अति आत्मविश्वास नडला – तिसरा डोळा भाग -६१


अति आत्मविश्वास नडला

किशोर बोराटे @

२०१३ पासून भक्तांनी जे पेरले, तेच आज उगवले. राग येऊन करणार काय? त्यावेळेपासूनचे ते फोटोशॉप, त्यातील मजकूर, विरोधी पक्षाच्या नेत्यांची मानहानी करताना त्यांनी कुठेही कसर ठेवली नव्हती. मग आज टीका झाली, चार फोटो आले तर त्याचा राग का यावा? राजकारणातल्या मान-मर्यादा आत्ताच समजल्या का? २०१४ ला जे सरकार सत्तेत आले ते केवळ मोदी आणि शहा यांच्यामुळेच आले नाही, तर २०१४ च्या सरकारची मुहूर्तमेढ आण्णा हजारे यांनी २०१३ साली प्रचंड मोठे आंदोलन करूनच रोवली होती. काँग्रेसचा भ्रष्टाचार, घोटाळे, लोकपाल, निर्भया बलात्कार आणि हत्या या आणि अशा अनेक घटनांनी जनता संतापली होती. पण काँग्रेस विरोधात खऱ्या अर्थाने नकारात्मक वातावरण आण्णांनी तयार केले. दिल्लीत चालू झालेले ते आंदोलन एवढे व्यापक झाले की केवळ देशभरातूनच नव्हे तर जगभरातून त्याला प्रचंड पाठिंबा मिळाला आणि त्यातूनच आण्णा लाट तयार झाली. अण्णांच्या रूपाने काँग्रेस विरोधात तयार झालेले नकारात्मक वातावरण आणि निर्माण झालेली आण्णा लाट याचा फायदा भाजपाने उचलला नसता तरच नवल. संघाच्या मार्गदर्शनाखाली भाजपाने प्रचाराचे केलेले हायटेक ब्रँडिंग आणि आपल्या अमोघ व आक्रमक वक्तृत्वाने मोदींनी ही आण्णा लाट हायजॅक करून तिचे कधी मोदी लाटेत रूपांतर केले हे कुणाला समजलेच नाही. बिन चेहऱ्याची लोकं ही तेंव्हा या लाटेत निवडून आली. एकंदर आण्णा हजारे यांचे आघाडी सरकार विरोधातील आंदोलन, आघाडी सरकारचा भ्रष्टाचार आणि संघाच्या मार्गदर्शनाखाली मोदी- शहा यांनी केलेला हायटेक आक्रमक प्रचार यामुळे २०१४ ला मोदी पूर्ण बहुमतात सत्तेत आले. भक्तांचा जन्मही त्याचवेळी झाला. २०१४ च्या प्रचारात भरमसाठ अविश्वसनीय आश्वासने दिली गेली. तिथून पुढे यांचा निवडणूक ज्वर कधी उतरलाच नाही. आता ५ वर्षे पूर्ण होत आली तरी नुसतीच आश्वासने चालू आहेत. मागे दिलेली आश्वासने किती पूर्ण झाली? याचा काही मागोवा नाही, तरी पुढे आश्वासने चालूच राहिली.

या ५ राज्यातील पराभवाचे जे मुख्य कारण आहे ते म्हणजे भाजपाला स्वतःबद्दलचा अतिआत्मविश्वास नडला. तसेच इतरांना कमी लेखण्याची वृत्ती त्यांच्या अंगलट आली. काँग्रेसला भ्रष्टाचाराचा महामेरू म्हणणाऱ्यांनी कॉंग्रेसच्या काळातला किती भ्रष्टाचार उघडकीस आला? किती जणांना जेलमध्ये पाठवले? स्मार्ट सिटीचे काय झाले? मेक इन इंडियाचे काय झाले? नोटबंदी आणि जीएसटी याबाबत तर कायम संशयाचे वातावरण आहे. आजही लोकांना कळेना की त्याचा नक्की काय फायदा झाला? मोदींना सगळ्यात मोठा फटका हा त्यांच्या आर्थिक नीतीचा आणि अहंकारी स्वभावाचा बसला. वेळोवेळी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर बदलत गेले. राजन यांना काढून उर्जित पटेलांना आणण्यात आले. त्यांनीही राजीनामा दिला. बरोबरच्या सहकाऱ्यांच्यावर आणि प्रशासनावर वचक ठेवण्यासाठी म्हणून थोडे कठोर राहायलाच हवे. पण त्याचा अतिरेक होऊ नये. त्याचा समन्वय साधता यायला हवा. राफेल कराराबाबत असेच संशयाचे वातावरण तयार झाले. सीबीआय, ईडी यांची भीती दाखवून विरोधकांची मुस्कटदाबी करण्यात आली. मिडियावर अंकुश ठेवण्यात आला. काश्मिर प्रश्नांबाबत काहीही सकारात्मक घडले नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अनेक उद्योगपती हजारो कोटी रु. बुडवून देशाबाहेर पळून गेले. जनतेला एक आशा होती की आता हे मनमोहन नाहीत तर मोदी आहेत म्हणजे त्यांना फरफटत ओढून आणतील. पण तसे काही घडताना दिसले नाही. अंबानी-अदानी यांच्यावर जास्तच मेहेरबानी दाखवली जात असल्याबद्दल पण लोकांची नाराजी होती. विकासाच्या नावाने बोंब असताना केवळ लाखो-करोडों कोटींचे आकडे जनतेच्या तोंडावर फेकून विकासाचे फेक चित्र निर्माण करण्यात आले. केवळ घोषणा होत होत्या, पण प्रत्यक्षात विकास कुठेच दिसत नव्हता. कर्जबाजारीपणा मुळे इकडे शेतकरी आत्महत्या करीत असताना इकडे ३००० कोटींचा वल्लभभाई पटेलांचा पुतळा उभारला जात होता. शेतकऱ्यांना हमीभावाचे गाजर दाखवले, पण प्रत्यक्षात असा हमीभाव मिळालाच नाही. नाहीतर आज कांद्याची अशी अवस्था झालीच नसती. शेतकरी इकडे हलाखीत जीवन जगत असताना तिकडे ८०००-१०,००० कोटी खर्च करून समुद्रात शिवस्माकाचा घट घातला. त्यात ही काही प्रगती नाही. त्याउलट महाराजांचे किल्ले इकडे दयनीय अवस्थेत शेवटची घटका मोजताहेत त्याकडे सपशेल दुर्लक्ष करण्यात आले. आघाडी सरकारच्या काळात वाढत्या पेट्रोल-डिझेलच्या व गॅस सिलेंडर दराच्या विरोधात तेंव्हा भाजपा अतिशय आक्रमक झाला होता. तोच भाजपा आता सत्तेत आल्यानंतर इंधन आणि गॅस दरवाढ रोखू शकला नाही. दर पूर्वीपेक्षाही वाढले. आरक्षणाचा घोळ अद्याप संपत नाही. इथे लोकांना चालायला नीट रस्ते नाहीत. दरवर्षी रेल्वे अपघातात १५,००० पेक्षा जास्त लोकं मृत्युमुखी पडतात. मुंबईच्या लोकलची, स्टेशन्सची दुर्दशा झाली असताना तिकडे १ लाख करोड पेक्षा जास्त पैसा खर्च करून बुलेट ट्रेनचा घाट घातला जातोय. जिकडे पहावे तिकडे नुसता विरोधाभास आहे. त्यातच नेत्यांची मंत्र्यांची बेताल वक्तव्य या आणि अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आत्ताच्या आणि गेल्या काही निवडणूकीत सरकारच्या अंगलट आल्या आहेत.

आत्ता या ५ राज्यांच्या निवडणूकीपूर्वी राम मंदिराचा ड्रामा करण्यात आला. ओवेसी याच्या माध्यमातून हिंदू-मुस्लिम असे धार्मिक ध्रुवीकरण मोठ्या प्रमाणात करण्याचा प्रयत्न करण्यात आला. जातीय गणितं तपासण्यात आली. निवडणूका राज्यातल्या स्थानिक प्रश्नांवर व्हायला हवा होत्या. पण त्यात केंद्रातले आणि बाहेरच्या राज्यातले नेते बोलवून नको ते मुद्दे चर्चेत आणण्यात आले. राज्यातले प्रश्न दुर्लक्षित करण्यात आले. व्यक्तिगत मानहाणीवर फोकस करण्यात आला. मोदींना नको एवढे expose करण्यात आले. त्यांच्या भाषणातही आता काही नावीन्य राहिले नाही. ५ वर्षे तुम्ही सत्तेत आहात. तुम्ही चांगले काय काय केले हे सांगायचे सोडून गांधी-नेहरूंनी काय वाईट केले हेच रडगाणे मोदी गात बसले. तेच तेच ऐकून जनताही आता कंटाळली आहे. सोशल मिडियावर भक्तांनाही अक्षरशः उच्छाद मांडला होता. त्यांना वाटले २०१४ ची पुनरावृत्ती इथेही होईल. पण आता विरोधी पक्षाचे कार्यकर्ते ही त्यात चांगलेच तरबेज झाले होते. त्यांनी जशास तसे उत्तर दिले. सोशल मिडीयावरील भक्तांचे उद्दाम वागणे ही भाजपाच्या पराभवाचे कारण बनले आणि याचा अंदाज खुद्द पंतप्रधान मोदी यांनाही आला होता. त्यामुळे २-३ महिन्यांपूर्वीच सोशल मिडीयाचा वापर कुणाला बदनाम करण्याकरता करू नका. सर्वांशी नम्रपणे वागा असा सल्ला दिला होता. पण भक्तांनी त्याला केराची टोपली दाखवून आपला उद्दामपणा चालूच ठेवला. प्रचारात अनेकदा भाजपाकडून मुद्दे divert करण्यात आले पण काँग्रेस आणि इतर पक्षांनी तेथील स्थानिक प्रश्नांवर आणि मोदींच्या अपयशावरच जनतेचे लक्ष वेधले. त्याचे चांगले सकारात्मक परिणाम काँग्रेसला विजयाच्या रूपाने मिळाले. आशा आहे की झालेल्या पराभवातून भाजपा नेतृत्त्व, नेते आणि संघ आत्मपरीक्षण करतील आणि जो सपाटून पराभव झाला आहे त्यातून मार्ग काढतील. त्यासाठी आता त्यांना सहकारी पक्षांनाही विश्वासात घ्यावे लागेल. सहकारी पक्ष असतील, त्याचबरोबर जे काही प्रादेशिक पक्ष असतील यांना जी भाजपाकडून आणि भक्तांच्याकडून जी हिणतेची, अपमानास्पद वागणूक दिली जाते त्यांच्या नेत्यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन बोलले जाते त्यानेही लोकं दुखावली जातात हे त्यांच्या लक्षात येत नाही. दुसऱ्याची मानहानी करून स्वतःचे समाधान करून घेण्यापेक्षा सरकारने जी काही केलेली कामं आहेत ती जनतेपर्यंत पोहोचवली असती तर आज ही वेळ आली नसती. हिंदुस्थानातील हिंदूत्त्व केवळ मोदी यांच्यावरच टिकून आहे ही भक्तांची अंधश्रद्धा आहे. मोदी यांच्यामुळे हिंदूत्त्व टिकून नाही, तर हिंदुत्त्वामुळे मोदी आहेत हे भक्तांनी लक्षात घ्यावे. लोकसभा तोंडावर आहे. त्याबरोबर विधानसभा घेण्याचा विचार बहुधा आता मागे पडेल. वेळ कमी राहिला आहे आणि लोकसभा जिंकायची तर भाजपाला आता फार मोठी तयारी करावी लागेल. ही तयारी ते कसे करतात आणि लोकसभा निवडणूकीत कसे यश मिळवतात हे पाहणे महत्त्वाचे आहे.प्राप्त परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी भाजपाला काहीतरी मोठे करावे लागेल आणि त्यादृष्टीने आता विचार चालू झाला असावा असे वाटते. या निवडणूकांमध्ये जरी भाजपाचा पराभव झाला असला तरी लगेच त्यांना कमी लेखणे मूर्खपणाचे ठरू शकते. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या गणितं वेगवेगळी असू शकतात. तरीही येत्या काळात मोदी-शहा यांनी जमिनीवर राहून परिस्थिती व्यवस्थित हाताळून डॅमेज कंट्रोल केले तर त्याचा सकारात्मक परिणाम निश्चितपणे लोकसभेला दिसू शकतो. इथुनपुढे देशात राजकीय हालचाली गतिमान होतील हे मात्र निश्चितच आहे. धन्यवाद

जयहिंद, जय महाराष्ट्र

One comment

  1. बरोबर, अहंकार आणि अति आत्मविश्वास…

आपले मत व्यक्त करा