गब्बर – एक महाराष्ट्र सैनिक

१९७५ साली हिंदी चित्रपटसृष्टीत एक इतिहास घडला. यावेळी भारतीय चित्रपटसृष्टीत एका अँग्री यंग मॅन चा जंजिर चित्रपटातून उदय झाला. त्याचे नाव अमिताभ बच्चन. ये पुलिस स्टेशन हैं. तुम्हारे बाप का घर नही. या डायलॉगने तेंव्हाच्या तरुणाईला अक्षरशः वेड लावले आणि एका सुपरस्टारचा जन्म झाला. त्यापूर्वी राजेश खन्ना सुपरस्टार होता. त्याचेही चित्रपट भारतीय जनतेने डोक्यावर घेतले होते. पण तोच रोमान्स, मान वाकडी करत हिरोईनच्या मागे पळणारा तोच मिळमिळीत हिरो पाहून पाहून लोकं कंटाळली होती. अशातच अन्यायाच्या विरोधात उभे राहून गुन्हेगारांना आणि त्यांना आसरा देणाऱ्या व्यवस्थेला आव्हान देणारा जनतेच्या मनातला एक अँग्री यंग मॅन अमिताभने जंजिर मध्ये साकारला. तो सुपर-डुपर हिट ठरला. त्यानंतर मग अमिताभच्या अशाच चित्रपटांची लाईन लागली. त्यामध्ये मग शोले, दीवार, मुकद्दर का सिकंदर, शहंशाह, त्रिशूल, आखरी रास्ता, शक्ती असे पाठोपाठ सिनेमे अमिताभने आपल्या अँग्री यंग मॅनच्या इमेजने हिट केले. काही वर्षांपूर्वी याच धर्तीवर अक्षयकुमार याचा गब्बर नावाचा एक चित्रपट आला तो ही खूप हिट झाला. तर सांगायचा मुद्दा हा आहे की प्रत्येकाच्या मनात एक अँग्री यंग मॅनची प्रतिमा दडलेली असतेच. पण प्रत्येकजण त्याला न्याय देतोच असे नाही. त्याची कारणे असतात. कुटुंब, नोकरी, व्यवसाय, इमेज प्रत्येकाला आपापली, कुटुंबाची काळजी असते. त्यामुळे कुठेही अन्याय झाला, फसवणूक झाली तर त्याबद्दलचा राग, संताप, चीड मनात येते. पण ती दाबून टाकली जाते. कारण या जबाबदाऱ्या असतात. व्यक्ती तितक्या प्रकृती असतात. कुणी मनाने कमजोर असतो, तर कुणी शरीराने कमजोर असतो. अशा सर्वसामान्य जनतेवर ज्यावेळी अन्याय होतो तेंव्हा तो व्यवस्थेकडे दाद मागायला जातो. मग ते पोलिस असतील, कोर्ट असेल. इथे चकरा मारूनही जर न्याय मिळत नसेल तर मग तो निराश होतो. अशातच मग त्याला जेंव्हा समजते की कुणी नितिन नांदगावकर म्हणून महाराष्ट्र सैनिक आहे आणि तो न्याय मिळवून देतोय. तेंव्हा मग हा पिचलेला, थकलेला, परिस्थितीने हतबल झालेला सर्वसामान्य माणूस हा नितिन नांदगावकर यांच्याकडे न्याय मिळेल या आशेने जातो.

अशा व्यवस्थेतूनच नितिन नांदगावकर यांचे कार्य चालू झाले. राजसाहेब ठाकरे यांचे कट्टर निष्ठावंत, कडवट महाराष्ट्र सैनिक जिथे अन्याय दिसेल तिथे लाथ मारा. माझ्या आदेशाची वाट पाहू नका असे अनेकदा राज यांनी जाहीर सभांच्यातून सांगितले आहे. राज यांच्या याच आदेशाचे तंतोतंत पालन करणारा महाराष्ट्र सैनिक म्हणून नितिन नांदगावकर प्रसिद्ध आहेत. उंच, धिप्पाड शरीरयष्टी, दाढी आणि गुंडांना जरब बसवणारा पण सर्वसामान्य माणसाला आपलासा वाटणारा चेहरा असलेली ही व्यक्ती आपल्या आक्रमक आणि खळळ-खट्याक स्वभावसाठी प्रसिद्ध आहे. आत्तापर्यंत हजारो सर्वसामान्य जनतेला त्यांनी न्याय मिळवून दिला. २४ तास माणूस सर्वसामान्यांच्या हितासाठी रात्रंदिवस संघर्ष करत असतो. कुठला गर्व नाही, अहंकार नाही. मी पणा पण नाही. कोणती गोष्ट दडवून करणे नाही. जे काही असेल ते on camera असते. स्वतः पेक्षाही पक्षाला, राजसाहेबांना श्रेय देणारे नांदगावकर साहेब तक्रार पण फेसबुकवर live ऐकून घेतात आणि कारवाई पण live करतात. कारण उद्या कोणी कसलेही आरोप करू नयेत आणि एकाला वाजवले तर इतर दहा जणांना जरब बसावी हाच हेतू असतो. त्यांची live येताना सुरुवातच अशी असते की जय महाराष्ट्र, मी महाराष्ट्र सैनिक नितिन नांदगावकर सन्माननीय राजसाहेबांच्या आदेशानुसार वगैरे वगैरे……… हे रोजच ऐकायला मिळते. सर्वसामान्य लोकांच्यासाठी त्यांनी खूप काम केले आहे. कधी कुणाचा प्रांत, जात, धर्म विचारला नाही. दर बुधवारी त्यांचा जनता दरबार भरतो. हजारो लोकं रांगेत उभी असतात. फक्त मराठीच नाही, तर सर्व जाती-धर्माची, प्रांताची अगदी यूपी-बिहारची सुद्धा असतात. ही लोकं थेट त्यांच्याकडे येत नाहीत. तर त्यांच्यावर जो अन्याय झालेला असतो त्यासंदर्भात संबंधितांच्याकडे हेलपाटे घातलेले असतात. तिथं जाऊन उपयोग होत नाही, तर उलट धमकावले जाते म्हणून मग त्यांनी पोलिसांच्याकडे, न्यायालयात दाद मागितलेली असते. पण तिथेही न्याय मिळत नाही म्हटल्यावर मग शेवटची आशा म्हणून जनतेचे पाय नितिन नांदगावकर यांच्याकडे वळतात. त्यांच्याकडे गेले की त्वरित न्याय मिळतो. असं म्हणतात की उशिरा मिळालेला न्याय देखिल अन्यायच असतो. पण नांदगावकर साहेबांच्याकडे लगेच न्याय मिळतो म्हणून लोकं गर्दी करतात.

असे नाही की नितिन नांदगावकर साहेब लगेच कायदा हातात घेऊन त्यांना मारतात. अगोदर सांगून बघतात, नाही ऐकले तर मग कानाखाली आवाज काढावाच लागतो. शेवटी काय करणार मग? राजसाहेबांचा आदेश आहे, ज्याला जी भाषा समजते, त्याला त्याच भाषेत समजावा. त्यामुळे त्यांना अनेकदा कायदा हातात घेऊन कामं करावी लागतात. यासंदर्भात त्यांच्यावर अनेक केसेस आहेत. पण सर्वसामान्य लोकांच्यासाठी काम करत असताना त्यांना न्याय मिळवून देत असताना त्यांनी अनेकदा गुंडांशी, धनदांडग्यांशी, ज्यांना आपण व्हाईट कॉलर गुंड म्हणतो, म्हणजे प्रतिष्ठेचा बुरखा पांघरलेल्या लोकांशी पंगा घेतला आहे. अशाच काही लोकांनी भ्रष्ट प्रशासनाला हाताशी धरून नितिन नांदगावकर यांना तडीपार करण्याचा प्रयत्न केला. पण ही चाल त्यांच्यावरच उलटली. ही बातमी जशी मनसे नेत्यांना, राज्यभरातील महाराष्ट्र सैनिकांना आणि सर्वसामान्य जनतेला समजली, तसा त्यांच्यातून उठाव झाला. सर्वसामान्य जनता रस्त्यावर उतरली. त्यांचा आक्रोश वाढला. वाहिन्यांच्या कॅमेऱ्यासमोर येऊन त्यांनी नितिन नांदगावकर यांना पाठिंबा दिला. अनेक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपला पक्ष बाजूला ठेवून नितिन नांदगावकर यांना पाठिंबा व्यक्त केला. मिडिया सुद्धा त्यांच्या मागे उभा राहिला. ही नांदगावकर साहेबांच्या कामाची पावतीच होती. नुसती नोटीस पाठवली तर हा तमाशा झाला. खरोखरच तडीपारीचा प्रयत्न झाला असता तर काय झाले असते? पण बहुधा हे प्रकरण पुढे गेले नाही. राजसाहेब तरी आपल्या या आक्रमक महाराष्ट्र सैनिकांवर कसा अन्याय होऊ देतील? तडीपारीचा विषय थांबला. पण महत्त्वाचा मुद्दा हा आहे की ज्यावेळी आपण म्हणतो की हा देश, हे राज्य घटनेवर चालते. हे कायद्याचे राज्य आहे. त्यावेळी मग ही घटना, हा कायदा जनसामान्यांना न्याय द्यायला कमी का पडतो? कमी पडतो म्हणून तर आज नितिन नांदगावकर यांच्यासारख्या शहंशाहचा, गब्बरचा जन्म होतो. जनतेला पोलिस प्रशासन, न्यायालय यांच्यापेक्षा स्वतः राजसाहेब आणि त्यांचे शिलेदार नितिन नांदगावकर, अविनाश जाधव, संदीप देशपांडे यांच्यासारखे मनसे नेते, महाराष्ट्र सैनिक जवळचे का वाटतात? लोकं यांच्याकडे न्याय मागायला का जातात? प्रशासकीय व्यवस्था कुठेतरी कमी पडतेय त्यामुळेच मग या महाराष्ट्र सैनिकांना प्रसंगी कायदा हातात घेऊन काम करावे लागते. प्लॅट घेण्यासाठी साडे सोळा लाख ( १६ लाख ५०,००० हजार रुपये) देऊनही जर संबंधिताला ५ वर्षे तो एजंट, बिल्डर यांच्याकडे हेलपाटे घालून प्लॅट मिळत नसेल. दिलेले पैसे ही परत मिळत नसतील, पोलिसांच्याकडे जाऊनही त्याला न्याय मिळत नसेल आणि तो कॅन्सर पीडित असेल तर त्याने काय करायचे? अशा हजारो केसेस नांदगावकर साहेबांच्याकडे आहेत.

CLICK TO WATCH

आता त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीविषयी अनेकांना आक्षेप असू शकतात. पण शेवटी आपण result पाहायला हवा. एखादा आजार औषधाने बरा होत नसेल तर त्याला ऑपरेशन करावेच लागते. तसेच हे आहे. परवा tv 9 ला मी नितिन नांदगावकर साहेबांची मुलाखत पाहिली. ती मुलाखत विलास आठवले या पत्रकाराने घेतली. मला खरंच कळत नाही की ही अशी लोकं पत्रकार कशी होऊ शकतात? अरे तुम्ही पत्रकार आहात? वकील आहात? की न्यायाधीश आहात? या पत्रकाराने मुलाखत घेताना कोणताही अभ्यास केला नव्हता. किमान आपण ज्याची मुलाखत घेतोय त्याच्याविषयी आपण पूर्ण माहिती घेऊन, अभ्यास करून, त्याप्रमाणे प्रश्न काढून मग मुलाखतीस बसायला हवे ना? तो पत्रकार स्वतः प्रश्न विचारत तर होता, पण त्यालाच नांदगावकर यांच्याविषयी नीट माहिती नव्हती. तो नीट उत्तरेही ऐकून घेत नव्हता. लगेचच पुढचा प्रश्न विचारत होता. त्यांचे उत्तर मध्येच अर्धवट तोडून परत पुढचा प्रश्न विचारत होता. तो त्यांचे ऐकून घेण्यापेक्षा स्वतःचे मत त्यांच्यावर लादत होता. थोडा अभ्यास केला असता आणि त्यांनी मदत केलेल्या लोकांना भेटला असता तर ही मुलाखत खूप चांगली झाली असती. सामान्य कुवतीचा, दर्जाचा पत्रकार असल्यावर काय होणार? नांदगावकर साहेबांना अडचणीत आणणारे प्रश्न सुद्धा त्याला विचारता आले असते पण तेवढी त्याची कुवत नव्हती. त्यामुळे ती मुलाखत एकदम प्लॉप गेली. पण यावरून शासनाने आणि पोलिस प्रशासनाने एक गोष्ट लक्षात घ्यावी की व्यवस्था निकामी होते तेंव्हाच अशा शहंशाह म्हणा किंवा गब्बर म्हणा यांचा जन्म होतो. यासाठी झटपट न्याय देणारे गतिमान प्रशासन आणि न्याय व्यवस्था निर्माण करायला हवी. भ्रष्ट लोकांना त्वरित दूर करायला हवे. अशी लोकं ही लोकशाहीला लागलेली वाळवी आहे. जोपर्यंत व्यवस्था सुधारत नाही तोपर्यंत नितिन नांदगावकर यांच्यासारखे महाराष्ट्र सैनिक वेगवेगळ्या रुपात पुढे येतच राहणार. तुम्ही किती जणांना तडीपार करणार?

4 comments

  1. माझे मत आहे की आमच्या साठी साहेब हीरो आहेत
    जय मनसे

आपले मत व्यक्त करा