दोघात तिसरा, आता सगळं विसरा

दोघात तिसरा, आता सगळं विसरा

           बदलत्या राजकीय परिस्थिती मध्ये अमेरिकेला आता भारताचे महत्त्व पटायला लागले आहे. त्याला महत्त्वाचं कारण जसे बदलती राजकीय परिस्थिती आहे तसेच भारताचे कणखर परराष्ट्र धोरण सुद्धा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर आणि अजित डोभाल या चौघांच्या रणनितीचे सुद्धा हे यश आहे. प्रत्यक्ष रणांगणावर पाकिस्तानशी दोन हात करण्यापेक्षा पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय स्तरावर आर्थिक तसेच राजकीय कोंडी करण्याचे प्रयत्न या चौकडीने केले त्यात त्यांना बऱ्या पैकी यश ही मिळाले आहे. नुकतेच अमेरिकेने एन.एस.जी. ( nuclear suppliers group) च्या सदस्यत्वासाठी भारताचे जोरदार समर्थन केले आहे. १९७४ साली स्थापन झालेल्या एन.एस.जी. मध्ये एकूण ४८ देश आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर चीन आणि पाकिस्ताचा विरोध असताना अमेरिकेने भारताचे एवढे जोरदार समर्थन करण्याची कदाचित ही पहिलीच वेळ असेल. चीन आणि पाकिस्तान भारताला हे सदस्यत्व मिळू नये म्हणून प्रयत्नशील आहेत. चीन आणि पाकिस्तानने उघडपणे भारताच्या विरोधात भूमिका घेतली आहे. परंतु भारताच्या सदस्यत्वाचे अमेरिकेने जोरदार समर्थन केल्याने भारताचा एन. एस.जी. च्या सदस्यत्वाचा मार्ग मोकळा झाला आहे. पुढील महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकन संसदेत भाषण करण्यासाठी जाणार आहेत त्यापूर्वी अमेरिकेकडून भारताला हे गिप्ट मिळेल अशी शक्यता आहे. थोडसं पाठीमागे जाऊन पहिले तर देशावर आतापर्यंत सतत काँग्रेसची तसेच काँग्रेस आघाडीची सत्ता राहिली आहे. त्या कालावधी मध्ये आंतरराष्ट्रीय राजकारणात अमेरिकेपेक्षाही रशिया आपला अधिक जवळचा मित्रराष्ट्र राहिला आहे. तसे अमेरिकेशी आपले कधी वाकडे नसले तरी अमेरिकेसह सर्व जग आपल्याला रशियाचा मित्र म्हणूनच ओळखत राहिले आहे. आपले पंतप्रधान अमेरिकेला गेले तरी अमेरिका आपले तसे कोरडेच स्वागत करत होता. जगाने आपली दखल घ्यावी असे नेतृत्त्व मा. इंदिराजी गांधी यांच्या नंतर आपल्याला प्रथमच मा. नरेंद्र मोदी यांच्या रुपाने मिळाले आहे. तसे पहिले तर अमेरिका, रशिया, जपान यांची अर्थव्यवस्था ही शस्रास्त्र विक्रीवर जास्त अवलंबून आहे. त्याबाबतीत आपण आतापर्यंत रशियावर जास्त अवलंबून राहिलो. अमेरिकेला वाटत होते आपण त्यांचे ग्राहक बनावे पण आपण कधी त्यादृष्टीने त्यांना जास्त महत्त्व दिले नाही. अमेरिकेकडून आपण खरेदी करत होतो पण रशियाच्या तुलनेतअगदीच नगण्य. त्यामुळे मग अमेरिकेने आपला कट्टर विरोधक पाकिस्ताला जवळ केले. चीनशी ही आपले कधी जमले नाही. भारताने कायमच चीनला १ नंबरचा शत्रू मानले आहे. समक्ष युद्धात पाकिस्तानला कधीही चिरडून टाकू, पण चीनशी कोणत्याही बाबतीत मुकाबला करणे भारताला अवघड आहे याची जाणिव भारताला आहे.

click here to buy

महासत्ता असलेल्या अमेरिकेला आशिया खंडात स्वतःचे अस्तित्त्व वाढवायचे आणि टिकवायचे तर भारत, पाकिस्तान आणि चीन यातील कुणाला तरी मित्रराष्ट्र बनवणे गरजेचे होते. चीन कायम महासत्ता असलेल्या अमेरिकेला आव्हान देत आलाय त्यामुळे त्यांचं जुळणे शक्य नव्हते. आपण रशियाच्या जवळ गेल्याने अमेरिकेने पाकिस्तानला उचलून धरले. तसे पूर्वीपासून अमेरिकेने आपल्याला कधीच गंभीरपणे घेतले नाही. पण १९९३ साली पंतप्रधान नरसिंह राव यांनी मुक्त अर्थव्यवस्था धोरणाचा स्विकार केल्यानंतर अमेरिकेला भारताच्या बाजारपेठेचं महत्त्व पटले. तरीही भारताने रशिया बरोबरची मैत्री धोक्यात घालून अमेरिकेशी जवळीक साधली नाही. किंबहुना अमेरिकेशी जवळीक साधताना रशिया दुखावला जाणार नाही याची सर्वाधिक काळजी घेतली. पण तरीही या दोस्तीत मिठाचा खडा पडलाच. साधारण १९९५ साली ठरलेल्या करारानुसार रशियाने भारताला क्रायोजनिक इंजिनं देण्यास स्पष्टपणे नकार दिला. रशियाचे हे वागणे त्यावेळी पंतप्रधान असलेल्या मा. नरसिंह राव यांच्या जिव्हारी लागले आणि त्यांनी शास्त्रज्ञांना भारतीय बनावटीची रशियापेक्षा उत्कृष्ट दर्जाची क्रायोजनिक इंजिनं बनवण्याचे आदेश दिले. त्यासाठी वाट्टेल ती मदत आणि लागेल तेवढा खर्च सरकार करेल असे सांगितले. त्याचबरोबर नरसिंह राव यांनी रशियाच्या नाकावर टिच्चून अमेरिकेशी मिग या लढाऊ विमानांचा करार करून अमेरिकेकडून मिग विमाने खरेदी केली. अभिमानाची बाब म्हणजे आपल्या शास्त्रज्ञांनी अवघ्या एक वर्षाच्या कालावधीत संपूर्ण भारतीय बनावटीचे उत्कृष्ट दर्जाचे क्रायोजनिक इंजिन बनवून रशियाच्या कानफटात तर मारलीच पण जगातूनही वाहवा मिळवली. तिथून पुढे मग भारताने पृथ्वी, अग्नी, आकाश, त्रिशूल, नाग अशी विविध क्षेपणास्त्रे बनवली. या कामगिरीनेच मा. डॉ. अब्दुल कलाम हे “मिसाईल मॅन” म्हणून ओळखले जाऊ लागले. झालेली चूक रशियाच्या लक्षात आल्यानंतर मग रशियाने सुखोई हे एक खतरनाक लढाऊ विमान ज्याचा धसका चीनने ही घेतला आहे ते भारताला देण्याची तयारी दाखवली व दिले सुद्धा. आता ही विमानं भारतीय हवाईदलाकडे आहेत. त्यानंतर भारत कायम रशिया आणि अमेरिकेचा ग्राहक बनला. पण २०१४ ला भारतात सरकार बदलले आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. त्यांनी आक्रमक परराष्ट्र धोरण आखाण्यास आणि राबवण्यास सुरुवात केली. रशियाची कमी झालेली ताकत आणि महासत्ता असलेल्या अमेरिकेची जगावर असलेली पकड लक्षात घेऊन मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाला काय वाटेल याची पर्वा न करता उघडपणे अमेरिकेच्या खांद्याला खांदा लावून उभे राहिले. आपल्या परराष्ट्र धोरणात त्यांनी अमेरिकेला प्राधान्य दिले. मा. पंतप्रधानांनी जगातील वेगवेगळ्या व्यासपीठावरून अमेरिकेला साद घातली आणि १२५ कोटी लोकसंख्या असलेल्या जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशाकडे दुर्लक्ष करणे तुम्हाला परवडणारे नाही हे ठासून सांगितले.
अमेरिकेचीही अर्थव्यवस्था डबघाईला आली होती. जग मंदीच्या लाटेचा सामना करत असताना भारतीय अर्थव्यवस्था खंबीरपणे विकासाकडे वाटचाल करत होती. त्यामुळे भारताकडे दुर्लक्ष करणे अमेरिकेला परवडणारे नाही हे अमेरिकेच्या लक्षात आले. त्याचबरोबर महासत्ता असलेल्या अमेरिकेला रशिया आणि चीन कायमच आव्हान देत आलेले आहेत भारत रशियापासून दुरावला आहे, चीनचे आणि भारताचे तितकेसे जमत नाही. प्रसंगी पाकिस्तान बरोबरच्या मैत्रीचा बळी देऊन भारतासोबत राहणे हे जागतिक राजकारणाच्या दूरदृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे हे अमेरिकेने ओळखले त्यामुळेच आज चीन आणि पाकिस्ताचा विरोध असतानाही अमेरिका भारताला एन. एस. जी. (NSG- nuclear suppliers group) चे सदस्यत्व मिळावे म्हणून भारताचे जोरदार समर्थन करत आहे. तर भारताने अण्वस्त्र बंदी करारावर स्वाक्षरी केली नाही त्यामुळे भारताला सदस्यत्व देता येणार नाही असा युक्तिवाद करून चीन आणि पाकिस्तानने भारताच्या सदस्यत्वाला विरोध केला आहे.तरीही भारत एक जबाबदार खोलवर लोकशाही व्यवस्था रुजलेले राष्ट्र असून भारताने जागतिक शांततेसाठी खूप योगदान दिले आहे. त्यामुळे अमेरिका भारताच्या सदस्यत्वासाठी खंबीरपणे भारताच्या बाजूने उभी आहे अशी जाहीर भूमिका अमेरिकेने घेतली आहे. त्यामुळे चीन आणि पाकिस्तानची गोची झाली आहे. त्याबरोबरच पाकिस्तानला अमेरिकेकडून जी एफ-१६ ही लढाऊ विमाने मिळणार होती जी पाकिस्तानची गरज होती ती विमाने ही आता मिळण्याची आशा संपुष्टात आली आहे. पाकिस्तानसाठी हा मोठा धक्का आहे. फाळणी झाल्यापासून जो पाकिस्तान अमेरिकेच्या भिकेवर जगत होता ती भिकही मिळणे आता बंद होणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानचा हा सगळ्यात मोठा पराभव आहे. वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेला हल्ला, त्यानंतर पाकिस्तानने लादेनला दिलेला आश्रय, अफगाणिस्तानातील हक्कानी, तालिबान अल्-कायदा या दहशतवादी संघटनांना असलेला छुपा पाठिंबा, भारतातील दहशतवादी कारवाया, अमेरिकेला आव्हान देऊ पाहणाऱ्या चीनशी जवळीक, तसेच लिबिया, उत्तर कोरिया आणि इराण या देशांना पाकिस्तानने अणुतंत्रज्ञान विकल्याचा खात्रीशीर संशय अमेरिकेला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय दहशतवादी कारवाया मध्ये पाकिस्तान मोठी भूमिका बजावत आहे याची खात्री अमेरिकेला झाली आहे. अमेरिकन जनता सुद्धा पाकिस्तानच्या विरोधी आहे. अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठीची निवडणूक आगामी कालावधीत होत आहे. त्या निवडणुकीसाठीचे एक आघाडीवर असलेले उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी उघड उघड इस्लामी दहशवाद व पाकिस्तान विरुद्ध आक्रमक भूमिका घेऊन भारताचे समर्थन केले आहे. त्याला अमेरिकन जनतेने जोरदार पाठिंबा मिळत आहे. हे ही इथं लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे अमेरिकेने आता आपली चूक सुधारून या ६५ वर्षाच्या मैत्रीला पूर्णविराम देण्याचे जवळजवळ निश्चित केले आहे. तसेही आता इसिस च्या दहशतवादी कारवाया मुळे रशिया आणि अमेरिकेचे संबंध तणावपूर्ण आहेत. चीन आणि अमेरिकेचे बिलकूल जमत नाही. ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, जपान हे अमेरिकेचे मित्रराष्ट्र असले तरी अमेरिकेपासून तसे थोडे अंतर ठेवूनच असतात. टोनी ब्लेयर ब्रिटनचे पंतप्रधान असताना त्यांनी अमेरिकेला आंतरराष्ट्रीय पातळीवर खंबीर पाठिंबा दिला होता. तालिबानी तसेच आखाती युद्धात अमेरिकेच्या मदतीसाठी ब्रिटनने आपल्या फौजा देखील पाठवल्या होत्या. नंतरच्या काळात ब्रिटननेही अमेरिकेपासून अंतर राखले. अशा परिस्थितीत आंतरराष्ट्रीय पातळीवर अमेरिकेला खंबीरपणे साथ देणारा मित्र म्हणून अमेरिका भारताकडे पाहत आहे. त्याचबरोबर भारताकडे असलेली मोठी बाजारपेठ काबीज करणे हा ही व्यापारी हेतू आहे. चीनवर अंकुश ठेवण्यासाठी भारताला बलवान बनवणे अमेरिकेच्या हिताचे आहे. भारत जेवढा मजबूत होईल तेवढा चीन कमजोर होईल हे अमेरिकेने लक्षात घेतले आहे. त्यामुळे अमेरिका एन.एस.जी. च्या माध्यमातून खंबीरपणे भारताच्या बाजूने उभी आहे. त्याचबरोबर संयुक्त राष्ट्रसंघाच्या कायमस्वरूपी सदस्यत्वासाठी ही अमेरिकेने वारंवार भारताचे समर्थन केले आहे हे भारताचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्वात मोठे यश आहे. अमेरिका आणि पाकिस्तानच्या ६५ वर्षाच्या या मैत्रीला मोदी यांनी अशा पद्धतीने सुरूंग लावला आहे. अमेरिका आणि पाकिस्तान या दोन दोस्तांच्या मध्ये तिसरे नरेंद्र मोदी गेले त्यामुळे दोघात तिसरा आता सगळं विसरा अशीच अवस्था पाकिस्तानची झाली आहे. यानंतर आता चीन आणि पाकिस्तान काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल तूर्तास तरी या कामगिरीसाठी पंतप्रधान मा. श्री नरेंद्र मोदी, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर तसेच अजित डोभाल यांचे अभिनंदन करायला हरकत नाही.

किशोर बोराटे.

आपले मत व्यक्त करा