जरा आत्मपरीक्षण करा.

Air Strike मध्ये किती अतिरेकी मारले असा प्रश्न विचारणारांना देशद्रोही ठरवू नका. देशप्रेमापोटीच ते प्रश्न विचारत आहेत. जास्तीत जास्त अतिरेकी मारून पाकिस्तानची मस्ती जिरवावी ही प्रत्येक हिंदुस्थानी नागरिकाची अपेक्षा आहे. अर्थात मणीशंकर अय्यर सारखे काही अपवाद वगळता जेवढे जास्त अतिरेकी मारले गेले असतील त्याचा एक हिंदुस्थानी म्हणून प्रत्येकाला अभिमानच आहे. या air strike बाबत परस्परविरोधी दावे करण्यात आल्याने आणि आत्तापर्यंत भाजपा IT CELL ने ज्या खोट्या बातम्या पसरवल्या व भाजपा नेत्यांचा जो स्वभाव आहे की बोलताना रेटून बोलायचे मग वस्तुस्थितीच्या निकषावर त्यात किती तथ्य आहे याच्याशी त्यांना काही देणे-घेणे नसते. कालच अमित शहा यांनी सांगितले की किती अतिरेकी मेले याबाबत मलाही निश्चित माहिती नाही. लोकांच्यात जी चर्चा चालली होती त्याच आधारे मी बोललो. यामुळे लोकांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली. त्या मागील त्यांच्या भावना लक्षात घ्या. देशाच्या सैन्याच्या कार्यक्षमतेवर कोणीच शंका घेतली नाही. प्रश्न सरकारला विचारले जाताहेत सैन्याला नाही. पण चलाखीने तुम्ही सैन्याच्या मागे दडून सैन्यालाच प्रश्न विचारले जाताहेत असा अपप्रचार करताय तो चुकीचा आहे. लोकं मूर्ख नाहीत.

हवाई दलाची पत्रकार परिषद परत एकदा पहा. त्यात त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की आम्हाला जी माहिती आणि locations सांगितली गेली तिथे आम्ही हवाई हल्ला केला. आमचे काम आम्ही केले आहे. किती अतिरेकी मारले गेले? ते जाहीर करायचे, नाही करायचे हा सरकारचा प्रश्न आहे. आम्ही आमचे काम केले आहे. हिंदुस्थानी जनतेचा देशाच्या सैन्यदलावर पूर्ण विश्वास आहे. पाकिस्तानी सैन्याकडून तसेच अतिरेक्यांच्याकडून आमचा १ जरी जवान मारला गेला तरी आमचे रक्त गरम होते, सळसळते. आमच्या तोंडून ४ सणसणीत शिव्यांची लाखोली पाकिस्तानला वाहिली जाते. सर्वसामान्य जनता यापेक्षा जास्त काय करू शकते? पण तुम्ही या गोष्टींचे गलिच्छ राजकारण करून आपल्याच लोकांना देशद्रोही ठरवण्याचा प्रयत्न करू नका. अशा पद्धतीने सर्टिफिकेट वाटायचा तुम्हाला अधिकार सुद्धा नाही आणि तेवढी तुमची उंची पण नाही. हे असे प्रश्न आत्ताच का उपस्थित होतात याचाही तुम्ही विचार करा. इंदिराजी, वाजपेयी यांच्या काळातही पाकिस्तान बरोबर युद्ध झाली. पण त्यांना कधी कुणी हे असे प्रश्न विचारले नाहीत. वाजपेयी साहेबांनी कारगिल युद्ध जिंकले. त्या आधी सत्तेवर आल्या आल्या अणुस्फोट केले. पण त्याचे त्यांनी कधी राजकारण केले नाही. त्यांच्या धाडसाचे त्यावेळी सर्व हिंदुस्थानी जनतेने कौतुक केले. समझोता एक्स्प्रेस, बससेवा चालू करून आम्हाला पाकिस्तानशी चांगले संबंध ठेवायचे आहेत हे त्यांनी कृतीतून दाखवून दिले. पण वेळ पडली तेंव्हा अणुस्फोट करून, कारगिल युद्ध जिंकून आम्ही दहशतवादाबाबत आपण किती कठोर आहोत हे ही त्यांनी दाखवून दिले. जे सत्य असते ते स्वयंप्रकाशित असते. ते कुणी कितीही झाकण्याचा प्रयत्न केला तरी प्रकाशित होतेच.

पुलवामा हल्ला मसूद अझरने घडवून आणला आणि त्याला मागील एनडीएच्या काळात त्या सरकारने कंदहारला नेऊन सोडले असा आरोप जरी राहुल करत असला आणि हे बरोबरच आहे. पण तो अर्धसत्य बोलतोय. त्यावेळी आपले एक प्रवासी विमान हायजॅक करण्यात आले होते. २५०-३०० प्रवाशांच्या त्यात पुरुष, स्त्रिया, लहान मुले यांच्या जिवीताचा प्रश्न होता. त्यांचा जीव वाचवावा अशी जनभावना होती. त्यावेळी पंतप्रधान वाजपेयी साहेबांनी सर्व पक्षीय मिटिंग बोलावली आणि त्यात चर्चा करून सर्वानुमते मसूद अझर याच्यासह ५ अतिरेकी सोडण्याचा निर्णय झाला. जे सत्य आहे ते सत्यच आहे आणि ते जनतेला दिसते. त्यामुळे असत्य ते सत्य आहे असे भासवून भाजपा भक्तांनी आणि त्यांच्या IT CELL च्या लावारीस पोरांनी विरोधी पक्षांच्या विषयी बोलताना जरा भाषा नीट वापरावी. जनता सुज्ञ आहे.

२०१४ साली भाजपा IT CELL च्या लावारीस पोरांनी आणि भक्तांनी जो खोटारडेपणाचा कळस गाठून प्रचार केला तो त्यावेळी चालला. त्याचा त्यावेळी फायदाही झाला. पण आता पितळ पूर्णपणे उघडे पडले आहे. आता तो फॉर्म्युला चालणार नाही. तुम्ही जेवढा जास्त अतिरेक कराल तेवढा जास्त तोटा मोदींचा होणार आहे. व्यक्तिशः मोदींनी अजूनही air strike मध्ये किती अतिरेकी मारले हे स्पष्ट केले नाही. पण इकडे भाजपा नेत्यांनी, भक्तांनी आणि IT CELL वाल्या लावारीस पोरांनी मटक्यात आकडे लावावेत तसे मनाला येईल ते आकडे लावले रोज एवढे मारले, तेवढे मारले असे सांगून त्या air strike विषयी संशय निर्माण केला. IT CELL वाल्यांनी खोटे पेरायचे आणि भक्तांनी त्याला खत-पाणी घालायचे. मोदींनी उभा केलेला राक्षस आज त्यांनाच गिळायला लागलाय. पण आता हे सगळे त्यांच्याही हाताबाहेर गेले आहे. त्यांचा आता या सर्व यंत्रणेवर कंट्रोल राहिला नाही. मोदी भले कितीही प्रामाणिक असतील. पण या राक्षसाने त्यांच्या विश्वासाहर्तेवर प्रश्नचिन्ह लावले आहे आणि याची जाणीव खुद्द नरेंद्र मोदी यांनाही झालेली आहे. त्यामुळेच त्यांनी काही महिन्यांपूर्वी सांगितले होते की सोशल मिडियाचा वापर जपून करा. कुणाचे मन दुखावेल असे त्यावर काही लिहू नका. लोकांना प्रेमाने जिंका. पण भक्तांना ऐकायला वेळ नाही.

गेली ५ वर्षे तुमच्या हातात सत्ता आहे. काँग्रेसच्या निष्क्रिय आणि भ्रष्टाचारी राजवटीला कंटाळून जनतेने तुम्हाला बहुमत दिले. मग गेल्या ५ वर्षात काय काय विकास कामं झाली हे सांगायचे सोडून तुम्ही विरोधकांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका कसली करताय? त्यांना ट्रोल करताय याचा अर्थ विकासाबद्दल बोलण्यासारखे तुमच्याकडे काहीच नाही. देशात देशभक्तीची, हिंदूत्त्वाची आग लावायची आणि त्यावर आपल्या राजकीय पोळ्या भाजायच्या हे धंदे आता जुने झाले आहेत. जनता त्याला भुलणार नाही. प्रत्यक्षात काम किती झाले? २०१४ साली तुम्ही जो आश्वासनांचा पाऊस पाडला होता, त्यातून काय उगवले याबद्दल बोला. अजित पवारांच्या जलसंधारण भ्रष्टाचाराचे काय झाले? याबाबतची भाजपा नेत्यांची भाषणे काढून पहा. कुठे गेले ते बैलगाडीभर पुरावे? ही दिवाळी अजित पवारांची जेलमध्ये जाईल म्हणणारे किरीट सोमय्या कुठे आहेत? आमचे सरकार आले की अजितदादा जेलमध्ये असतील म्हणणारे विनोद तावडे कुठे आहेत? अजितदादांच्या घराबाहेर बेड्या लटकताहेत, कोणत्याही क्षणी त्यांना अटक होऊ शकते म्हणाणरे दानवेंना विचारा कुठे हरवल्या त्या बेड्या? कुठे गेली ती ७०,०००/- कोटी ₹ भ्रष्टाचाराची फाईल? कुठे गेले ते अरबी समुद्रातील शिवस्मारक, इंदू मिलच्या जागेवरील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक? कोणत्या शेतकऱ्यांना हमीभाव मिळतोय? कांदा उत्पादक शेतकऱ्यांची परिस्थिती आज काय आहे? उत्पादनावर आधारित दूधाला दर मिळतोय का? शिक्षणाचा दर्जा सुधारला का? नुसता घोषणांचा पाऊस, त्यातून उगवत काहीच नाही. किती स्मार्ट सिटी झाल्या? कल्याण-डोंबिवलीला ६५००/- कोटी रुपयांचे पॅकेज मिळाले का? साताऱ्याला १०,०००/- कोटी रुपयांचे पॅकेज मिळाले का? या आश्वासनांचे काय झाले? मेक इन इंडिया, मेक इन महाराष्ट्र, स्टार्ट अप इंडिया या गोंडस नावाखाली ज्या योजना चालू केल्या त्यातून किती गुंतवणूक झाली? गिरणी कामगारांच्या घरांचे काय झाले?

डोकलाम चा वाद झाला तेंव्हा भक्त म्हणत होते चायनीज वस्तुंच्यावर बंदी घाला. तिकडे चीन पाकिस्तानला मदत करणार आणि पाकिस्तानच्या गोळीपासून आपल्या सैन्याचा जीव वाचावा म्हणून चीनकडून आपण चायनीज जॅकेटचे साहित्य खरेदी करून देतोय. याच चीनने काही महिन्यांपूर्वी आंतरराष्ट्रीय सुरक्षा परिषदेत अझर मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यापासून रोखले होते. कालही चीनने तेच केले. नकाराधिकाराचा वापर करून मसूद अझरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी ठरवण्यापासून हिंदुस्थानला परावृत्त केले. हा कसला विरोधाभास आहे? कधी नवाज शरीफांच्या आईला साडी, शाल पाठवता, तर कधी सर्व प्रोटोकॉल तोडून नवाज यांच्या वाढदिवसाला त्यांना केक भरवायला जाता तुमच्या सोयीनुसार तुम्ही त्यांना मित्र आणि शत्रू करणार का? हे जे काही राजकारण चालले आहे ते लोकांना कळत नाही असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही मूर्खांच्या दुनियेत वावरत आहात. निवडणूका झाल्या की सर्व काही व्यवस्थित होईल. पुढच्या निवडणूका येईपर्यंत सीमेवरील तणाव ही निवळेल. Air strike मध्ये अतिरेकी मारले गेले असतील तर आम्ही मनापासून मोदी सरकारचे आणि सैन्याचे अभिनंदनच करतो. पण फरक लक्षात घ्या, आपले जवान शहीद झालेत आणि त्यांचे अतिरेकी मारले गेलेत. मनोहर पर्रीकर संरक्षणमंत्री असताना अतिशय महत्त्वाचे वाक्य बोलले होते. ते म्हणाले होते की जे आम्ही भोगतोय ते जोपर्यंत त्यांना भोगायला लागत नाही तोपर्यंत त्यांना त्याची तीव्रता आणि दुःख कळणार नाही. अतिरेकी मरायलाच भरती झालेले असतात. ते मारले ते चांगले झाले. पण सैन्याच्या बदल्यात सैन्याच हवे, त्याशिवाय पाकिस्तानला आपले दुःख कळणार नाही. आत्तापर्यंत सर्व संरक्षणमंत्री म्हणत होते की आमचे सैन्य देशासाठी प्राण अर्पण करायला मागेपुढे पाहणार नाही. पण मनोहर पर्रीकर हे पहिले संरक्षणमंत्री होते जे बोलले होते आमचे सैन्य देशासाठी मरायला नाही तर मारायला मागे पुढे पाहणार नाही. सीमेवर आम्ही ६ लाख सैन्य मरायला नाही तर मारायला उभे केले आहे. हा फरक विचारसरणीतला आहे. आता निवडणूका आहेत. Air Strike विसरा, हा काही प्रचाराचा मुद्दा होऊ शकत नाही. पायाभूत सुविधांच्या विषयी बोला. देशभक्तीची कृत्रिम लाट तयार करून त्यावर स्वार होण्याचा प्रयत्न करू नका. २०१४ आणि त्यानंतर दिलेल्या आश्वासणांचे काय झाले याबाबत जाणून घेण्यास जनता उत्सूक आहे. त्याबाबत आता बोला.

2 comments

  1. मोदींनी उभा केलेला राक्षस आज त्यांनाच गिळायला लागलाय. पण आता हे सगळे त्यांच्याही हाताबाहेर गेले आहे. त्यांचा आता या सर्व यंत्रणेवर कंट्रोल राहिला नाही.

आपले मत व्यक्त करा