष्य काढणे ही गोष्ट वाटते तितकी सोपी नाही. नवरा- बायको मध्ये जोपर्यंत समन्वय आहे, त्यांचे पटतंय तोपर्यंत सर्व काही ठिक असते. पण जेव्हा पटत नसताना ही फक्त लग्न झाले म्हणून तसेच एका मंगळसूत्राच्या चार मण्यांच्यासाठी आणि एका धाग्याचा वास्ता घेऊन इच्छा नसताना एकमेकांच्या सोबत आयुष्य घालवायचे म्हणजे ही फार मोठी शिक्षा आहे. या नरकयातना आहेत. त्यामुळे अनेकांचे आयुष्य उद्धवस्त झाले आहे. असे दबावाखाली जगण्याला काही अर्थ नसतो. ही मानसिक गुलामगिरी आहे. त्याने वस्तुस्थिती मांडली, पण ती स्विकारण्याचे धाडस मला त्यावेळी झाले नाही.

आज आपल्या आजूबाजूला अनेक कुटुंबातील कलह आपण पाहतो. अनेकांचे कोर्टात दावे पण चालू आहेत. एकमेकांशी पटत नसल्याने अनेकजण लग्न होऊन देखिल वेगळे राहत आहेत. ही परिस्थिती अगदी थ्री- पेज कल्चर मधील लोकांच्यापासून ते अगदी सर्वसामान्य लोकांच्यापर्यंत पाहायला मिळते. काहीजण वेगळे राहतात, पण अशी हजारो जोडपी आहेत की त्यांचे पटत नसूनही ती तसेच घुसमटत आयुष्य जगत आहेत. काहींना ती घुसमट सहन न झाल्याने त्यांनी आत्महत्या देखिल केल्या आहेत. तर यावरून वाद विकोपाला जाऊन काहींच्या हातून खून सुद्धा झाले आहेत. परिस्थिती एवढी जर विकोपाला जात असेल आणि भयानक असेल तर मग समाजातील या सर्वात मोठ्या संवेदनशील प्रश्नांवर मंथन व्हायला नको का? चर्चा व्हायला नको का?

लग्न या व्यवस्थेचे जसे फायदे- तोटे आहेत तसेच लिव्ह इन रिलेशनशिपचे पण फायदे-तोटे आहेत. त्यामुळे चर्चा दोन्हींवर व्हायला हवी. लिव्ह इन रिलेशनशिप परदेशात जास्त चालते. पण आता भारतातही अनेकजण याच मार्गाने निघाले आहेत. थ्री-पेज कल्चरमध्ये तर हे प्रमाण जास्तच आहे. चित्रपटसृष्टीत अशी अनेक उदा. आहेत जे लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहतात. तर अनेकजण असेही आहेत की लग्न करतात, परंतू त्यांचे ते लग्न काही महिने, काही वर्षांपर्यंतच टिकते आणि मग नंतर ते वेगळे होतात. करिष्मा कपूरने लग्न केले पण काही वर्षानंतर ती आपल्या मुलांना घेऊन पती पासून वेगळी झाली. ऋत्विक रोशन आपल्या पत्नीपासून वेगळा झाला. अरबाज खान- मलायका अरोरा हे दोघेही नुकतेच विभक्त झाले. जॉन-बिपाशा अनेक वर्षे रिलेशनशिप मध्ये राहिल्यानंतर आता वेगळे झाले. त्यानंतर मग बिपाशाने दुसरा जोडीदार बघून लग्न करून आपला संसार थाटला. ही सगळी हायप्रोफाईल व्यक्तिमत्त्व आहेत. वेगळे होण्याचा निर्णय त्यांच्यासाठी अवघड नसला तरी तितका सोपा ही निश्चितच नसतो. आपल्या आजूबाजूला अशी अनेक उदा. आपल्याला पाहायला मिळतील. पण सर्वसामान्य कुटुंबातील स्त्री-पुरुषांच्या आयुष्यावर याचा फार मोठा दुष्परिणाम होतो. वरील जी हायप्रोफाईल नावं घेतली आहेत. यातील दोघेही आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत. सुंदर आहेत, त्यामुळे त्यांना तितकासा फरक पडत नाही. जेवढा सर्वसामान्य स्त्री-पुरुषांना पडतो. थ्री-पेज कल्चरमध्ये सामाजिक बंधनांना किंमत नसते. त्यांचे विश्व वेगळे असते. सर्वसामान्य कुटूंबातील स्त्री-पुरुष यांच्यावर अनेक कौटुंबिक, सामाजिक, नैतिक जबाबदाऱ्या असतात, दडपण असते. आर्थिक अडचणी असतात, सुरक्षिततेचा प्रश्न असतो. मुलांच्या भवितव्याचा प्रश्न असतो, कुटुंबातील इतर सदस्यांचा विचार करावा लागतो. अलिखित सामाजिक बंधनं असतात. त्यामुळे कितीही घुसमट झाली, तरीही ते तसेच मानसिक दबावात आयुष्य कंठत असतात. पण एक गोष्ट ही तितकीच खरी आहे की सर्वसामान्य कुटुंबातील स्त्री-पुरुष यांच्यातील वाद लगेच विकोपाला जात नाहीत. तडजोड करण्याची त्यांची वृत्ती असते. सर्वकाही सहन करूनही आपल्या कुटूंबासाठी एकत्र राहण्याची त्यांची तयारी असते. शक्यतो नाती जपण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. त्यामुळे अनेकदा वाद विकोपाला जाऊनही नवरा-बायकोमध्ये कुणीतरी एकजण माघार घेताना दिसतो. पण हायप्रोफाईल कल्चरमध्ये अहंकार जास्त असतो. त्यामुळे तिथे सहनशक्ती कमी असते. नातं टिकून राहण्यासाठी दोघांचीही एकमेकांच्यात भावनिक गुंतवणूक हवी असते. ती जोपर्यंत आहे, तोपर्यंत प्रेम टिकते. ती संपली की मग फक्त उरतात ते प्रोटोकॉल. शरीराने जरी एकत्र असले तरी मनाने एकत्र राहणे शक्य होत नाही. नुसत्या प्रोटोकॉलवर आयुष्य काढणे शक्य होत नाही.

एकमेकांची एकमेकांना अडचण होत असेल, मनं जुळत नसतील तर मग वेगळे होणे कधीही चांगलेच असते. जर नाही झाले तर मग वाद विकोपाला जाऊन हत्या किंवा आत्महत्येसारख्या भयानक घटनांना सामोरे जावे लागते. त्याचा मोठा दुष्परिणाम त्यांच्या तसेच त्यांच्या मुलांच्या, कुटुंबियांच्या आयुष्यावर पडतो. त्यापेक्षा मग वेगळे होणे कधीही चांगले असते. लिव्ह इन रिलेशनशिप हे प्राथमिक दृष्ट्या आकर्षक वाटत असले तरी याचा अंत फार भयानक असू शकतो. लग्न या व्यवस्थेमध्ये जबाबदारी, प्रेम, भावनिक बंध, कमिटमेंट असते. पण लिव्ह अँड रिलेशनशिप मध्ये व्यक्तिस्वातंत्र्याचे अति स्तोम असते. अहंकार असतो, मी पणा असतो. सुरुवातीचा काळ जरी नाजूक गेला तरी काळाच्या ओघात आकर्षण कमी कमी होत जाते आणि मग ते नातं ओझे वाटू लागते. अशावेळी मग यामध्ये पुरुषापेक्षा महिला जास्त असुरक्षित होतात. ऐन तारुण्यात तरुण-तरुणी शारीरिक आकर्षणापोटी सहजपणे लिव्ह इन रिलेशनशिपचे नाते स्विकारतात. स्त्रियांची अडचण अशी असते की जोपर्यंत त्या ऐन तारुण्यात आहेत तोपर्यंत त्यांना डिमांड असते. एकदा का क्रीम निघून गेली की मग त्यांचे ब्रेकअप होते. त्यानंतर पुरुषाला तर पर्याय मिळतो, पण स्त्रीची परवड सुरू होते. वयाच्या ४० नंतर त्यांना जोडीदार मिळणे कठीण होते. अशावेळी मग त्यांना एकटेपणाची जाणीव तीव्रतेने होते. त्यांना उर्वरित आयुष्य जगण्यासाठी कोणीतरी साथीदार हवा असतो. पण तो मिळत नाही आणि मग एकटेपणा त्यांना खायला उठतो. अशावेळी काहीजण अध्यात्माकडे वळतात. तिथून ते मानसिक कणखरपणा मिळवतात व आयुष्य जगतात. पण ज्यांना ते शक्य होत नाही ते नैराश्येच्या गर्तेत जातात. नकारात्मक विचारांच्या आहारी जातात, त्यातून व्यसनाधीन होतात. Drugs Addicted होतात. काहीजण मानसिक विकृतीचे शिकार होतात. त्यांना मानसोपचार तज्ञांची गरज भासते. अगदीच सहन झाले नाहीतर मग ते आत्महत्येचा पर्याय निवडतात. समाजात अशी अनेक उदा. आपल्याला पाहायला मिळतील. लग्न करून जी सुरक्षितता मिळते ती लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये मिळत नाही. तिथे use & throw ही प्रवृत्ती असते. एकमेकांच्या गरजेपोटी ते एकत्र येतात आणि गरज संपली की वेगळे होतात. नात्यांमधील जबाबदारी घेण्याची त्यांची तयारी नसते. ते एक तात्पुरते शारीरिक आकर्षण असते. त्यामुळे योग्य वयात लग्न करून आपले आयुष्य सुखी आणि सुरक्षित बनवणे हे कधीही उत्तमच असते. पण जर का पटत नसेल आणि अगदी एकमेकांच्या सोबत राहणेही कठीण असेल तर मात्र चर्चा करून वेगळे होणे कधीही चांगले. हा निर्णय शहाणपणाचा असतो. त्यामुळे मला तरी असे वाटते की लग्न ही व्यवस्था अतिशय उत्तम आणि सुरक्षित आहे. आयुष्याच्या एका टप्प्यावर पोहोचल्यानंतर तुम्हाला एका खंबीर आणि तितक्याच प्रेमळ तुम्हाला समजून घेणाऱ्या साथीदाराची आवश्यकता असते आणि ही साथ फक्त पती-पत्नीच एकमेकांना देऊ शकतात. कारण या नात्यात अहंकार, मीपणा, स्वार्थ असे काही नसते. फक्त प्रेम, निस्वार्थपणा, त्याग आणि भावनिक गुंतवणूक असते. अर्थात हे नाते शेवटपर्यंत टिकायला हवे आणि त्यासाठी एकमेकांना समजून घेणे फार फार महत्त्वाचे आहे. अमिताभ बच्चन यांनी एकदा मुलाखतीत सांगितले होते की हे संपूर्ण जग मी अनेकदा फिरलो. पण हिंदू संस्कृती सारखी सर्वात उच्च अशी संस्कृती जगाच्या पाठीवर कुठेही पाहायला मिळाली नाही आणि या संस्कृतीतील आदर्श आणि सुरक्षित अशी लग्न पद्धती ही जगाच्या पाठीवर कुठेही नाही. ज्यात स्त्रियांना त्यांचा मान-सन्मान दिला जातो. त्यांना आदराने घरची लक्ष्मी म्हणून वागवले जाते. देवी लक्ष्मीचा दर्जा दिला जातो अशी हिंदू संस्कृती महान आहे असे अमिताभने संबंधित मुलाखतीत सांगितलेले आहे.

माझे मित्र श्री जयेश मिस्त्री यांची याच विषयांवर वरील एक शॉर्ट फिल्म आहे. त्याची लिंक खाली देत आहे. ती आपण अवश्य पहावी.

https://www.youtube.com/watch?v=lURvIUAOLa8

One comment

आपले मत व्यक्त करा