झारीतले शुक्राचार्य कोण? भाग- २

टायमिंगचा बादशहा म्हणून ओळखले जाणारे राज ठाकरे यांचे लोकसभा निवडणुकीपासून टायमिंग चुकत होते. आता शिवसेनेसमोर युतीचा प्रस्ताव ठेवून त्यांनी अगदी योग्य टायमिंग साधले आहे. सेनेची अवस्था सध्या धरलं तर चावतंय अन् सोडलं तरी अंगावर येतंय अशी झाली आहे.
सध्याच्या परिस्थितीत सेना स्वबळावर मुंबई महापालिकेची निवडणूक जरी लढत असली तरी त्यांना बहुमत मिळण्याची शक्यता कमी आहे. अशावेळी जरी जास्त जागा मिळवून सेना नंबर १ ला आली तरी सत्तेसाठी परत कटोरा घेऊन त्यांना भाजपाच्या दारात जावे लागेल. भाजपा बरोबर एवढे पराकोटीचे वाद झाल्यावर जर उद्धव यांनी भाजपाचा पाठिंबा घेतला तर ते शिवसैनिकांना आणि मराठी माणसालाही रुचणार नाही. अशा परिस्थितीत मग जरी भाजपाने पाठिंबा दिला तरी मग आत्ता जसे उद्धव राज्य सरकारमध्ये सहभागी होऊन सरकारला सतत विरोध करत आहेत तसेच धोरण मग भाजपा सुद्धा महापालिकेत अवलंबेल आणि यांचे जर रोज उठून वाद चालू झाले तर मग वचननामा धूळ खात पडून राहील.

मनसेचा पाठिंबा घेऊन जर सेनेची सत्ता येत असेल तर मग आत्ता ज्या सेनेने युतीचा प्रस्ताव घेऊन दारी आलेल्या मनसेला दारातून माघारी पाठवले उद्या सेनेला त्यांच्याच दारात जावे लागेल. मनसेचा युतीचा प्रस्ताव फेटाळताना उद्धव साहेब हे विसरले की गेल्यावेळी ठाणे महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी मनसेने शिवसेनेला मदत करावी म्हणून सेनेचे तीन आमदार एकनाथ शिंदे, आमदार प्रताप सरनाईक आणि अजून कोणी एक आमदार राज यांच्या दारी गेले होते. त्यावेळी राज यांनी कोणतेही आढेवेढे न घेता सेनेला ठाणे आणि अंबरनाथ मध्ये बिनशर्त पाठिंबा दिला. आत्ता उद्धव यांनी घरात असूनदेखील बाळा नांदगावकर साहेबांना साधी भेट देखील दिली नाही. राजकारणात एवढा अहंकार असून चालत नाही. राजकारणात नेहमी बेरीज केलेली फायदेशीर ठरते विचारा शरद पवारांना. आत्ता उद्धव यांचा त्यांच्या बाजूच्या झारीतील शुक्राचार्यांनी एकच समज करून आहे तो म्हणजे राज यांचा पक्ष अडचणीत आहे म्हणून ते मागे लागलेत. होय, हे सत्य आहे. पण हे अर्धसत्य आहे. कोणत्याही एका घटनेला अनेक संदर्भ असतात. तसे युती होण्याला पण आहेत. युती का व्हावी यासाठीची अनेक कारणे देता येतील. पण का होऊ नये यासाठी एक अहंकार सोडला तर दुसरे कोणतेही कारण नाही? एकूण मुंबईच्या लोकसंख्येच्या फक्त २२% लोकसंख्या मराठी माणसांची आहे. उत्तरभारतीय २२% गुजराती-मारवाडी १८% मग अशा परिस्थितीत मराठी मतांची विभागणी होऊन पालिकेत भाजपाचा महापौर बसू नये हीच राज ठाकरे यांची तसेच मराठी माणसांची पण भावना आहे. पण अहंकार आणि बुद्धी एकत्र नांदत नाही म्हणतात तेच खरे आहे. सेना-मनसे युतीची चर्चा चालू झाल्यापासून हे झारीतील म्हणा किंवा मातोश्रीवरील शुक्राचार्य चांगलेच सावध झालेत. युतीचा प्रस्ताव घेऊन आलेल्या बाळा नांदगावकर यांना त्यांनी उद्धव साहेबांना भेटून देखील दिले नाही. दोन्ही भाऊ एकत्र येण्याचा किंवा दोन्ही पक्षातील युतीचा जरासुद्धा प्रकाश आत जाऊ नये यासाठीची खबरदारी म्हणून ही वटंवाघळं कायम मातोश्रीवरच उलटी लटकलेली असतात.

click on image to buy

उद्याच्या राजकारणात काहीही घडू शकते. सेना किंवा भाजपा अशी वेळ आली आणि उद्या जर राज यांनी भाजपाला पाठिंबा दिला तर त्यांनाही दोष देता येणार नाही. कारण युतीचा प्रस्ताव घेऊन आलेल्या मनसेला शिवसेनेने बाहेरचा रस्ता दाखवला आहे. अशा वेळी आता राज यांच्यापुढे सर्व पर्याय खुले आहेत. ते भाजपाशी निवडणूक पूर्व किंवा निवडणूकीनंतर युती करू शकतात. तसेच थेट निवडणूक पूर्व युती केली नाही तरी काही ठिकाणी भाजपा आणि मनसे मध्ये अंतर्गत तडजोड देखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेवटी हे राजकारण आहे आणि मनसे सुद्धा एक राजकीय पक्ष आहे. त्यांना त्यांच्या राजकारणासाठी योग्य ती पावले उचलावीत लागतील. एक चांगली संधी मात्र सेनेने गमावलीच आहे. पण उद्या जर भाजपाचा महापौर मुंबई महापालिकेत बसला तर मराठी माणूस शिवसेनेला आणि उद्धव साहेबांना कधीही माफ करणार नाही. अजूनही वेळ गेलेली नाही. मराठी माणसाच्या मूळावर
उठलेले हे जे कोणी झारीतील शुक्राचार्य आहेत त्यांना बाजूला सारून उद्धव यांनी मराठी माणसाच्या हितासाठी राज यांचा युतीचा प्रस्ताव स्विकारावा. दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ होऊ नये.

किशोर बोराटे.

आपले मत व्यक्त करा