ठाकरी बॉम्ब फुटला

rajbomb2इंडिया टीव्हीचे रजत शर्मा राज ठाकरे यांच्याबाबत बोलताना एकदा म्हणाले होते की राज यांचा तुम्ही एकतर तिरस्कार करू शकता किंवा तुम्ही त्यांच्यावर प्रेम करू शकता, पण तुम्ही त्यांना दुर्लक्षित नाही करू शकत.
राज ठाकरे यांच्या भूमिकेबाबत अनेकजण सध्या संभ्रमात आहेत की राज यांना नक्की काय करायचे आहे? अगोदर मोदींची स्तुती केली, परत गेले काही दिवस झाले सातत्याने राज हे सेना-भाजपावर टीका करत आहेत. काँग्रेस आघाडी सरकार सत्तेत असताना नेहमी काँग्रेस-राष्ट्रवादीवर तुटून पडणारे राज ठाकरे आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी बाबत तोंडातून ब्र देखील काढायला तयार नाहीत. इथपासून ते अगदी राज यांना ठोस भूमिका घेता येत नाही. ते गोंधळात पडलेत वगैरे इथपर्यंत अनेकांनी वेगवेगळे तर्क बांधलेत. प्रथम दर्शनी हे अंदाज योग्य वाटत असले तरी ते वास्तविकतेच्या जवळ जाणारे नाहीत. प्रश्नाच्या मूळाशी जाऊन कोणी भूमिका तपासत नाही. फक्त वरवरचे अंदाज काढण्यातच सगळे धन्यता मानत आहेत. दोन्ही निवडणुकीत मानहानीकारक पराभव झाल्यानंतर काही दिवस शांत बसलेले राज ठाकरे वरकरणी जरी शांत वाटत असले तरी ते शांत नव्हते. एखादे मोठे वादळ येऊन गेल्यानंतर काय-काय नुकसान झाले आहे,शिल्लक काय आहे, काय-काय उडून गेले आहे हे जसे पहिले जाते त्याप्रमाणेच झालेल्या नुकसानीचा ते आढावा घेत होते. वादळ कोणत्या दिशेने वाहत आहे आणि आपल्याला आश्वासक जागा कुठे तयार होते आहे, की जिथे आपल्याला पाय रोवून उभे राहून वादळाचा सामना करता येईल अशी जागा ते शोधत होते. हा विषय तसा समजून घ्यायला अवघड वाटत असला तरी लक्षपूर्वक आणि कोणताही पूर्वग्रह बाजूला ठेवून सकारात्मक मानसिकतेने ही पोस्ट वाचली तर समजून घ्यायला सोपे जाईल. पण त्यासाठी भूमिकेच्या मुळाशी जाऊन ती समजून घ्यावी लागेल. राज मोदींची स्तुती करत होते का? याचे उत्तर १००% हो असेच आहे. आता टीका करत आहेत का? १००% करत आहेत. पण राज्य सरकारवर राज्यातल्या प्रश्नासंदर्भात टीका केली तरी ती मोदींच्यावर टीका केली असा जो भास भाजपा आणि मीडियाकडून निर्माण केला जात आहे तो चुकीचा आहे. त्याला विनाकारण राज विरुद्ध मोदी असे स्वरूप दिले जात आहे. त्याला कारण म्हणजे राज्यातले जे भाजपाचे नेते आहेत त्यांना अजून स्वतःचे वलय निर्माण करता आले नाही. जनतेमध्ये त्यांना अजून स्वतःविषयी विश्वास निर्माण करता आला नाही. त्यामुळे भाजपावर किंवा त्यांच्यावर, सरकारवर, त्यांच्या कार्यशैलीवर जरी कोणी टीका केली तरी स्वतःच्या हिंमतीवर त्याला उत्तर द्यायच्या ऐवजी ही नेतेमंडळी मोदींना पुढे करून त्यांच्या पायजम्याच्या नाडीला लोंबकळ्त आहेत.

RAJWज्यावेळी काँग्रेस आघाडी सत्तेत होती त्यावेळी राज ठाकरे त्यांच्यावर तुटून पडत होते. त्यावेळी सेना-भाजपाला ते जवळचे वाटत होते. विशेषतः भाजपाला. आता सेना भाजपा सत्तेत आहे त्यामुळे राज त्यांच्यावर टीका करत आहेत तर आता ते काँग्रेस-राष्ट्रवादीला जवळचे वाटणे साहजिकच आहे. ते कबूल करणार नाहीत पण राज ठाकरे सरकारवर तुटून पडले तर यांनाही ते हवेच आहे. इथंच तर खरी मेखं आहे. कारण गेल्या साधारण दीड-दोन वर्षात विरोधी पक्षांना ना केंद्रातल्या सरकारचा खंबीरपणे सामना करता आला, ना राज्यातल्या फडणवीस सरकारचा खंबीरपणे सामना करता आला आणि त्यामुळे विरोधी पक्षाची जी स्पेस निर्माण झाली आहे ती भरून काढण्याचा राज यांचा प्रयत्न आहे. हा फार-फार महत्त्वाचा मुद्दा आहे. भलेही त्यांच्याकडे आमदार नसले तरी रस्त्यावर उभे राहून ते AC मध्ये बसलेल्या सरकारला घाम फोडू शकतात. त्यांची भूमिका निश्चित झाली आहे आणि ती हीच आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे पक्षातले काही मोदीप्रेमी कार्यकर्ते किंवा भाजपातील राजप्रेमी नाराज होणार हे त्यांनी गृहीत धरले आहे. पण त्यांनी दूरदृष्टीने हा निर्णय घेतला आहे. आता येत्या चार वर्षात तरी कोणत्याही मोठ्या निवडणुका नाहीत. सत्ताधारी पक्षाकडे सध्या गर्दी आहे. त्यामुळे त्यांना अनुरूप भूमिका घेऊन गर्दीत हरवून जाण्यापेक्षा विरोधात भूमिका घेऊन स्वतःची जागा निर्माण करणे केंव्हाही उत्तम. त्यासाठी अडगळीत पडलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीवर टीका करून काय साध्य होणार आहे? हे त्यांनी ताडले. त्याचबरोबर विरोधी पक्षांचे अपयश हे राज यांच्या पथ्यावरच पडणार आहे. हा सामना मोदी विरुद्ध राज असा नाही. राज्यातील सत्ताधारी विरुद्ध राज असा आहे. हा सामना काँग्रेस-राष्ट्रवादी विरुद्ध राज असा आहे. सेना-भाजपाकडे समजा ३५% जनमत आहे हे गृहीत धरले तरी ६५% जनमत हे सेना-भाजपाच्या विरोधात जनतेत आणि विरोधी पक्षात विभागलेले आहे. या ६५% लोकांना चेहरा नाही. आकडे थोडे-फार इकडे-तिकडे होऊ शकतात. सेना-भाजपाच्या विरोधात काँग्रेस-राष्ट्रवादी असेल किंवा इतर छोटे पक्ष असतील त्यांच्याकडे आश्वासक चेहरा नाही हे राज यांनी ओळखले आहे आणि तोच चेहरा घेऊन राज, “होय मीच आहे सेना-भाजपाला आणि काँग्रेस-राष्ट्रवादीला पर्याय” असे सुचवू पाहत आहेत.


ADVERTISEMENT : BUY BOOKS ONLINE written by DR.MANOHAR SASANE CLICK HERE

Banner_2


त्यादृष्टीनेच त्यांनी आश्वासक पावले टाकायला सुरुवात केली आहे. त्यांची ही सगळी तयारी २०१९ च्या निवडणुकीच्या दृष्टीने चालू आहे. लागोपाठच्या निवडणुकीत पराभव झाल्यामुळे बॅकफूटवर गेलेल्या राज ठाकरे यांनी आता टारगेट निश्चित केले आहे. जोरदार मुसंडी मारण्यासाठी आणि यशस्वी पुनरागमन करण्यासाठी ते योग्य वेळेची वाट पाहत होते. त्यांनी तसे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना अनेकदा सांगितले ही होते की, थोडं थांबा योग्य वेळ येऊ द्या, वादळ कसं निर्माण करायचे ते मला माहिती आहे. ते संधीच्या शोधात होते. जाळं त्यांनी टाकले होतेच फक्त त्यात कोणता मासा अडकतोय याची ते वाट पाहत होते. शेवटी झालेही तसेच मासा अडकला तो ही नेमका सेनेचाच मंत्री दिवाकर रावते. टॅक्सी, रिक्षा परवाने हा विषय राज यांच्याही जिव्हाळ्याचा होता आणि मुंबई पुरता मर्यादित असल्याने आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने उपयोगी पडणारा असल्याने तो न उचलतील ते राज ठाकरे कसले? मुद्दा उचलला पण उचलताना त्यांनी विनाकारण विरोधाला विरोध न होईल याची दक्षता घेऊन बरोबर त्यातील त्रुटी शोधल्या त्याचा स्वतः राजसाहेब आणि टीम मनसे ( बाळा नांदगावकर, अविनाश अभ्यंकर, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे,आमदार शरद सोनावणे) यांनी अभ्यास केला आणि मग पूर्ण तयारीनिशी सरकार गाफील असताना अचानक हल्ला केला. अचानक झालेल्या हल्ल्याने आणि अधिवेशनाच्या तोंडावरच सरकारवर “ठाकरी बॉम्ब” फुटल्याने सरकार बावचळले, त्यांना सावरायलाही संधी मिळाली नाही. नंतर राज यांनी उपस्थित केलेले मुद्दे खोडून काढताना सरकारच्या नाकीनऊ येत होते. हा हल्ला भाजपाला एकवेळ अपेक्षित असू शकतो पण सेनेला बिलकूल नव्हता. कारण हल्ल्यासाठी जी रसद पुरवली गेली होती ती कदाचित भाजपाकडून पुरवली गेली असण्याची शक्यता नाकारता येणार नाही. कारण राज यांनी बाहेर जे मजबूत पुरावे दाखवले ते आतून आले असण्याची शक्यता आहे. वाहिन्यांवरील चर्चेत राम कदम, प्रवीण दरेकर सारखे या विषयाचा अभ्यास नसलेले प्रवक्ते भाजपाने पाठवले. तिथे टीम मनसेने आपला मागचा-पुढचा सगळा हिशोब चुकता केला. टीम मनसे पुढे या दोघांचीही बोबडी वळली. त्यामुळे राज यांनी लावलेली ही आग भाजपा पाणी टाकून विझवत होता की पेट्रोल टाकून वाढवत होता हा संशोधनाचा विषय आहे. त्यामुळे गृहराज्यमंत्री राम शिंदे जरी बोलले असले की राज यांच्या वक्तव्याचा पोलीस अभ्यास करत आहेत, त्यात आक्षेपार्ह काही आढळले तर सरकार कारवाई करायला मागे-पुढे पाहणार नाही. कायद्यपुढे सर्व समान आहेत. कायद्यापुढे कोणी मोठा नाही. कुणालाही कायदा हातात घेऊ दिला जाणार नाही. हे आबांचे डायलॉग महाराष्ट्र कित्येक वर्षे झाले ऐकत आला आहे. मंत्री पदाची शपथ घेतल्यापासून राम शिंदे साहेब यांनी फक्त एकच काम केले ते म्हणजे आबांचे डायलॉग पाठ करणे. कारण त्यांना माहित होते “राजकृपेने” हे डायलॉग कधीतरी बोलावे लागतील. ज्यांच्याकडे परिवहन खाते आहे ती शिवसेना आणि त्याचे मंत्री रावते साहेब हे कुठेही पुढे आले नाहीत. सेना-भाजपात विश्वासार्हतेचा अभाव असल्याने ते एकमेकांच्याकडे संशयाने पाहत राहिले. त्याचा फायदा राज यांनी उचलला. गेल्या दोन वर्षात टायमिंग हरवलेल्या राज यांनी यावेळी बरोबर टायमिंग साधले.

विरोधकांच्याकडेही छावणी आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या या नेहमीच्या मुद्याशिवाय दुसरे मुद्दे नव्हते. त्याच-त्याच विषयावर बोलून ते ही कंटाळले होते. अगोदर सत्तेत ते असल्याने ते या विषयावर अधिकाराने बोलू ही शकत नाहीत. त्यांना राज यांनी नवीन मुद्दा मिळवून दिला. त्यामुळे राज प्रकाशझोतात आले आणि विरोधक बॅकफूटवर गेले व या संघर्षाला सरकार विरुद्ध राज असे स्वरूप प्राप्त झाले. विरोधकांची गोची अशी झाली की त्यांना नक्की कोणती भूमिका घ्यावी हेच कळेना. सरकारची तर बाजू घेऊ शकत नव्हते आणि राज यांच्या हुकूमशाहीचे समर्थन करणे त्यांना पेलणारे नव्हते. तरीही त्यांनी दबक्या आवाजात राज यांनाच साथ दिली. मुंबई, नाशिक आणि पुणे महापालिका निवडणूका हे राज यांचे शॉर्ट-टर्म टार्गेट, ध्येय आहे. त्यादृष्टीने पुनरागमनासाठी “खळ्ळ-खटयाक” हे अस्त्र उपयोगी येणारे आहे. ती वेळ येईल असे वाटत नाही कारण या गोंधळाचे कारण पुढे करून मुख्यमंत्री ऐनवेळी या रिक्षा परवान्यांना स्थगिती देऊन सेनेवर कुरघोडी करू शकतात किंवा ऐनवेळी कोर्टात एखादी जनहित याचिका दाखल होऊन हा निर्णय लांबणीवर पडू शकतो आणि या सगळ्याचा राजकीय लाभ राज यांना होऊ शकतो. चारही प्रमुख पक्षात योग्य समन्वय नसल्याने आणि राज यांनी आपले उपद्रव मूल्य अनेकदा दाखवून दिले असल्याने या “राज अस्त्राचा” आपल्याला त्रास न होता याचा वापर एकमेकांच्या विरोधात कसा करून घेता येईल हेच प्रत्येकजण पाहत असल्याने अनपेक्षितपणे राज यांना महत्त्व प्राप्त झाले आहे. चारही प्रमुख पक्षांच्या कुंडलीत शनीच्या साडेसाती सारखे राज जाऊन बसले आहेत. त्यामुळे या चारही पक्षांना त्यांना तेलाने अभिषेक घालून प्रसन्न करून आपला स्वार्थ साधण्याशिवाय पर्याय नाही. मुंबई महापालिका डोळ्यासमोर ठेवून प्रत्येकजण आपापल्या चाली खेळत आहे. त्याच अनुषंगाने शिवसेनेचे खच्चीकरण करण्यासाठी भाजपा हे “राजअस्त्र” शिवसेनेवर सोडू शकते असे काहींचे अंदाज असले तरी राज आपला असा वापर होऊन देतील असे वाटत नाही. राज यांना स्वतःचे महत्त्व माहित असल्याने जी राजकीय परिस्थिती निर्माण होईल त्याचा फायदा आपल्या पक्षाला करून घ्यायला ते कमी पडणार नाहीत. जे जसं दिसतंय ते तसं असेलच असे नाही. बुद्धिबळाच्या पटावर जसे एक चाल खेळण्यामागे अनेक चाली दडलेल्या असतात तसेच या राजकीय पटलावर सुद्धा आहे. येत्या काही दिवसात याची झलक पाहायला मिळेलच.

किशोर बोराटे.

आपले मत व्यक्त करा