झारीतील शुक्राचार्य कोण?

असं म्हणतात काही लोकांना इतर कुणी पराभूत करण्याची गरज नसते. त्यांचा अहंकारच त्यांना पराभूत करतो. परवा भाजपचे मुंबई अध्यक्ष मा. श्री आशिष शेलार यांनी महाभारतातील दुर्योधनच्या अहंकाराचे दिलेले उदा. पक्षप्रमुखांनी अगदी तंतोतंत कसे खरे आहे हेच आज सिद्ध करून दाखवले. एका सुईच्या टोकावर बसेल एवढी सुद्धा जमिन मी पांडवांना देणार नाही. असे सांगतानाच युद्ध टाळण्यासाठी आलेल्या श्रीकृष्णाची शिष्टाई दुर्योधनाने जशी फेटाळून लावली तशीच शिष्टाई घेऊन काल मनसेचा श्रीकृष्ण बाळा मा. पक्षप्रमुखांच्याकडे गेला पण सच्चा शिवसैनिकांचे आणि मनसैनिकांचे तसेच मराठी माणसाचे दुर्दैव त्यालाही श्रीकृष्णा प्रमाणेच खाली हात परत यावे लागले.* भाजपा-सेना युती तुटल्यानंतर राज यांच्यापुढे युतीसाठी दोन पर्याय होते, एक शिवसेना आणि दुसरा भाजपा. भाजपा नेत्यांना प्रथमपासूनच वाटते की राज यांनी भाजपा बरोबर युती करावी. *आता सेनेने भाजपा बरोबरची गेली २५ वर्षे चालत आलेली युती मोडल्याने तर राज यांच्या बरोबरची युती भाजपाला फायद्यातच पडली असती. पण तरीही राज यांनी प्रथम घरातला पक्ष म्हणून बंधू प्रेमाला जागत रक्ताच्या नात्याला महत्त्व देऊन उद्धव यांनाच साद घातली.* विधानसभेच्या वेळी सुद्धा राज-उद्धव यांच्यात फोनवरून थेट चर्चा झाली आणि युती करण्याचे ठरले. ठरल्यानुसार मनसेकडून बाळा नांदगावकर आणि सेनेकडून अनिल देसाई हे चर्चा करणार होते. पण दोन दिवस बाळा नांदगावकर यांनी प्रयत्न करूनही अनिल देसाई यांनी चर्चेला येण्यास टाळाटाळ केली. युती होईल या आशेने राज यांनी उमेदवार जाहीर केले नव्हते की AB फॉर्म पण वाटले नव्हते. संपूर्ण राज्यातून मनसेचे पदाधिकारी फॉर्म नेण्यासाठी राजगड कार्यालयाच्या बाहेर येऊन थांबले होते. वेळ कमी राहिला होता. इतर पक्षांचे बऱ्यापैकी उमेदवारी अर्ज भरून झाले होते. सेनेकडून कसलाच प्रतिसाद मिळत नव्हता. शेवटी राज यांनी बाळा नांदगावकर यांना सांगितले नाद सोडून दे, आता वाट पाहू नकोस फॉर्म वाटून टाक. पहिला अनुभव असा येऊनही आज राज यांनी परत उद्धव यांच्या बरोबर युती करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे.

पण तरीही राजसाहेबांनी बाळा नांदगावकर यांच्या मार्फत पाठवलेला युतीचा प्रस्ताव मा. उद्धव साहेबांनी सपशेल धुडकावून लावला आहे. *काल बाळा युतीचा प्रस्ताव घेऊन मातोश्री वर गेल्याचे सर्व महाराष्ट्राने पाहिले आहे. आज सायं. मा. बाळा नांदगावकर यांनी जाहीर पत्रकार परिषद घेऊन कबूल देखील केले की होय, मी मा. राजसाहेबांच्या आदेशानूसार युतीचा प्रस्ताव घेऊन मातोश्रीवर गेलो होतो. तिथे सुभाष देसाई, अनिल देसाई, परब, मिलिंद नार्वेकर आणि इतर नेत्यांना भेटलो. उद्धव साहेब घरातच होते, पण या नेत्यांनी माझी उद्धव साहेबांशी भेट होऊ दिली नाही. ते बोलले आमच्याकडे निरोप द्या, आम्ही उद्धव साहेबांना सांगतो. पुढे बोलताना बाळा यांनी असेही सांगितले की, कदाचित मा. उद्धव साहेबांची आणि माझी थेट भेट झाली असती तर काहीतरी सकारात्मक घडले असते. हे जर असे असेल तर मग यावरून शिवसैनिकांनी व राजसैनिकांनी तसेच मराठी जनतेने जे काय समजून घ्यायचे ते घ्यावे. यापुढे बोलताना बाळा यांनी जी माहिती दिली ती खरोखरच मराठी जनतेला संताप आणणारी आहे की स्वतः राजसाहेबांनी मा. उद्धव साहेबांना २२ तारखेपासून ६ वेळा फोन केला पण त्यांनी एकदाही फोन घेतला नाही.*

एवढा जर अहंकार असेल तर मग युती तुटली म्हणून भाजपाला दोष देण्यात तरी काय अर्थ आहे? मनसेमुळे मराठी मतांची विभागणी होते असा आरोप करणारे उद्धव ठाकरे आता का गप्प? का पुढे येत नाहीत? भाजपाचेही सोडा, *राज यांनी भाजपाला बाजूला ठेवून सेनेशीच युती करण्याचे का ठरवले? मान्य आहे मनसेची ताकत कमी झाली आहे. मग ती फक्त सेनेकडेच जाऊन वाढणार आहे का? भाजपाकडे गेले तरी दोघांचा लाभ एकमेकांना होणार आहे. सेनेशी युती केली तरी त्याचा फायदा दोघांनाही होणार आहे. राज यांनी दूरदृष्टीने विचार केला. त्यांनी मराठी माणसाचे मन ओळखले जे उद्धव साहेबांना ओळखता आले नाही. एवढी वर्षे झाली मुंबई महापालिका सेनेच्या ताब्यात आहे. आत्तापर्यंतची गोष्ट वेगळी होती. आता भाजपा एक मजबूत पर्याय बनून पुढे आला आहे. सेनेपुढे खऱ्या अर्थाने भाजपाचे मोठे आव्हान उभे आहे. अशावेळी सेनेला साथ दिली तर महापालिकाही सेनेच्या ताब्यात राहील आणि महापौर ही मराठी माणूस होईल. जी मराठी माणसाची इच्छा आहे ती पूर्ण होईल. समजा आपण सेनेचा विचार न करता भाजपाला साथ दिली आणि महापालिकेतील सेनेची सत्ता जाऊन तिथे भाजपाचा महापौर झाला तर सेना हरल्याचा दोष आपल्यावर येईल आणि योग्य वेळी जर राजने उद्धवला साथ दिली असती तर आज महापालिका सेनेच्या ताब्यात राहिली असती असे मराठी जनता बोलली असती. हे घडू नये म्हणून राज यांनी समंजसपणे युतीसाठी प्रयत्न केले. पण उद्धव साहेबांना तसेच मातोश्रीवरील झारीतल्या शुक्राचार्यांना ते नको होते. दुर्दैवाने पूर्ण अहंकारात बुडालेल्या उद्धव साहेबांनी त्याकडे सपशेल दुर्लक्ष केले आणि परत एकदा राज-उद्धव या दोन्ही भावंडांना एकत्र येण्यापासून रोखण्यात मातोश्रीवरील झारीतील शुक्राचार्यांना यश आले.* युतीचा प्रस्ताव उद्धव साहेबांनी ठोकरल्यानंतर अनेक शिवसैनिकांनी व मनसैनिकांनी मातोश्री समोर दोघांनी एकत्र यावे यासाठी आंदोलन केले पण दुर्दैवाने त्यांचाही आवाज आतपर्यंत पोहोचू शकला नाही. आता पुढे काय होईल? सध्याची परिस्थिती पाहता भाजपाचीही ताकत वाढली आहे. त्यामुळे कोणत्याही एका पक्षाला पूर्ण बहुमत मिळेल अशी स्थिती नाही. म्हणजे मग परत कल्याण-डोंबिवली भाग-२ तो ही आता सोपा नाही. कारण स्वतः उद्धव यांनी जाहीर केले आहे भविष्यात आता कोणाशीही युती करणार नाही. मग आत्ता भावाला बाजूला केले आहे आणि वेळ पडली तर परत भाजपाच्याच दारात कटोरा घेऊन जाणार का? आणि गेले तर मग शिवसैनिकांच्या समोर ज्या मोठमोठ्या गप्पा मारल्या त्याचे काय? भाऊबंदकीचा शाप असलेल्या महाराष्ट्राच्या नशिबात काय वाढून ठेवले आहे ते देव जाणो. बघू या पुढे काय काय होते.

किशोर बोराटे.

आपले मत व्यक्त करा