राज’निती’

१९७७ साली इंदिरा गांधींनी देशात आणीबाणी लावली. त्यावेळी मा. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्या आणीबाणीच्या माध्यमातून काँग्रेसला उघड पाठिंबा दिला होता. आज २०१९ च्या लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर थोड्याफार फरकाने त्याच इतिहासाची पुनरावृत्ती होतेय. गेल्यावर्षीच्या पाडवा मेळाव्यात राज यांनी सर्व मोदी विरोधी पक्षांनी एकत्र यावे असे आवाहन केले होते. त्या अनुषंगाने लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर देशातील मोदी विरोधी विविध पक्षांची मोट बांधण्याचे काम जोरात सुरू आहे. राज यांनी मोदी विरोधी पक्षांनी एकत्र यावे असे आवाहन केले असले तरी त्यांचा पक्ष लोकसभा निवडणूक लढवत नाही. खरंतर त्यांनी माझा पक्ष प्रादेशिक असल्याने माझ्या पक्षाने लोकसभा निवडणूक लढवू नये असे आपले मत असल्याचे अनेकदा जाहीरपणे सांगितले आहे. तरीही या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज काय निर्णय घेताहेत याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या होत्या. १५ दिवसांपूर्वी पदाधिकाऱ्यांचा जाहीर मेळावा घेऊन आपण देशहिताचा तसेच राज्यहिताचा निर्णय घेणार असल्याचे सांगून लोकसभा निवडणूक लढविणार नसल्याचेच स्पष्ट संकेत दिले होते.

१७ तारखेला मनसेने दीड ओळींचे एक पत्रक काढून मनसे लोकसभा निवडणूका लढवणार नसल्याचे स्पष्ट केले. तसेच १९ तारखेला राज पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेऊन सविस्तर बोलणार असल्याचे सांगितले. अगोदर निवडणूक लढणार नसल्याचे जाहीर करायचे आणि तिसऱ्या दिवशी पक्षाची जाहीर सभा लावायची यासाठी किती मोठा आत्मविश्वास आणि धाडस हवे हे राजकीय पक्षांचे जे अध्यक्ष आहेत त्यांना विचारा. ही वाटते एवढी सोपी गोष्ट नाही. ही एक मोठी political risk होती. अशा risk राज यांनी यापूर्वीही अनेकदा घेतल्या आहेत. मा. बाळासाहेब यांच्या हयातीत नाईलाजाने का होईना पण वेगळा पक्ष काढून स्वतःच्या बळावर शिवाजी पार्कवर सभा लावणे असेल, २०१४ च्या निवडणूकीत सपशेल पराभव होऊन देखिल पराभवाचे विश्लेषण करण्यासाठी आणि महाराष्ट्र सैनिकांचे मनोधैर्य उंचावण्यासाठी आठवडाभरात लगेचच जाहीर सभा घेणे असेल किंवा आत्ताचे हे मनसे निवडणूक लढणार नाही असे जाहीर करून लगेच तिसऱ्या दिवशी सभा घेणे असेल यात किती मोठी political risk आहे हे राजकीय पक्षांचे अध्यक्ष किंवा मोठे राजकारणी नेतेच सांगू शकतील आणि हे धाडस सद्य स्थितीत राज ठाकरे यांच्याशिवाय अन्य कोणी नेता दाखवू शकत नाही. एखादा सर्वसामान्य नेता असता तर त्याने विचार केला असता की निवडणूक लढणार नाही असे अगोदरच जाहीर केले तर सभेला गर्दी होईल ली नाही? पदाधिकाऱ्यांचे राजीनामा सत्र तर चालू होणार नाही ना? निवडणूक लढणार नसल्याचे समजल्यावर कार्यकर्ते पक्ष सोडून इतर पक्षात तर जाणार नाहीत ना? असे एक ना अनेक प्रश्नांनी संबंधित नेत्याला घेरले असते. त्यामुळे इतर कोणताही नेता असता तरी त्याने असा निर्णय जाहीर करून सभा लावली नसती. पण राज यांनी हा धाडसी निर्णय कशाच्या बळावर घेतला असेल?

१) स्वतःवरील विश्वास

२) महाराष्ट्र सैनिकांच्यावरील विश्वास

या बळावर त्यांनी निवडणूक लढणार नसल्याचे जाहीर करूनही सभा घेण्याचे धाडस दाखवले. त्यांना स्वतःवर विश्वास होता, त्यांना त्यांच्या महाराष्ट्र सैनिकांच्यावर विश्वास होता की माझे सैनिक माझ्याबरोबर राहतील.

आता महत्त्वाचा विषय मनसेचा निवडणूक न लढवण्याचा योग्य की अयोग्य? हे येणारा काळ ठरवेल. याबाबतीत जो तो आपापल्या कुवतीनुसार अनुमान काढायला मोकळा आहे. खरंतर राजकीय पक्षांनी प्रत्येक निवडणूक ही लढवायलाच हवी. पण राजकीय चाली या बुद्धिबळाच्या पटलावरील चालीप्रमाणे दूरदृष्टी ठेवून खेळल्या जातात. एका निर्णयामागे अनेक संदर्भ असतात. मुळात राज यांचा फोकस हा विधानसभा निवडणूका हाच आहे आणि अजेंडा मोदी आणि अमित शहा यांच्या एकाधिकारशाहीला आव्हान देणे हाच आहे. युद्ध हे अनेकप्रकारे लढता येते. प्रत्यक्ष रणांगणात उतरून लढता येते. बाहेर राहून रसद पुरवली जाते. तर कधी तटस्थ राहून मदत केली जाते. तर कधी शत्रूच्या शत्रूला आपला मित्र बनवून अनुकूल भूमिका घेऊन अप्रत्यक्षपणे त्याला मदत केली जाते. तर कधी एका शत्रूशी लढायला तात्पुरती दुसऱ्या शत्रूची मदत घेतली जाऊ शकते किंवा त्याला मदत केली जाऊ शकते. संदर्भ अनेक निघू शकतात. पण मनसेने आत्ता जी भूमिका घेतली आहे ती स्वतःचे नुकसान न करता, समोरच्याचे जेवढे करता येईल तेवढे करायचे अशी आहे. साप तर मेला पाहिजे, पण काठीही तुटली नाही पाहिजे. परवाच्या सभेत राज यांनी कुणाला मतदान करा हे सांगितले नाही, पण भाजपाच्या विरोधात केवळ मतदानच नव्हे तर प्रचारही करा असा आदेश महाराष्ट्र सैनिकांना दिला. मत भाजपाला गेले नाही पाहिजे मग तिकडे कुणालाही करा. त्याच सभेत त्यांनी पवार आणि मोदींची किती आणि कशी जवळीक आहे आणि मोदींनी त्यांच्यावर कशी स्तुतीसुमने उधळली होती हे जाहीरपणे on screen दाखवले. त्यात निवडणूकीपूर्वीची मोदींची विधाने आणि नंतरची विधाने दाखवून स्वतःवरील टीका परतवून लावली होती. राज पवारांना भेटताहेत हे निश्चितच आहे आणि ते उघडपणे भेटताहेत. परवाची सभा झाल्यानंतर दोनच दिवसांत ते पवारांना भेटल्याचे माध्यमांनी दाखवले. आता ते का भेटले? काय चर्चा झाली? हे पाडवा मेळाव्यात निश्चितपणे कळेलच. दोघांचेही उद्दिष्ट एकच असल्याने या गाठी-भेटी पुढील काळात अनेकदा पाहायला मिळतील. कदाचित ते व्यासपीठही शेअर करतील. राज यांच्यासारखा लाखांच्या सभा गाजवणारा आणि ज्याच्यामागे राज्यातील लाखो सळसळती तरुणाई उभी आहे असा नेता जर आपल्या उपयोगी येत असेल तर चाणाक्ष पवार ही संधी थोडीच सोडणार आहेत? पवार यांचे आडाखे असतील, तसे राज यांचेही काही आडाखे असतील. ते पण कच्च्या गुरुचे चेले नाहीत. पवार हे काय रसायन आहे हे सध्याच्या राजकारणात राज यांच्यापेक्षा कुणाला माहिती आहे?

राज निवडणूक लढवणार नसल्याने काही भक्त त्यांना ट्रोल करत आहेत. पण त्यांना हे कळत नाही की जर ते निवडणूक लढवत असते तर त्याचा भाजपाला काही विशेष धोका नव्हता. फारतर त्यांनी ८-१० जागा लढवल्या असत्या आणि त्यातच ते गुंतून पडले असते. पण आता ते राज्यभर भाजपा विरोधात प्रचाराला मोकळे आहेत. त्यात त्यांना गमावण्यासारखे काहीही नाही. भाजपाची परिस्थिती मात्र उलटी आहे. जे आहे ते राखता राखता त्यांना नाकीनऊ आलेय. त्यामुळे त्यांनी दुसऱ्यांची घरं फोडून पोरं पळवण्याचे उद्योग चालू केलेत. एवढी वर्ष सत्ता असूनदेखील जर ही अवस्था असेल स्वतःचे उमेदवार देऊन जिंकून यायची खात्री नसेल तर मग सत्ता असूनदेखील भाजपा किती बॅकफूटवर आहे आणि त्यांच्यात किती आत्मविश्वास आहे हे दिसून येतेच आहे. स्वतःच्या पक्षाचे उमेदवार देऊन आपण निवडणूक जिंकू शकत नाही हे भाजपा नेतृत्त्वाला उमगले आहे. बाहेरचे उमेदवार फोडून लढावे लागणे हीच भाजपाची हतबलता आहे. सत्ता मिळूनही शाश्वत विकास करू शकलो नाही हे त्यांनी स्वतःच यानिमित्ताने सिद्ध केले आहे. पण राज निवडणूक लढवत नाहीत त्यामुळे त्यांचे महत्त्व कमी होत नाही. परवा ABP माझाच्या चर्चेत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी याबाबत बोलताना फार सुंदर उदा. दिले. ते बोलले महाभारतात भगवान श्रीकृष्णाने हातात शस्त्र घेतले नाही म्हणून त्यांचे महाभारतातील महत्त्व कमी होते का? तसे पाहायला गेले तर संपूर्ण युद्धाच्या केंद्रस्थानी श्रीकृष्णच होते. ही लढाई मोदी-शहा विरुद्ध देश अशीच आहे. यांनी सगळ्या स्वायत्त संस्था मग ते सुप्रीम कोर्ट असेल, रिझर्व्ह बँक असेल, निवडणूक आयोग असेल मोडीत काढण्याचे उद्योग चालू केलेत. देशात एकप्रकारची हुकूमशाही आणली जातेय. त्यामुळे हे युद्ध म्हणजे दुर्योधन-दु:शासन विरुद्ध देश असे आहे. यांच्या एकाधिकारशाहीला भाजपातील सुद्धा अनेक लोकं कंटाळलेत. तिथेही गंगापुत्र भीष्माचार्य, द्रोणाचार्य यांच्यासारखी लोकं आहेत. ज्यांना नाईलाजाने या दुर्योधन-दु:शासन यांच्या बाजूने लढावे लागते आहे. अशा सर्व लोकांचे नेतृत्त्व राज हे श्रीकृष्ण बनून करत आहेत. तयारी तर सर्व सुरू झाली आहे. पाडवा मेळाव्यात राज या युद्धाचे रणशिंग फुंकतील आणि युद्धाला सुरुवात होईल. शेवट काय होईल? कसा होईल? काळाच्या उदरात काय दडले आहे? हे २३ मे रोजी कळेलच. तूर्तास परिस्थिती कशी वळण घेतेय हे पाहू.

आपले मत व्यक्त करा