थोडंस मनातलं…….

तिसरा डोळा भाग – ५२

थोडंस मनातलं……

किशोर बोराटे @

मित्रांनो, केवळ राजकारण हेच आपलं आयुष्य नाही. ते आपले रोजी-रोटीचे साधनही नाही. किमान माझे तर नाहीच. त्यामुळे त्यासाठी आपले व्यक्तिगत संबंध बिघडून देऊ नका. राजकीय टीका-टिप्पणी जरूर करा. पण त्यातही सभ्यता असू द्या. परिस्थितीनुसार राजकारण बदलतं, राजकीय भूमिका बदलतात. पण आपले बिघडलेले संबंध पूर्ववत होत नाहीत. सोशल मिडिया नव्हता तेंव्हा आपलं आयुष्य मर्यादित होते. तुम्ही कोण? मी कोण? कशाला कधी आपली नावं एकमेकांना माहिती झाली असती? यापूर्वीच्या आयुष्यात कुठेतरी प्रवासात वगैरे ४-२ ओळखी व्हायच्या. त्या पण तेव्हढ्यापुरत्याच मर्यादित राहायच्या.

आता सोशल मिडीयाच्या माध्यमातून आपली ओळख झाली. अनेकजण एकमेकांना भेटतात. काहींच्या भेटी झाल्या नसल्या तरी एक व्यक्तिमत्त्व म्हणून आपण एकमेकांना ओळखू लागलो आहोत. हे संबंध टिकवा, वाढवा. राजकारणासाठी ते बिघडू देऊ नका. कुणी कोणत्या पक्षाचे, विचारधारेचे समर्थन करावे हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत विचार आहे. दोन विरोधी विचारांचे राजकीय नेते त्यांच्या गरजेनुसार एकत्र येतात. ती त्यांची राजकीय गरज असते. पण आपण गरज नसताना एकमेकांशी संबंध बिघडवून टाकतो.

प्रत्येकाची स्वतःची अशी एक विचारधारा असते. पक्ष आपले विचार गरजेनुसार बदलतो. पण म्हणून आपली विचारधारा बदलत नाही. त्यामुळे कोण कोणत्या पक्षाचे समर्थन करतोय म्हणून व्यक्तिगत आयुष्यात त्याचे विचारही तसेच असतील असे नाही. उदा. मी हिंदू आहे, पण मी हिंदू आहे तो जन्मानेच आहे आणि ही वस्तुस्थिती आहे हे कसे नाकारणार? माझा जन्मच जर हिंदू आई-वडिलांच्या पोटी झाला आहे तर मग मी हिंदूच झालो ना? मग माझे विचार, आचार आणि उच्चार हे हिंदूच आहेत. माझ्यावर संस्कार हिंदुत्त्वाचेच झालेत. तीच संस्कृती मी जगतोय. माझ्या घरचे जगताहेत. मला माझे हिंदूत्त्व हे जन्मानेच मिळाले आहे आणि मी ते कर्मानेच पुढे वाढवतो आहे.

माझे हिंदूत्त्व हे कोणत्या राजकीय पक्षावर अवलंबून निश्चितच नाही. राजकीय पक्ष गरजेनुसार कधी हिंदुत्त्ववादी तर कधी सेक्युलर भूमिका घेतात. जसे आत्ता राहुल गांधी घेत आहेत. त्यात त्या पक्षांचा राजकीय स्वार्थ आहे. मग अशा पक्षांच्यावर मी माझी जीवनपद्धती ठरवावी का? आपण फार संकुचित विचार करतो. राजकीय पक्ष हे बेरजेची गणित जुळवण्यात व्यस्त असतात. वेळ येईल तसे ते बदलतात. त्यामुळे त्यांचे विचार हे आपले विचार होऊ शकत नाहीत. आपले व्यक्तिगत विचार आणि राजकीय भूमिका यात कधी गल्लत होऊ देऊ नका. कोण कोणत्या पक्षाचे समर्थन करतो त्यावर तो चांगला की वाईट हे ही ठरवू नका. हिंदूत्त्व ही आपली जीवन पद्धती आहे. आपला धर्म हा राजकारणावर अवलंबून नाही. राजसत्तेपेक्षा धर्मसत्ता कधीही मोठीच असते. केवळ कुणाचा द्वेष करणे हे हिंदूत्त्व असू शकत नाही. माझे हिंदूत्त्व हे कुणाच्या द्वेषावर उभे राहिलेले नाही आणि ते एवढे तकलादू ही नाही. नुकतेच आरएसएस प्रमुख मा. श्री मोहन भागवत यांनी एक महत्त्वाचे विधान केले की जिथे मुस्लिमांना जागा नाही, तेथे हिंदूत्त्व नाही. ज्या संघटनेला आपण कट्टर हिंदुत्त्ववादी संघटना म्हणतो त्याच्या प्रमुखांनी ही भूमिका मांडली.

द्वेष हा देशद्रोही, समाजद्रोही लोकांचा व्हायलाच पाहिजे. तो करताना त्याची जात, त्याचा धर्म पाहण्याची आवश्यकता नाही. अशा लोकांचा कोणताही धर्म अथवा जात असू शकत नाही. धर्माने अथवा जातीने कुणी चांगला-वाईट ठरत नसतो. चांगला-वाईट हा कर्माने ठरतो. समाजात तुम्ही स्वतःला कशाप्रकारे सादर करता त्यावर समाज त्यांचा तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन ठरवतो. मोठा विचार करा, व्यापक विचार करा. केवळ राजकारण हे आपले आयुष्य नाही. तो आपल्या आयुष्याचा एक भाग आहे. चांगल्या विचाराला, चांगल्या भूमिकेला उचलून धरा. तो विचार महत्त्वाचा आहे. क्रांती केवळ व्यक्तीने घडत नसते, तर ती त्या व्यक्तीच्या विचाराने घडते. व्यक्ती गेली तरी ती व्यक्ती आपल्या विचाराने समाजात जिवंत राहते. याचे उदा. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर, महात्मा गांधी, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर, ए. पी. जे. अब्दुल कलाम, वल्लभभाई पटेल अशी कितीतरी नावे घेता येतील. आपल्याला संत-साहित्याची परंपरा आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत सावतामाळी, संत मुक्ताबाई आहेत. पु. ल. देशपांडे, व. पु. काळे, कुसुमाग्रज असे अनेक साहित्यिक, कवि आहेत ज्यांनी या मराठी भाषेवर संस्कार केले. वरील किती महापुरुषांना, संत-साहित्यिकांना आपण प्रत्यक्ष पाहिले आहे? तरीही त्यांच्या विचारांनी आपले जग व्यापून टाकले आहे.

सर्व देशांना भूगोल आहे. पण आपल्या हिंदुस्थानला मोठा इतिहास आहे. आपल्या मराठी संस्कृतीला हजारो वर्षांची परंपरा आहे. एवढ्या आक्रमणानंतरही आपली हिंदू संस्कृती टिकून राहिली. ती कुणा एका व्यक्तीमुळे, संघटनेमुळे अथवा एखाद्या राजकीय पक्षामुळे संपणार नाही. मुळात संस्कृती, धर्म याकडे आपण पूर्णपणे राजकीय चष्म्यातून पाहणेच चुकीचे आहे. तरीही जर समजा कोणी आपल्या धर्मविरोधी भूमिका घेत असेल, आपला धार्मिक द्वेष करत असेल तर अशा राजकीय पक्षाला अथवा संघटनेला आपण समर्थनही देऊ नये. तेवढा धर्माभिमान आपल्याकडे असायलाच हवा. कोणताही एक धर्म दुसऱ्या धर्माचा तिरस्कार करत नाही आणि करायची शिकवणही देत नाही. प्रत्येकाने आपापल्या धर्माचा अभिमान जरूर बाळगावा. पण तो बाळगत असताना इतर धर्माचा तिरस्कार करू नये. तिरस्कार त्यातील अंधश्रद्धा, चुकीच्या रूढी, पद्धती, चुकीच्या लोकांचा व्हायला हवा. देशद्रोही, समाजद्रोही लोकांना सर्वांनीच बहिष्कृत करायला हवे. कारण अशा लोकांचा कोणताही धर्म नसतो. देशद्रोह आणि समाजद्रोह कोणताही धर्म शिकवत नाही. चांगला माणूस होण्याचा प्रयत्न केला तर आपणही मोठे होऊ आणि धर्मही मोठा होईल. धन्यवाद

(पोस्टवर चर्चा करताना चांगल्या भाषेचा वापर करावा. अन्यथा कमेंट डिलीट करण्यात येईल.)

-किशोर बोराटे

आपले मत व्यक्त करा