राज विचार

राजकारणात जय-पराजय हे होतंच असतात. त्यात विशेष असे काही नाही. तो राजकारणाचा अविभाज्य भाग आहे. देशातील मोठं-मोठे पक्ष आणि नेते सुद्धा पराभूत झाल्याचा इतिहास आहे. महत्त्वाचे हे असते की पराभवातून आपण काय शिकलो? पराभव झाल्यानंतर अनेक पक्ष आत्मचिंतन शिबिरे घेतात. पण अशा शिबिरातून खरेच आत्मचिंतन होते का? त्यात सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांचा सहभाग असतो का? अशा शिबिरामध्ये आत्मचिंतन तर दूरच राहिले पण त्या व्यासपीठावरून परत जिंकलेल्या पक्षावर टीका केली जाते. आरोप-प्रत्यारोप होतात आणि पराभव का झाला? याबाबत कोणताही निष्कर्ष न निघता ते शिबिर संपते. आत्मचिंतन मुख्यतः दोन गोष्टीवर व्हायला हवे.

१) आपल्या पराभवाचे कारण
२) समोरच्याच्या विजयाचे कारण

या दोन्ही गोष्टी केंद्रस्थानी ठेवून आपले प्रामाणिकपणे आत्मचिंतन व्हायला हवे.
आपण कुठे कमी पडलो? आणि अशी कोणती गोष्ट त्यांनी केली जी आपल्याला करता आली नाही? मग उमेदवार निवड असेल, प्रचाराची पद्धत असेल, उपस्थित केलेले मुद्दे असतील, संघटनात्मक बांधणी असेल जे काही असेल ते आपल्या पराभवाची आणि त्यांच्या विजयाची मीमांसा व्हायलाच हवी. मग त्यातून जे निष्कर्ष निघतील, आपल्या ज्या उणीवा निदर्शनास येतील, कुठे चुकले त्याच्या दुरुस्तीवर काम व्हायला हवे. आता महत्त्वाचा विषय- ते सत्ताधारी झाले, आपण विरोधक झालो. तर मग विरोधी पक्षाचे काम काय असते? सरकारी पक्षाचे दोष जनतेच्या निदर्शनास आणून देणे. विरोधक याचा अर्थ केवळ टीकाचं करत बसायची असा नाही होत. टीका जरूर करावी. पण ती पक्ष द्वेषी, व्यक्तिद्वेषी असू नये. टीका करणे आणि मानहानी करणे यातील फरक लक्षात घ्यावा. कारण पंतप्रधान असो अगर मुख्यमंत्री ते संविधानिक पदावर बसलेले असतात आणि कोट्यवधी जनतेचे ते नेतृत्त्व करतात. टीका ही व्यक्तीवर न करता सरकारवर आणि सरकारी पक्षाच्या धोरणावर असायला हवी. त्याच बरोबर चूक दाखवताना किंवा चुकीचे काय आहे हे सांगताना बरोबर काय आहे हे ही तिथे आपण स्पष्ट करायला हवे. तेंव्हा जनतेच्या चूक कोण आणि बरोबर कोण हे लक्षात येईल आणि मग तुमच्या टीकेला जनसमर्थन मिळेल. लोकशाही व्यवस्थेमध्ये जनसमर्थनाला अतोनात महत्त्व असते हे पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी समजून घ्यावे. विरोधी पक्षांना जनमताचा कानोसा घेता आला पाहिजे.

Click on image to BUY

पक्षाचे, पक्षप्रमुखांचे विचार हे तळा-गाळात व्यवस्थित पोहोचवणे हे त्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे आणि कार्यकर्त्यांचे काम असते. याचे योग्य नियोजन पक्ष पातळीवरून होणे गरजेचे असते. मनसेच्या बाबतीत दुर्दैवाने हेच घडले नाही. राजसाहेबांचे विचार जनतेपर्यंत व्यवस्थित पोहोचले गेले नाहीत. जे पोहोचले ते अर्धवट, त्यात कुठे व्यवस्थितपणा नव्हता तर त्याउलट विस्कळीतपणाच जास्त होता. प्रचाराची आणि संवादाची एवढी साधने उपलब्ध असताना त्याचा वापर योग्य पद्धतीने झाला नाही. सोशल मिडियावरून प्रचार होत असला तरी त्याला योग्य दिशा नव्हती. सातत्याने मनसेवर जे आरोप होत होते ते आपल्याला खोडता आले नाहीत. त्यामुळे लोकांनाही ते खरे वाटले. झाले गेले गंगेला मिळाले. आता राजसाहेब पण फेसबुकवर आले आहेत. त्यामुळे मनसेच्या सोशल मिडियावरील प्रचाराला योग्य दिशा मिळेल अशी अपेक्षा आहे. वेगवेगळ्या विषयांवर पक्षाची भूमिकाही स्पष्ट होत राहील. राजसाहेब भूमिका मांडतील. जे विचार मांडतील ते राज विचार राजसैनिकांनी राजदूत म्हणून जनतेत न्यायचे काम चोखपणे पार पाडायला हवे. आत्तापासूनच आगामी २०१९ च्या दृष्टीने जर आश्वासक पावले टाकली तर निश्चितपणे यश मिळू शकते. त्यासाठी मनसैनिकांनी व्यवस्थित आत्मचिंतन करून शिस्तबद्ध पद्धतीने, योग्य दिशेने प्रचार करायला हवा. सरकारच्या चूका जनतेच्या निदर्शनास आणून देताना त्या जनतेच्या गळी उतरतील अशा असायला हव्यात. समजा सरकारची एखादी योजना जनतेने स्विकारली असेल आणि त्यात जनतेचा फायदा होत असेल तर त्याला विरोध करून उगीच तोंडघशी पडू नये. त्याने पक्षाचे नुकसानच होणार आहे. कोणताही राजकीय पक्ष घ्या, त्या पक्षाची वर पासून खालपर्यंत एक रचना असते. मग अध्यक्ष, उपाध्यक्ष, सरचिटणीस, संपर्कप्रमुख, जिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्ष, शाखाप्रमुख आणि कार्यकर्ते पक्षीय कामकाजाच्या सोयीसाठी ही रचना केलेली असते. मनसेची पण अशीच काहीशी रचना आहे. त्या माध्यमातून पक्षाची ध्येयं-धोरणे, पक्षप्रमुखांचे विचार, त्यांची अंमलबजावणी या साखळीतूनच होत असते. ही साखळी मजबूत लागते. प्रत्येक मनसैनिक हा या साखळीतील कडी आहे. प्रत्येकाने जर आपली जबादारी निष्ठेने पार पाडली तर *राजविचार* महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जायला वेळ लागणार नाही. ही एक-दोन वर्षांची प्रक्रिया नाही. ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. ही जबाबदारी या साखळीचीच असते. प्रत्येकवेळी, प्रत्येक ठिकाणी राजसाहेब पोहोचू शकत नाहीत. लोकशाही व्यवस्थेत व्यक्ती मोठी असते, त्यापेक्षाही तिचे विचार मोठे असतात. व्यक्तीच्या माघारी सुद्धा त्यांचे विचार कार्य करत असतात याचे उत्तम उदा. म्हणजे मार्क्सवाद, लेनिनवाद, हिटलरवाद हे लोकं आज अस्तित्त्वात नाहीत पण त्यांच्या विचारसरण्या अजूनही अस्तित्त्वात आहेत. भारतातही मार्क्सवादी विचारसरणीवर चालणारे पक्ष आहेत. जगात अनेक ठिकाणी आहेत. मग या मार्क्सवादी विचारांचा प्रचार आणि प्रसार करायला कार्ल मार्क्स ज्याने ही विचारसरणी जगाला दिली तो कधी भारतात आला होता? त्याचा कार्यकाळ १८१८ ते १८८३ हा होता. तो गेला पण त्याच्या समर्थकांनी त्याची विचारसरणी ही नुसती जिवंतच ठेवली नाहीतर ती जगाच्या कानाकोपऱ्यात नेली. लेनिन यानेही हीच मार्क्सवादी विचारसरणी पुढे नेली व त्यात भर घातली त्यालाच पुढे लेनिनवादी विचारसरणी असे म्हटले गेले. गांधीजी आज आपल्यात नाहीत तरी गांधीवादी विचारसरणी आजही आहे. सावरकर आज आपल्यात नाहीत तरीही त्यांचे विचार घेऊन आज कित्येकजण वाटचाल करत आहेत. सांगायचा मुद्दा हा आहे की पक्षाचा आणि पक्षप्रमुखांचा विचार जनमानसात रुजवता आला पाहिजे. त्यासाठी तो अगोदर आपल्यात रुजायला हवा. राजसाहेबांना भेटल्यानंतर सेल्फी जरूर काढा, पण येताना त्याबरोबर विचारांची पण एक प्रिंट घेऊन या आणि ती जनतेला सांगा. सोशल मिडियावर जेंव्हा आपण पक्षाची बाजू मांडतो तेंव्हा ती अभ्यासपूर्ण असावी. एखाद्याने टीका केली तरी त्याला सौजन्याने अभ्यासपूर्ण उत्तरं द्यायला हवीत. त्याला शिव्या घालून, त्याची आई-माई वर काढून आपला पक्ष वाढणार तर नाहीच, पण अजून रसातळाला जाईल. (खळळ-खट्याक हे अस्त्र योग्य तिथेच वापरायला हवे. प्रत्येक ठिकाणी त्याचे काम नाही.) समाजात वावरताना आपल्याकडून असे कोणतेही वर्तन घडू देऊ नये की जेणेकरून त्यामुळे आपल्या आणि आपल्या पक्षाच्या प्रतिष्ठेला धक्का बसेल. लोकं बोलत नसली तरी पाहत असतात. त्यावरून ते त्यांचे मत बनवत असतात.

click on image to buy

आज भाजपा हा देशातला एक मोठा पक्ष आहे. पक्षीय पातळीवर त्यांचे कामकाज कसे चाललेय? त्यांची रणनिती ते कशी आखतात? त्यांची कामाची पद्धत कशी आहे? त्यांचे समर्थक पक्षाचा, ते करत असलेल्या कामांचा कसा प्रचार, प्रसार करताहेत? सोशल मिडियावर त्यांचा कसा प्रचार चालू आहे? ते संघटना कशी वाढवताहेत? काही बाबतीत आक्षेप निश्चित असू शकेल, विषय तो नाही. पण त्यांना यश मिळतेय हा महत्त्वाचा मुद्दा आहे. ज्यांनी आयुष्यभर भाजपाचा तिरस्कार केला, तेच आज त्यांच्या वळचणीला जात आहेत तुम्ही मान्य करा अगर करू नका हे भाजपाचे त्यांचे मोठे यश आहे आणि त्याचे फळ त्यांना मिळत आहे. विषय त्यांच्या स्तुतीचा नाही. आपल्याला यातून काय शिकायला मिळते का हे पाहणे महत्त्वाचे आहे. शाळेत हुशार विद्यार्थ्यांचे अनुकरण आपण करतोच ना? मग तसेच, इथेही आहे. ज्या मार्गाने गेल्यानंतर आपल्याला यश मिळेल तोच मार्ग आपण निवडायला हवा. राजसाहेबांचे विचार जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी मनसैनिकांना *राजदूत* होऊन काम करावे लागेल. जिथे जाल तिथे पक्षाबद्दल सकारात्मक बोला. माणसे जोडायला शिका. १ माणूस जोडला तर ५ मते वाढतात. आपली सत्ता रस्त्यावर असे म्हणून चालणार नाही. राजकीय पक्षाचे मुख्य उद्दिष्ट सत्ता हेच असायला हवे. सत्ता असेल तर विचार आणि धोरणं राबवता येतात. सत्ता मिळाली तर त्या ब्लू-प्रिंटला न्याय मिळेल. सत्ता नसेल तर मग ब्लू-प्रिंट घेऊन काय करणार? पक्षात काम करताना पक्ष हेच आपले कुटुंब आहे असे समजून शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या त्या कुटुंबाशी एकरूप व्हायला लागेल. समाजात वावरताना बोलावे खूप, त्यापेक्षा ऐकावे खूप आणि त्याहीपेक्षा निरीक्षण करावे खूप. सत्ता ही एवढ्या सहजासहजी मिळत नाही. १ बूथ १० यूथ गेल्या निवडणूकीत हे जे भाजपाने तत्त्व वापरले त्यावरही विचार व्हावा. भाजपाला सत्तेत यायला आणि एवढे मोठे यश मिळायला ६०-६५ वर्षे लागली. मा. गोळवलकर साहेब, मा. श्यामाप्रसाद मुखर्जी, मा. हेडगेवार, मा. वाजपेयी साहेब , मा. आडवाणी साहेब यांनी आपापले संपूर्ण आयुष्य पक्षासाठी खर्ची घातले. आज जो भाजपाचा मोठा उंच वटवृक्ष दिसतोय त्याची खोल मुळं म्हणजे या मोठ्या व्यक्ती आहेत. यांच्यामुळेच आज नरेंद्र मोदी-अमित शहा यांच्यासारखी फळे त्या झाडाला लागली आहेत. या फळांनाही भरपूर दगडी खावी लागली आहेत, लागत आहेत तरीही त्यांचे काम ते अखंडपणे करत आहेत. इथे मी भाजपाची स्तुती करतोय असे बिलकूल समजू नये. यश मिळवायचे असेल तर यशस्वी लोकांचेच अनुकरण करायलाच हवे, त्यांचेच चरित्र वाचायला हवे. ही उदा. मी एवढ्यासाठीच देत आहे की मनसैनिक तरुण आहेत. त्यांना राजकारणाचा अनुभव नाही. शिवसेनेची स्थापना झाल्यानंतर मनसे शिवाय महाराष्ट्रात कोणताही दखलपात्र पक्ष स्थापन झाला नाही. पवार साहेबांनी राष्ट्रवादीची स्थापना केली, पण रेडिमेड नेते घेऊन केली. नवीन पक्ष स्थापन झाल्यानंतर त्याला कोणकोणत्या अडचणीतून जावे लागते? किती संघर्ष करावा लागतो? हे आपल्या पिढीला माहिती नाही. त्यात आपला अभ्यासही कमी पडतो. त्यामुळे या सलग आलेल्या पराभवामुळे आपण निराश होतो, आत्मविश्वास गमावून बसतो. आपले लक्ष विचलित होते. पण राजसाहेबांनी ही स्थित्यंतरे मा. बाळासाहेबांच्या बरोबरीने पाहिली आहेत, अनुभवली आहेत. त्यामुळे एवढ्या पराभवानंतर सुद्धा ते बिलकूल विचलित झाले नाहीत. आजही ते ठामपणे, आत्मविश्वासाने उभे आहेत. अशा परिस्थितीत त्यांच्या पाठीशी आपण गट-तट विसरून ठामपणे उभे राहणे हे प्रत्येक राजसैनिकांचे कर्तव्य आहे. हा लेख वाचून आपण त्यावर निश्चितपणे चिंतन कराल आणि करावे अशी माझी सर्वांना विनंती आहे. तुमच्या पर्यंत हा लेख मी पोहोचवला आता आपल्या इतर राजसैनिकांच्या पर्यंत हा लेख पोहोचविण्याची जबाबदारी हा लेख वाचणाऱ्या प्रत्येकाची आहे. धन्यवाद

जय महाराष्ट्र

किशोर बोराटे.

Leave a Reply

Your email address will not be published.