भावनेचा बाजार, त्याला सत्तेचा आधार

भारत हा चमत्कारांचा देश आहे. इथं चमत्कार करणारावर लगेच विश्वास ठेवला जातो आणि त्याला नमस्कार ही केला जातो. भारताचा धार्मिक इतिहास फार मोठा आहे. तसेच तो चमत्कारांनी भरलेला आहे. भारताला संत-साहित्याची मोठी परंपरा आहे. पुरातन काळापासून अनेक पिढ्या न पिढ्या त्याची रसभरीत वर्णने ऐकत आपण आणि आपल्या अगोदरच्या व आता नंतरच्या पिढ्याही मोठ्या झाल्या, होत आहेत. भारतात लोकं जगण्याएव्हढेच महत्त्व धार्मिकतेला देतात. पण धार्मिकता आणि दांभिकता यातील अंतर पार करणे आपल्याला कधी जमले नाही. त्यामुळे पुनर्जन्मावर विश्वास असणाऱ्या भारतीयांनी अनेक राम-रहीम सारख्या बाबांना देव मानून त्यांचे शिष्यत्त्व पत्करले. त्यांच्या मागे सर्वप्रकारची मोठी ताकत उभी केली. मग बाबांनीही या अंध भक्तांना कधी डोळस तर केले नाहीच. पण त्यांच्या आंधळ्या भक्तीचा गैरफायदा घेत त्यांचे तन-मन-धन लुबाडले. यापूर्वीही अशा अनेक घटना घडल्या आहेत. पण लोकं सुधारत नाहीत. रोजच्या जगण्यातल्या अडचणी सोडवण्यासाठी कुठेतरी आशेने लोकं जातात. मग हे भोंदू बाबा भक्तांच्या भावनेचा गैरफायदा घेतात. पूर्वीचे साधू-संत विरक्त होते. पण आत्ताच्या या स्वयंघोषित साधूंची आसक्ती वाढली आहे. आत्ताचे हे बाबा आणि त्यांचे अंध भक्त यांच्या बद्दल काय बोलणार आणि किती बोलणार? पूर्वीचे साधू संत सर्व ऐषोआरामी जीवनाचा त्याग करून दूर जंगलात, राना-वनात जाऊन घोर तपश्चर्या करत होते. आत्ताचे हे राम-रहीम आणि आसाराम सारखे बाबा आपल्या करोडो रुपयांच्या एकदम हायफाय सुविधा असलेल्या आश्रमात घोरत पडतात. भक्त त्यांच्याकडे त्यांच्या अडचणी घेऊन जातात. ते बाबा काही-बाही सांगतात. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो. सकारात्मकता वाढते. त्याद्वारे त्यातील अनेकांची कामं होतात. त्यांना वाटते बाबांच्या आशिर्वादामुळे झाले. मग इतरांनाही तिकडे येण्यास प्रवृत्त केले जाते. त्यामुळे जवळीक वाढते. भक्ताचे रूपांतर कट्टर भक्तात आणि पुढे जाऊन कट्टर शिष्यात होते. बाबाची मर्जी संपादन करण्यासाठी आणि मी किती कट्टर आहे हे दाखविण्यासाठी टोकाचे प्रयत्न केले जातात. तिथून पुढे मग भक्तीचे रूपांतर मानसिक आणि शारीरिक गुलामगिरीत कधी होते ते कळत नाही. ज्यावेळी ते समजते तेंव्हा खूप वेळ झालेला असतो. गुलामाचे काम असते फक्त आदेश ऐकणे. डोळे असून पाहायचे नाही. कान असून ऐकायचे नाही आणि तोंड असून बोलायचे नाही. चुकून जर एखादा बोलला तर त्याचे कायमचे तोंड बंद केले जाते. त्याच्या ना किंकाळ्या आश्रमाच्या बाहेर येतात, ना त्याची बॉडी येते.

Click on image to BUY

बाबाचे प्रस्थ मोठे असते. अनेक राजकीय लोकांची त्यांच्याकडे ऊठ-बस असते. त्यात सत्ताधारी असतात, विरोधक असतात. सर्वपक्षीय नेते मंडळी, मंत्री, मोठे अधिकारी, पोलिस अधिकारी सगळेच आले. काही बाबाना तर अगदी Z+ सुरक्षा व्यवस्था असते. शेकडो एकर जागेत त्यांचे हायफाय आश्रम असतात. अनेकदा सरकारी जागेत पण असतात. सर्वांची ऊठबस तिथे असल्याने अनेक राजकीय गणित ही बाबांच्याच हायफाय आश्रमात गुप्त चर्चा करून सोडवली जातात. नरसिंह राव पंतप्रधान असताना असेच चंद्रास्वामी नावाच्या बाबाचे फॅड खूप वाढले होते. राजकीय वर्तुळात त्याचा मोठा दबदबा होता. या अशा मोठमोठ्या दबदब्याखाली अनेक गोष्टी दाबल्या जातात. राजकीय आश्रय मिळाल्याने यांचे जास्त फावते. तशाच या राम-रहीम बाबाच्या दाबल्या गेल्या. याच्या दंतकथा जरी बाहेर कधी चर्चेला आल्या तरी त्याचा फारसा काही परिणाम बाबावर जाणवत नसतो. असे जे बाबा असतात त्यांचे लाखो भक्त असतात. भारतात लोकंही नेता, अभिनेता आणि बाबा यांच्या कार्यक्रमालाच फार गर्दी करतात. अशा बाबांच्याकडे भक्तांचा जो मेळा असतो त्यांची संख्या लाखोंच्या घरात असते. त्यामुळे मतांच्या लालसेपोटी राजकीय नेत्यांची नजर अशा बाबांच्यावर गेली नाही तर ते नवलच म्हणावे लागेल. त्यामुळे मग एका व्यासपीठावर येणे, एकमेकांना हार घालणे, एकमेकांचे कौतुकाचे पूल बांधणे सर्वकाही सुरू होते. नेत्यांना बाबाचा आशिर्वाद मिळतो. कोणत्या नेत्याच्या डोक्यावर बाबाचा हात आहे हे भक्तांना बरोबर कळते. आतातर काही बाबा उघडपणे राजकीय व्यासपीठावर येऊन राजकीय पक्षांच्यासाठी घसा कोरडा पडेपर्यंत ओरडून प्रचार करत आहेत. दोघांनाही मग एकमेकांच्या कमजोऱ्या माहिती होतात. तिथून पुढे मग तू माझं खाजव, मी तुझं खाजवतो असे प्रकार चालू होतात.

अशा पद्धतीने बाबाने एक राजकीय उंची गाठलेली असते. त्यामुळे मग बाबा निर्ढावतो. सगळी सरकारी यंत्रणा त्याच्या खिशात असते मग कोण काय आपलं वाकडं करणार? असा अहंकार जेंव्हा बुद्धीची जागा घेतो. तेंव्हा बाबाची सगळी भीड मारून जाते आणि मग जागी होते ती वासना. ज्या महिला श्रद्धेने तिथे राबत असतात. आश्रमात सेवा करत असतात. त्यांची बदली आश्रमातून थेट बाबाच्या शयनकक्षात होते. शिष्याची दासी व्हायला वेळ लागत नाही. काही शिष्या स्वतःच्या मर्जीने तयार होतात, तर काही बाबाच्या मर्जीने होतात. बाबाचा दराराच एवढा असतो की एखादी तयार झाली नाही तरी तिला जबरदस्तीने तयार केले जाते. तिच्या किंकाळ्या आश्रमाच्या बाहेर जात नाहीत. एवढे ते आश्रम साऊंड प्रूफ बनवलेले असतात. कारण सत्ता, संपत्ती अफाट असते. मॅन पावर असते. एखादीच्या मनाविरुद्ध घडले तरी तोंड उघडण्याची सोय नसते. अन्यथा कायमचे तोंड बंद होते. अशी काही उदा. तिच्याही डोळ्यासमोर असतात. या सर्व गोष्टी नित्यनियमाने चालू असतात. बाबाचे प्रस्थ राज्याच्याही सीमा ओलांडून इतर राज्यात गेलेले असते. लाखो भक्त आणि शेकडो आश्रम बाबाची ताकत दिवसेंदिवस वाढवतच असते. याच्या जोरावरच मग अध्यात्म हा एक व्यवसाय होऊन जातो. बघता बघता बाबाचा कधी व्यावसायिक होतो हे ही कळत नाही. त्यामुळे आवक आणि आवाका मोठा असतो. त्याचबरोबर इकडे पापांचा घडा ही भरत चाललेला असतो. पण सत्ता, संपत्ती आणि वासना यांच्या नशेत वावरणाऱ्या आणि प्रवचन ऐकायला जमलेल्या हजारो-लाखो भक्तांच्यामुळे बाबा हवेत असतो. त्या धुंदीत असतानाच मग असे काही विपरीत घडते की भक्ताची गुलाम झालेली दासी तिला कोणी मार्गदर्शक भेटतो आणि तो तिचा स्वाभिमान जागा करतो. मग ती लढायला तयार होते. तिथून पुढे मग बाबाच्या पत्रिकेतील सर्व ग्रह बाबाला वक्री होतात. जी अबला बाहेर आल्यावर सबला होते ती एकटी बाहेर येत नाही. ती बाबाची कुंडली घेऊन बाहेर येते. मग सुरू होते ती लढाई. हरतऱ्हेने बाबा ते प्रकरण दाबायला बघतो. पण प्रत्येक गोष्टीला एक अंत असतो. हायफाय आश्रमातून बाबाची रवानगी सरकारी बिनभाड्याच्या खोलीत होते. तेंव्हा भक्तांची अवस्था केविलवाणी होते. काल रामरहीम बाबाला जेंव्हा कोर्टाने दोषी ठरवले तेंव्हा या भक्तांनी जो राडा केला त्यात दोन्ही प्रकारचे भक्त असतात. खरी श्रद्धा ठेवणारे ही असतात आणि बाबाचे कारनामे माहिती असलेले बाबाच्या आतल्या गोटातीलही असतात. त्यांना बाबाचे गुंडच म्हणावे, कारण बाबासाठी ते खून करायलाही कमी करत नाहीत. या आतल्या गोटातील लोकांनाही या बाबाकडून बराच फायदा झालेला असतो आणि अन्नदाताच आत गेला तर पुढचं कसं होणार या धास्तीने ते सैरभैर झालेले असतात. तर काही श्रद्धेपोटी, भावनेपोटी सैरभैर होऊन रस्त्यावर दंगा करणे, गाड्या फोडणे, जाळणे, पोलिसांच्या वर हल्ले करणे असे प्रकार करतात. मग त्या राड्यात काही भक्त जीव गमावून बसतात. पण अनेक निरपराध ज्यांचा याच्याशी काही संबंध नसतो तेही बळी पडतात. अशा लोकांचा पोलिसांनी कठोरपणे सामना करायला हवा. पण त्यांचेही हात बांधलेले असतात. बाबानं भावनेचा बाजार मांडलेला असतो त्याला सत्तेचा आधार असतो. त्यामुळे पोलिसांना मुक्तपणे कारवाई करता येत नाही. त्यातच साक्षी महाराजासारखे काही बिनडोक लोकं अशा बाबाचे समर्थन करतात तेंव्हा संताप होतो. पण निरपराध लोकांचा बळी जाणे, त्यांच्या संपत्तीचे नुकसान होणे. काल घडलेल्या या सर्व घटना पाहिल्या तर पोलिसांनी अशा आक्रमक भक्तांना आवरण्यासाठी कठोर पावलं उचलायला हवीत. निरपराध माणसं मरण्यापेक्षा दंगेखोर मेले तरी चालतील. असे झाल्याशिवाय हे प्रकार थांबणार नाहीत. कारवाई करताना तो बाबा भोंदू आहे, गुन्हेगार आहे. एवढेच पोलिसांनी लक्षात ठेवावे. त्याची जात अथवा धर्म कोणता आहे याकडे लक्ष देऊ नये. अशा भोंदू बाबाच्या वर कडक कारवाई करावी की जेणेकरून इथूनपुढे असे प्रकार होणार नाहीत. *जयहिंद*

किशोर बोराटे.

नियमित ब्लॉग्स वाचण्यासाठी खाली आपला ई-मेल आय डी टाकून subscribe करा, त्यानंतर आपल्याला मेल येईल, तो confirm follow करा.

ब्लॉग विषयी आपल्या कमेंट्सचे स्वागत आहे.

One comment

  1. अध्यात्म चा अभ्यास केला किंवा केला गेला तर अशा बाबांच्या आहारी जाणारच नाही लोक. पण अध्यात्म न जाणता केवळ भौतिक सुखांच्या मागे धावणारे अशा स्वयंघोषित बाबांच्या जाळ्यात अडकतात. कारण भौतिक सुखातच आत्मिक सुख शोधणारे दांभिक बाबांचे भक्त ही भक्ती न जाणणारे दांभिक भक्तित लिन झालेले असतात.

आपले मत व्यक्त करा