लोकसभेनंतर महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप?

लोकसभेनंतर महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप?

आगामी २०१९ ची लोकसभा मनसे लढणार नाही असे मनसेप्रमुखांनी जाहीर केले. मात्र आपण मोदी-शहा यांच्या विरोधात प्रचारात उतरणार असल्याचे तसेच माझे पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिक ही भाजपाच्या विरोधात प्रचार करणार असल्याचे सांगून राजकीय गोटात एकच खळबळ उडवून दिली. भाजपाला फायदा होईल अशा कोणत्याही पक्षाला (एनडीए) मतदान करायचे नाही असा आदेश त्यांनी दिला. राज आणि शरद पवार यांच्या वाढत्या गाठी-भेटी पाहता मनसे आघाडी बरोबर अथवा स्वबळावर लोकसभेच्या काही जागा लढेल असा एक तर्क वर्तवला जात होता. पण तो साफ खोटा ठरला. आघाडीमध्ये मनसेला घेण्यास काँग्रेसने ठामपणे विरोध दर्शविला. पवार काका-पुतणे मनसेला आघाडीत घेण्यास फार उतावळे झाले होते. पण काँग्रेसने त्यांच्या प्रयत्नांवर पाणी टाकले. पण त्याही पुढे जाऊन राज यांनी आपण युती-आघाडीबाबत कुणाकडेही प्रस्ताव पाठवला नव्हता, अथवा जागांची मागणी कधीही केली नव्हती, हवे तर संबंधितांना विचारा असे सांगून काँग्रेसला तोंडघशी पाडले.

आता सर्वात महत्त्वाचा विषय असा येतो की शरद पवार साहेबांची इच्छा असतानाही मनसेच्या आघाडी प्रवेशाला काँग्रेसने विरोध का केला? त्याचीही काही कारणे आहेत त्यांचे उत्तरप्रदेश, बिहार मधील गणित बिघडले असते असा विचार काँग्रेसच्या गोटात झाला असावा. विषय तो नाही, मनसेला विरोध राज्यातील काँग्रेसचा होता. याबाबत काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्त्वाने कधीही तोंड उघडले नाही. शरद पवार यांनी शेवटपर्यंत प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे. पण त्याला यश आले नाही आणि तरीही राज यांनी आघाडीला विशेषतः राष्ट्रवादीला फायदा होईल अशी भूमिका घेतली. राज ठाकरे हे एक महत्त्वकांक्षी आणि आक्रमक नेते आहेत. त्यांची प्रत्येक कृती ही फार विचार करून केलेली असते. Short Term फायद्यासाठी ते कोणतीही गोष्ट करत नाहीत. बरं काँग्रेसने विरोध केल्यावर पवारांनी गप्प बसावे हे ही एक आश्चर्यच आहे. मनात आणले असते तर त्यांनी राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांना कात्रजचा घाट दाखवून मनसेला आघाडीत घेतले असते. त्यांना ते फारसे अवघडही नव्हते. पण पुढची काही गणितं जुळवण्यासाठी म्हणून त्यांनी संयम बाळगला. मग ही पुढची गणितं काय आहेत? राज आणि पवारांनी मिळून काय रणनिती आखली आहे?

आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा २०१९ ची ही लोकसभा निवडणूक पवार यांची पंतप्रधान पदाची महत्त्वकांक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीने आयुष्यातील अतिशय महत्त्वाची आणि शेवटची निवडणूक आहे. काँग्रेसकडे पवारांच्या तोडीचा एकही मोठा अनुभवी नेता नसल्याने मोदी विरोधी पक्षांची मोट बांधण्याचे महत्त्वाची जबाबदारी पवार यांच्यावरच येऊन पडली. सध्या पवारांच्या इतका जेष्ठ, अनुभवी आणि सर्वमान्य नेता इतर कोणत्याही विरोधी पक्षाकडे नाही. त्यामुळे जर का समजा आगामी निवडणूकीत एनडीए बॅकफूटवर गेली आणि आघाडी सरकार सत्तेत येण्याची परिस्थिती निर्माण झाली तर आघाडीतील पक्ष निश्चितपणे पंतप्रधान पदासाठी शरद पवारांच्या नावाचा आग्रह धरतील अशी साखर पेरणी पवारांनी आधीच करून ठेवली असणार. या जर-तरच्या गोष्टी आहेत पण राजकीय परिस्थिती कशी वळण घेतेय त्यावर सर्व काही अवलंबून आहे. पण पवारांचे वय पाहता त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हणून त्यांना ही शेवटची संधी असणार आहे. त्यामुळे त्यासाठी ते जीवाचे रान करतील. पाच राज्यातील पराभवामुळे असाही भाजपा बॅकफूटवर गेला आहे. त्यामुळे विरोधकांचा उत्साह वाढला आहे. २०१४ ची ती मोदी लाट सद्य स्थितीत अस्तित्त्वात नसली तरीही नरेंद्र मोदी यांचे मोठे आव्हान आहे हे नाकारून चालणार नाही, याची पवारांनाही जाण आहे. पण तरीही देशातील इतर राज्यात जी काही राजकीय समीकरणे बदलली आहेत ते पाहता पवारांचाही आत्मविश्वास वाढला आहे. ज्या परिस्थितीत व्ही. पी. सिंग सरकार स्थापन झाले ती परिस्थिती निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. एनडीए जर १८०-२२० पर्यंत थांबली तर आघाडीचे गणित जुळू शकते. अशीच वेळ आली तर अपेक्षेप्रमाणे पंतप्रधान पदासाठी शरद पवारांचे पारडे जड होऊ शकते. त्या दृष्टीने ते पवार प्रयत्न करत असतील तर ते चुकीचे आहे असेही म्हणता येणार नाही. शेवटी राजकारणात जो तो आपले डाव खेळत असतो. शरद पवार जर पंतप्रधान झाले तर लोकसभा निवडणूकीचा त्याग करून मोदी विरोधी भूमिका घेतल्याच्या बदल्यात मनसेचे किमान दोन खासदार राज्यसभेच्या माध्यमातून संसदेची पायरी चढू शकतात आणि ही अतिशयोक्ती नाही. योग्य वेळ सर्व गोष्टी सिद्ध करत असते. समजा असे काही घडले नाही तरी मनसेचा काही तोटा नाही. कारण त्यांचे मुख्य लक्ष विधानसभा हेच आहे. पण एक आठवण सांगतो की २००४ च्या लोकसभा प्रचारात लालकृष्ण आडवाणी बोलले होते की गेल्या ५ वर्षात वाजपेयी सरकारने एवढी कामं केली आहेत की त्याच्या जोरावर आम्ही पूर्ण बहुमतात सत्ता मिळवू. सद्य परिस्थितीत काँग्रेसला ३ अंकी संख्या गाठणेही मुश्किल होईल. पण त्यानंतर आपण पाहिले की त्या निवडणूकीत भाजपा प्रणित एनडीएचे पानिपत होऊन त्यानंतरच्या सलग दोन पंचवार्षिक निवडणूकीत मनमोहन सिंग पंतप्रधान झाले. खरंतर त्यावेळी वाजपेयी सरकार पराभूत होईल असे कुणालाही वाटले नव्हते. त्यामुळे आडवाणी यांचे ते वक्तव्य त्यावेळच्या परिस्थितीला धरूनच होते. काँग्रेस आघाडीची अवस्था बिकटच होती. पण प्रादेशिक पक्षांच्या जोरावर काँग्रेसने सत्ता मिळवली आणि मनमोहन सिंग पंतप्रधान झाले. राजकारणात काहीही घडू शकते हा इतिहास आहे.

आता २३ मे रोजी काय निकाल लागतो हे आज कुणीही सांगू शकत नाही. काळाच्या उदरात काय दडलंय हे त्यालाच माहिती. भाजपात सुद्धा मोदी-शहा विरोधी गट अप्रत्यक्षपणे सक्रिय आहे. त्यांच्या कुरघोड्या चालूच राहणार. एनडीएच्या जागा कमी आल्या तर सहकारी पक्ष नेतृत्त्व बदलाची मागणी करू शकतात. अशा परिस्थितीत संघाकडे नितिन गडकरी यांच्यापेक्षा इतर कोणी तगडा उमेदवार नाही. तशीच वेळ आली तर दिल्लीच्या गडाचे गडकरी हे नितिन गडकरीच असतील. हा एवढा बदल झाला तरी विरोधी पक्षांच्या दृष्टीने तो मोठा विजय होईल. पण इकडे महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मोठा राजकीय भूकंप होईल. मोठी राजकीय उलथा-पालथ होईल. पवारांच्या बाबत जर विचार केला तर २३ मे रोजी जर पंतप्रधान पदाचे पवारांचे अखेरचे स्वप्न जर धुळीस मिळाले तर मग पवार आगामी विधानसभा निवडणूकीत काँग्रेस बरोबरची युती तोडून टाकतील. कारण असेही राज्यातील काँग्रेस संपल्यातच जमा आहे. एवढी वर्षे त्यांनी काँग्रेसबरोबर युती ठेवली त्यात त्यांची पंतप्रधान पदाची असलेली महत्त्वाकांक्षा हाच त्यांचा मुख्य उद्देश होता. तो संपला, तर पवारांच्या दृष्टीने काँग्रेसही संपली. काँग्रेसचे महत्त्वही संपले. अशा परिस्थितीत आगामी विधानसभा निवडणूकीत ते मुख्यत्त्वे मनसे सह इतर पक्षांच्या बरोबर युती करून विधानसभेला सामोरे जातील. त्यांचा हा निर्णय महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप घडवेल.

मुंबई, ठाणे, नाशिक आणि पुणे या शहरी भागाबरोबरच मनसेची ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांची संख्या सुद्धा प्रचंड आहे. मनसेचे शहरी भागात जास्त प्राबल्य आहे तर राष्ट्रवादीचे ग्रामीण भागात आहे. त्यामुळे जर भविष्यात मनसे-राष्ट्रवादी युती झाली तर राजसाहेब आणि पवारसाहेब यांना जागा वाटपात योग्य प्रकारे संतुलन साधता येईल. दोन्ही पक्षांच्याकडेही कार्यकर्त्यांचे जाळे मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत मनसे-राष्ट्रवादी युती सेना-भाजपा समोर निश्चितपणे मोठे आव्हान उभे करू शकतात. राष्ट्रवादी खालोखाल मनसे मोठा पक्ष असल्याने त्यांना जागाही जास्त मिळू शकतात. त्यामुळे पक्षाला राज्यात विस्तार करण्यास वाव मिळेल. राज ठाकरे आणि शरद पवार हे निश्चितपणे मोठे डावपेच आखत आहेत. आपल्याला काय करायचेय हे त्यांनी ठरवले आहे. त्याप्रमाणे Plan A आणि Plan B त्यांच्याकडे तयार आहे. त्यामध्ये त्यांना यश आले तर २०१९ ची निवडणूक ही अभूतपूर्व असेल. एकही आमदार-खासदार नसलेला पक्ष उद्या सत्तेत दिसला तर आश्चर्य वाटायला नको आणि हे घडू शकते.

आणीबाणीच्या काळात बाळासाहेबांनी काँग्रेसला पाठिंबा दिल्याने त्यांच्याविरोधात देशभरात संतापाची लाट उसळली होती. पण नंतर झालेल्या प्रत्येक निवडणूकीत सेनेची कमान चढती राहिली. ज्या दूरदृष्टीने बाळासाहेबांनी निर्णय घेतला होता, त्याच दूरदृष्टीने राज यांनी निर्णय घेतला आहे. तो योग्य की अयोग्य हे येणारा काळ ठरवेल. पण सत्तेच्या दृष्टीने वाटचाल करण्यासाठी त्यांनी सकारात्मक पावले टाकण्यास सुरुवात केली आहे हे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे तर सेना-भाजपाची आग झाली आहे. पुढे काय घडू शकते याचा अंदाज भाजपातील जुन्या-जाणत्या नेत्यांना आला आहे. वय वर्षे ५ असलेल्या भक्तांना या गोष्टी समजणार पण नाहीत. कारण त्यांची तेवढी कुवतही नाही आणि मोदी-शहा यांच्या पलिकडे त्यांची दृष्टीही जात नाही. पण राजकारणात निर्णय घेताना सर्व संदर्भ तपासले जातात. बुद्धिबळाच्या पटलावर जसे एक चाल खेळताना त्यामागे अनेक चाली, अनेक संदर्भ दडलेले असतात, तसेच राजकारणातही असते. सद्य राजकीय परिस्थितीत तरी मनसे-राष्ट्रवादी या पद्धतीने परस्पर सामंजस्य ठेवून एकत्र वाटचाल करत असतील तर त्यात चुकीचे काहीही नाही. दोन्ही पक्षांचा एकमेकांना फायदा होऊ शकतो. अनेकांना वाटते की सेना, भाजपा, मनसे हे समान विचारधारेचे पक्ष आहेत. मनसेची आणि दोन्ही काँग्रेसची विचारधारा वेगळी आहे. हे बरोबर आहे, पण म्हणून अनेकदा राज यांनी युतीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला. २०१४ च्या विधानसभा निवडणूकीत, त्यानंतर मुंबई महापालिका निवडणुकीच्या दरम्यान सेनेपुढे युतीचा प्रस्ताव ठेवला पण तो त्यांनी धुडकावून लावला. भाजपाला मनसेची अडचण नव्हती, पण सेनेला होती. त्यामुळे तिकडच्या वाटा बंद झाल्याचे लक्षात आल्यावर आणि राज यांना मोदी सरकारच्या विरोधात मुद्दे मिळाल्यावर ते त्यांच्यावर तुटून पडले आणि शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या नात्याने ते राष्ट्रवादीच्या जवळ गेल्याचे चित्र आज पाहायला मिळत आहे. शेवटी ज्याला त्याला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहेच. बाकी विचारधारा वगैरे या फक्त बोलायच्या गोष्टी असतात. राजकारणात गरजेला प्राधान्य असते आणि सत्तेपुढे सर्व काही खुजे असते. गेली ५ वर्षे सेना- भाजपा सतत एकमेकांच्या नावाने गळा काढत होते. तोंड फाटेपर्यंत एकमेकांच्यावर टीका करत होते. आता पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री एकमेकांचे तोंडभरून कौतुक करताहेत. भाजपा-पीडीपी युती ही काय समान विचारधारेवर होती काय? त्यामुळे जशी राजकीय परिस्थिती निर्माण होईल, तशी राजकीय गरज निर्माण होईल आणि जशी गरज निर्माण होईल तशी परिस्थितीनुरूप वेगवेगळी समीकरणे जुळून येतील. मग कळेल मनसे राष्ट्रवादी बरोबर जाते की स्वबळावर लढते? सद्य स्थितीत तरी यांचा प्रवास हा वर मी लिहिल्याप्रमाणेच परस्पर सामंजस्याने चालला आहे एवढे निश्चितच वाटते. बाकी कोण काय बोलते याच्याकडे राज आणि पवार यांनी साफ दुर्लक्ष केले आहे. सद्य स्थितीत तरी राज ठाकरे हे लोकसभेच्या पिचवर विधानसभेची तयारी करताना दिसत आहेत. परिस्थिती कशी वळण घेते हे थोड्याच दिवसांत आपल्याला समजेल.

14 comments

 1. माझं एकच मत आहे की ज्यांचे विरोधात उभी हयात घालवली त्यांचे बरोबर सत्तेसाठी जायचं हे कदापिही मान्य नाही, अजून १०/१५ वर्षे लागले तरी चालतील पण बारामतीकरांबरोबर कदापिही साटंलोटं नकोच, १९९५ चे वेळी युती शासनाचे कार्यकर्ते जमीनीवरच होते व राहिले पण ज्यांनी सत्तेचा आस्वाद घेतला तेच सर्वसामान्य कार्यकर्त्यांना विकत घ्यायची भाषा करु लागलेत, आहो ज्यांची खायची वांदी होती त्यांच्याकडे आज चारचाकींचा ढिग पडलाय, कार्यकर्त्यांना एकनिष्ठतेचे धडे द्यायचे अन् ह्यांनी सगळ्यांचे ताटातलं उष्टमाष्ट खायचं

 2. राज आणि मनसे यांना लोक कधीही जवळ करणार नाहीत. 2009 ला त्यांच्यावर बराच विश्वास जनतेने टाकाला होता. त्याला काय फळ मिळाले, हे आपण पुणे आणि नाशिकमधे पाहिलेच. त्यांचा एकुलता आमदार शिवसेनेच्या वाटेवर गेला, यातून या विश्लेषकाने बोध घ्यायला हवा होता. राज यांचे धरसोडीचे आणि केवळ स्वत:च्या (पक्षाच्या नव्हे) स्वार्थापुरते राजकारण जनता आणि मनसैनिकांना समजते. त्यामुळे लोकसभेनंतर राजकीय भूकंप झालाच तर तो राज एककी पडलेले दिसतील. किवा पुन्हा भाजपच्या दरात दिसतील.

 3. किशोर जी आपण फक्त शक्यता सांगितल्या आहेत.परंतु जर शरद पवार तेल लावलेल्या पहेलवानासारखे वागले तर मनसे ने काय करायचे.२०१४ चा विरोध राष्ट्रवादीला २०१९ चा भाजपाला.पक्ष संघटनेचे काय? आज मनसेने एक जागा उभी करून कुणाच्या कुबड्या न घेता संसदेत एक खासदार स्वाभिमानाने पाठऊ शकत होतोत.या निर्णयामुळे कार्यकर्ता संभ्रमित झाला आहे.

 4. थोडकयात काय , राज काहीही करोत ते बरोबरच असतात असं भ्रम राजभक्तांचा आहे. राजभक्तांकडे त्याचे विशेलशन मुद्देशीत असते. मोदी हा माणूस काय आहे हे राजना पण महिती आहे. पण सत्ते साठी तोफा डागण्याचे काम चालू आहे
  – SHUBHAM SASANE

 5. किशोर जी आपण बोलले त्या प्रमाणे प्लॅन 1आणि प्लॅन 2 दोन्ही सक्सेस होणार…
  मानले तुम्हाला व तुमच्या दूर दृष्टीला

 6. तुम्ही मांडलेल मत अप्रतिम आहे
  त्यातील एक ओळ मला फार मस्त वाटली
  =भक्त वय वर्ष पाच

  एक महाराष्ट्र सैनिक, राजसाहेब सर्मथक
  आकाश रणसिंग.

 7. १००% तुम्ही जे काही विश्लेषण केले आहे ते तशेंच होणार तुमच्या तोंडात साखर पडो

 8. सध्याच्या परिस्थिचे अचूक विश्लेषण……पण ही दूरदृष्टि असणाऱ्या या दोन नेत्यांची दाद द्यायला हवी…

 9. शक्यता नाकारता येत नाही पण विश्लेषण खूप छान…

आपले मत व्यक्त करा