तिसरा डोळा भाग- १४

एकीकडे संविधान बचाव रॅली काढायची आणि दुसरीकडे कुरआनाचे प्रवचन देत मुस्लिम समाजाला कुरआनातीलच कायदे लागू आहेत आणि त्यांना त्या प्रमाणेच जगू द्या, त्यांच्यावर संविधानाची जबरदस्ती करू नका त्यांना त्यांचे शरियतचे कायदे पाळू द्या असे जाहीर सभेत बोलून मुस्लिम समाजाचे लांगूलचालन करायचं हे एवढं दुटप्पी वागणं महाराष्ट्रात फक्त मा. शरद पवार साहेबच करू शकतात. नुकतेच औरंगाबाद येथे बोलताना मा. पवारसाहेब बोलले की तीन तलाकचा अधिकार मुस्लिमांना त्यांचा धर्मग्रंथ कुरआनने दिला आहे त्यात राज्यकर्त्यांनी ढवळाढवळ करू नये. प्रत्येक वेळी हिंदूंना संविधानाचे डोस पाजणारे मा. पवारसाहेब मुस्लिम समाजावर वेळ आली तेंव्हा मात्र संविधान विसरले. तरी नशीब संविधान बचाव रॅली काढून अजून १५ दिवस देखिल उलटले नाहीत. इकडे हिंदू राष्ट्राला विरोध करायचा आणि तिकडे इस्लामी कायद्याचे समर्थन करायचे. पवारसाहेबांना नक्की करायचेय तरी काय? त्यांना हिंदुस्थानात अजून एक पाकिस्तान निर्माण करायचा आहे काय? स्वतःच्या राजकीय स्वार्थापायी पवारसाहेब देशाच्या अंतर्गत सुरक्षेशी खेळत आहेत ही गोष्ट त्यांच्या लक्षात येत नसेल यावर कोण विश्वास ठेवणार? पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी एक देश, एक कायदा असावा यासाठी प्रयत्न करत असताना मा. पवारसाहेबांनी नेमकी त्याविरुद्ध भूमिका घ्यावी याचे आश्चर्य वाटते. तसे आश्चर्य वाटावे असेही त्यात काही नाही मतांच्या लालसेपोटी मुस्लिम समाजाचे लांगुलचालन करण्याची गांधीबुटी त्यांना काँग्रेस मधूनच मिळाली आहे.

वास्तविक पाहता पवारसाहेबांनी ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी की तीन तलाक रद्द व्हावा ही मागणी मुस्लिम महिलांच्याकडूनच आली होती. त्याचबरोबर तीन तलाक संदर्भातील निर्णय हा कोर्टाने दिला होता. आता नेमकी याविरुद्ध भूमिका घेणे हा कोर्टाचा अवमान नाही का? इतरवेळी संविधानाचा आणि कोर्टाच्या निर्णयाचा आदर राखण्यासंदर्भात सल्ला देणारे पवारसाहेब मग आता स्वतःच का हे विसरले की आपण कोर्टाच्या निर्णयाच्या विरोधात भूमिका घेत आहे. हे सर्व का आणि कशासाठी चालले आहे हे जनतेलाही समजत आहे. मुळात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की तीन तलाक संदर्भातील कोर्टाच्या निर्णयाचे काही तुरळक (मुल्ला-मौलवींचे) अपवाद वगळता मुस्लिम समाजानेही स्वागतच केले आहे. तरीही पवारसाहेबांनी हा विषय उकरून का काढावा? मुस्लिम लांगुलचालनासाठी पवारसाहेबांनी अनेकदा अशी वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. ही काही त्यांची प्रथमच वेळ नाही. परिस्थितीनुसार त्यांची भूमिका बदलती हे महाराष्ट्राला नवीन नाही. केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशातच पवारसाहेबांच्या विश्वासाहर्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जाते. त्यांच्या पंतप्रधान बनण्याच्या आड हाच त्यांचा अवगुण येतो.

सध्याचे देशातील वातावरण पाहता पवारसाहेबांना त्यांच्या मुस्लिम लांगुलचालन आणि जातीय राजकारणाचा निवडणूकीत फायदा होण्याची तशी शक्यता फारच कमी आहे. बदलत्या परिस्थितीचा अंदाज अजूनही पवारसाहेबांना येत नाही इथेच त्यांच्या जाणतेपणाची कसोटी लागत आहे. पारंपरिक राजकारण करण्याचे दिवस आता संपले आहेत हे पवारसाहेबांनी लक्षात घ्यायला हवे. केवळ मुस्लिम लांगुलचालन करून ते आगामी निवडणूकीत यश मिळवू शकता नाहीत. मुस्लिम लांगुलचालनाची ही परंपरा ते काँग्रेस मधूनच शिकून आले आहेत. ज्या काँग्रेसमध्ये हे परंपरेने चालत आले आहे त्या काँग्रेसनेही गुजरात निवडणूकीत थोडेसे मुस्लिम लांगुलचालन बाजूला ठेवून अंशतः का होईना पण सौम्य हिंदुत्त्वाचा मार्ग पत्करला. यातून पवारसाहेबांनी बोध घेणे गरजेचे होते. पण त्यांनी पूर्वीही कधी हिंदू मतांची काळजी केली नाही. मुस्लिमांचे लांगुलचालन मात्र ते कायमच करत आले. इस्लाममध्ये व्याज घेणं हे पाप समजलं जातं त्यामुळे अनेक मुस्लिम बँकेत खाते खोलात नाहीत असा दाखला देत त्यांनी नोटबंदी निर्णय हा मुस्लिम विरोधी असल्याची टीकाही केली आहे. त्याच बरोबर शुक्रवारी मुस्लिम मस्जिदीत बॉम्बस्फोट करणार नाहीत असे सांगून मस्जिदीत झालेल्या बॉम्बस्फोटातून त्यांनी त्यांना क्लिनचिट दिली होती. पण या पार्श्वभूमीवर ते हे विसरले होते की हजरतबाल दर्ग्यात घुसलेले आरएसएसचे स्वयंसेवक नव्हते. ते पाकिस्तानी अतिरेकीच होते. गेल्या काही महिन्यांपूर्वी काश्मिरात एक मुस्लिम पोलिस अधिकाऱ्याची हत्या नमाज पढून बाहेर आलेल्या समुदायानेच केली होती.

स्वतःला पुरोगामी, धर्मनिरपेक्ष म्हणवून घेणारांची पुरोगामित्त्वाची आणि धर्मनिरपेक्षत्त्वाची नक्की व्याख्या तरी काय आहे? पवारसाहेब आपण आपले राजकारण करा, पण दोन धर्मात तेढ वाढेल असे काही करू नका. जर कुराण स्विकारायचे असेल तर मग भगवद्गीता पण स्विकारावी लागेल. हा देश संविधानावर चालवायचा आहे की धर्मग्रंथावर हे एकदा ठरवा. एखादा हिंदू नेता किंवा धर्मगुरू जर बोलले की हिंदू समाजाने ५-६ मुलं जन्माला घालावीत की तुम्ही लगेच टीका करणार, मग जिथं घातली जाताहेत त्याकडे मात्र तुम्ही सोयीस्कर दुर्लक्ष करणार हा भेद हिंदू समाजाच्या लक्षात येत नाही का? मतांचे राजकारण तुमचे होते पण दोन्ही धर्मात विनाकारण या असल्या राजकारणामुळे तेढ वाढतो. चार सल्ले इकडे देता तसे तिकडेही देत चला. पुरोगामी, धर्मनिरपेक्ष म्हणजे केवळ हिंदूंना दाबायचे आणि मुस्लिमांना कुरवाळत बसायचे असा त्याचा अर्थ होत नाही. दोघांच्याकडेही एकाच नजरेने पहा. हिंदू-मुस्लिम असा भेद करून कोणतीही राजकीय गणितं मांडू नका. देशात दोन्ही समाज जागृत झाले आहेत. उत्तरप्रदेशात लोकसभेच्या ८० जागा आहेत त्यातील ७२ जागा जर भाजपाला मिळत असतील तर केवळ हिंदूंच्या मतांच्यावर त्या मिळाल्या असा कसा निष्कर्ष काढता येईल? योगीन्ना जे बहुमत मिळाले ते फक्त हिंदूंच्याच बळावर मिळाले का? हे १००% सत्य आहे की या दोन्ही निवडणूकीत हिंदू समाजाचे एकगठ्ठा मतदान भाजपाला झाले तरीही त्यात मुस्लिम मतांची संख्याही कमी नाही. स्वातंत्र्यानंतर काँग्रेस, समाजवादी पार्टी यासारख्या ढोंगी धर्मनिरपेक्ष पक्षांनी मुस्लिम समाजाला फक्त वापरून घेतले. त्यांचा वापर फक्त मतदानापूरता करून घेतला. त्यांची प्रगती किती झाली हा संशोधनाचा विषय आहे. त्यामुळे इथूनपुढे हे असले ढोंगी पुरोगामित्त्व आणि धर्मनिरपेक्षता टिकणार नाही. हिंदूंची मते तर मिळणारच नाहीत पण मुस्लिमांची पण मिळणार नाहीत. तुमच्या एवढ्या वर्षाच्या मुस्लिम लांगुलचालनामुळे हिंदू समाजाचा तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा हमें तो अपनों ने लूटा……असाच आहे. धन्यवाद

किशोर बोराटे.

3 comments

  1. सर तिसरा डोळा भाग 1
    तिसरा डोळा भाग 2
    मेल करा

  2. पवारसाहेब कायम मुस्लिमांचे तुष्टिकरण करत आले आहेत. दादा, एकदम १ नंबर ब्लॉग

आपले मत व्यक्त करा