काश्मिर प्रश्नी चर्चा कुणाशी करायची?

काश्मिर प्रश्नांबाबत काश्मिरी जनतेशी आणि पाकिस्तानशी चर्चा करायला हवी होती. मनमोहन सिंग सरकार आणि मुशर्रफ यांच्यात यासंदर्भात एक करार होणार होता तो होता होता राहिला. मनमोहन सिंग सरकारने ही त्यावेळी दोन पावले पुढे यायला हवे होते.


अमरजित सिंह दुलत
माजी रॉ प्रमुख

काश्मिर संदर्भात आता रॉ प्रमुखांनी वक्तव्य केले आहे. याकडे गांभीर्यानेच पाहायला हवे. पण तरीही इथे काही प्रश्न उपस्थित होतात. यात महत्त्वाचे म्हणजे काश्मिरी जनतेशी चर्चा करायची म्हणजे नक्की कुणाशी चर्चा करायची? याचा सरळ अर्थ असा निघतो की फुटीरतावादी नेत्यांशी चर्चा करावी लागणार आहे. यातून खरेच काही साध्य होईल? काँग्रेस सरकारच्या काळात हे प्रयत्न करून झाले आहेत. मुळात फुटीरतावाद्यांचीच हिंदुस्थान सोबत राहण्याची इच्छा नाही. त्यांना आझाद काश्मिर हवे आहे आणि त्यासाठी ते पाकिस्तानची मदत घेत आहेत. पाकिस्तान त्यांच्या संघर्षाला काश्मिरींच्या स्वातंत्र्याचा लढा म्हणून तेथील फुटीरतावादी शक्तींना सर्व प्रकारची मदत करत आहे. फुटीरतावाद्यांना मदत करायची आणि हिंदुस्थान पासून काश्मिर वेगळा करून तो पाकिस्तानशी जोडायचा हे मनसुबे पाकिस्तानचे आहेत. ज्यांची मानसिकताच हिंदुस्थान सोबत राहण्याची नाही आणि हे फुटीरतावादी नेते काश्मिरी जनतेच्या मनात हिंदुस्थान विरोधी द्वेष निर्माण करत असतील तर त्यांच्याशी चर्चा करून काय फायदा आहे?

काश्मिरचा खरा इतिहास माहिती असलेली पिढी आज काश्मिरात किती आहे? आणि जे आहेत ते खरे बोलत आहेत का? गेल्या ३ पिढ्या या हिंदुस्थानचा द्वेष करतच जन्माला आल्या. आत्ता जी काश्मिरातील जनता आहे, तरुण पिढी आहे त्यांच्या मनावर येथील फुटीरतावादी नेत्यांनी हिंदुस्थान हा आपला शत्रू आहे आणि त्यांनी बेकायदेशीरपणे काश्मिरवर लष्कराच्या बळावर कब्जा केला आहे आणि आपल्याला आता आपल्या हक्काची आझाद काश्मिरची लढाई लढायची आहे हे बिंबवले आहे. त्यामुळे तेथील मुलं आता हाती शस्त्र घेऊ लागलेत. सुरक्षा दलांच्यावर दगडी फेकू लागलेत. अशा मानसिकतेच्या लोकांशी कशी चर्चा करणार?

आता राहता राहिला पाकिस्तानशी चर्चेचा प्रश्न तर संपूर्ण काश्मिर हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि तो आमचा अंतर्गत प्रश्न आहे हे अनेकदा ठणकावून सांगितल्यानंतर पाकिस्तानशी चर्चा करण्याचा प्रश्न येतोच कुठे? बरं क्षणभर आपण धरून चालू की चर्चा करायला हवी. तर काश्मिरबाबत आपण पाकिस्तानशी काय चर्चा करणार? चर्चेत कोणते मुद्दे असतील? पाकिस्तानशी चर्चा फक्त पाकव्याप्त काश्मिरबाबतच होऊ शकते. जो हिंदुस्थानचा भूभाग आहे आणि तो बेकायदेशीररित्या पाकिस्तानने बळकावला आहे. दुसरा मुद्दा आहे तो दहशतवादाचा. यावर अनेकदा चर्चा झाल्या आहेत. पण पाकिस्तान काही सुधारत नाही.

प्रश्न युद्धाने किंवा बंदुकीने सुटणार नाही हे मान्य आहे. काश्मिर प्रश्नावर राजकीयच तोडगा निघू शकतो. युद्धानेच प्रश्न सुटणार असता तर आत्तापर्यंत कारगिलसह पाकिस्तानशी आपली ४ युद्ध झाली आहेत. चारही युद्धात पाकिस्तानने सपाटून मार खाल्ला आहे. तरीही पाकिस्तान सुधारत नाही आणि प्रश्नही सुटत नाही. त्यामुळे काश्मिरच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढच होत चालली आहे. आता खुद्द माजी रॉ प्रमुखच जर याबाबत चर्चेच्या भूमिकेचा आग्रह धरत असतील तर त्याला नक्कीच महत्त्व प्राप्त होते. पण चर्चा नक्की कोणाशी करायची आणि कोणकोणत्या मुद्द्यावर करायची? हे ही त्यांनी स्पष्ट करायला हवे. याबाबत त्यांच्याकडे जर काही प्लॅन असेल तर त्यांनी तो सरकारला सादर करायला हवा. त्यांच्याकडे जर काही अजेंडा असेल तर तो घेऊन त्यांनी पुढे यायला हवे.

बरं गंमत अशी आहे की इथे काश्मिर खोऱ्यात आझाद काश्मिरच्या घोषणा घुमत आहेत, तर तिकडे पाकव्याप्त काश्मिरात हिंदुस्थान झिंदाबादच्या घोषणा घुमत आहेत. तिथल्या जनतेला इकडे यायचंय, तर इथल्यांना वेगळे व्हायचे आहे. आपल्याकडे जशी आझाद काश्मिरची मागणी होत आहे तशीच तिकडे आझाद बलुचिस्तानची मागणी होत आहे. दोन्ही देश सारख्याच प्रश्नांना तोंड देत आहेत. पण आपलं काय जळतंय हे पाहायचे सोडून पाकिस्तानला हिंदुस्थानच्या ताब्यातील काश्मिरींची काळजी लागली आहे. ते त्यांना स्वातंत्र्यलढा म्हणून पाठिंबा देत आहेत. वारंवार त्यांच्या बोलण्यात काश्मिरचा विषय असतो. जगाच्या कोणत्याही व्यासपीठावर गेल्यावर ते काश्मिरचा विषय काढल्याशिवाय राहत नाहीत. तिकडे बलोच जनता हिंदुस्थानकडे मदतीची याचना करत आहे. याबाबत आत्तापर्यंत कोणताही हिंदुस्थानी नेता उघडपणे बोलायला तयार नाही. ना कधी याबाबत हिंदुस्थान सरकारने कधी आपली भूमिका स्पष्ट केली. पण याला अपवाद ठरले ते नरेंद्र मोदी, दोन वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्टच्या स्वातंत्र्यदिनाच्या समारंभात जनतेला उद्देशून जे भाषण केले त्यात त्यांनी बलुचिस्तानच्या विषयाला हात घालून पाकिस्तानचे टेन्शन तर बलोच जनतेच्या आशा वाढवल्या होत्या. पण त्यानंतर मोदींनीही परत कधी या विषयावर भाष्य केले नाही.

परवेझ मुशर्रफ यांच्या कारकिर्दीत बलोच आंदोलनाने खूप उग्र स्वरूप धारण केले होते. पण मुशर्रफ यांनी स्वतंत्र बलुचिस्तानसाठी लढणाऱ्या नेत्यांचे हत्यासत्र चालू केले आणि त्यात अनेक नेत्यांना आपले प्राण गमवावे लागले. बलोची जनतेवर अनन्वित अत्याचार झाले अजूनही चालूच आहेत. पाकिस्तानी लष्कर वारंवार बलोची नागरिकांच्यावर लष्करी कारवाई करून त्यांचे जीव घेत आहे. तेथील स्त्रियांच्यावर बलात्कार करून त्यांना मारून टाकले जात आहे. खरंतर हा मुद्दा हिंदुस्थान सरकारने आंतरराष्ट्रीय पातळीवर न्यायला हवा. पाकिस्तानची दुसरी काळी बाजूही या निमित्ताने जगासमोर येईल. आपल्या काश्मिरचा प्रश्न चिघळतो आहे तो या फुटीरतावादी नेत्यांच्यामुळेच चिघळतो आहे. यांचे थेट पाकिस्तानशी असलेले संबंध, तेथील अतिरेकी संघटनांच्याशी असलेले संबंध यामुळे हा प्रश्न चिघळतो आहे. पाकिस्तान हिंदुस्थान विरोधातील आपली खाज भागवून घेण्यासाठी या फुटीरतावादी नेत्यांचा वापर करून घेत आहे. या फुटीरतावादी नेत्यांच्याबाबत हिंदुस्थानला आक्रमक भूमिका घ्यावी लागेल.

बलुचिस्तान मध्ये जे मुशर्रफ यांनी केले तेच आपल्याला काश्मिरात करावे लागेल. हे फुटीरतावादी नेते जोपर्यंत जिवंत आहेत. तोपर्यंत काश्मिर प्रश्न सुटू शकणार नाही. पाकिस्तान यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून हिंदुस्थानवर गोळ्या चालवत आहे. हे फुटीरतावादी नेते काश्मिरी जनतेला हिंदुस्थानशी कधीही एकरूप होऊ देत नाहीत. चुकीची माहिती देऊन त्यांना हिंदुस्थानद्रोही बनवत आहे. हीच लोकं काश्मिर खोऱ्यात पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाला आश्रय देत आहेत. यांनाच उडवले तर काश्मिरशी पाकिस्तानशी असलेले कनेक्शन तुटून जाईल आणि काश्मिरी जनताही हिंदुस्थानशी जोडली जाईल. अर्थात काश्मिर मधील गरिबी आणि बेकारी, काश्मिरचा विकास याकडे हिंदुस्थान सरकारला लक्ष द्यावे लागणार आहे. तिथे विकास झाला तरच काश्मिरी जनतेला हिंदुस्थान विषयी जिव्हाळा वाटेल. तसेच काश्मिरला हिंदुस्थानशी जोडण्यासाठी तेथील कलम ३५ अ आणि कलम ३७० रद्द होणेही तितकेच गरजेचे आहे. ते रद्द झाले तर काश्मिर मूळ प्रवाहात येऊन देशातील इतर भागांशी जोडला जाऊ शकतो. त्यामुळे जनतेत परस्परांच्या बद्दल विश्वास निर्माण होऊ शकतो. काश्मिर प्रश्न सुटण्याच्या मार्गातील अडचणीचे ठरणारे फुटीरतावादी नेते उडवणे आणि मग काश्मिरचा विकास करणे हाच काश्मिर प्रश्न सोडवण्याचा एक मार्ग आहे. पण विषय असा आहे की जे परवेझ मुशर्रफ यांनी बलुचिस्तान मध्ये केले ते हिंदुस्थान सरकार काश्मिर मध्ये करण्याची तयारी दाखवेल का?

आपले मत व्यक्त करा