इशरत की कहाणी हेडली की जुबानी

” जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही” म्हणतात. पण जितेंद्र आव्हाडांची खोड काही केली तरी जाणार नाही. त्यांना कसेही टाका ते मांजरागत पायावरच पडणार. पण यावेळी इशरत प्रकरणात मात्र ते तोंडावर पडलेत. आता कुठल्या “तोंडावर” पडलेत हे सर्वांना माहित आहे त्यामुळे त्याचा इथे उल्लेख करायला नको.इशरत तर असे हे जितेंद्र आव्हाड ज्यांनी दहशतवादी इशरतला शहीद ठरवले. तेवढ्यावरच ते थांबले नाहीत तर तिच्या कुटुंबियांना त्यांनी लाखो रुपये आर्थिक मदतही केली. तिच्या नावाने ठाणे-मुंब्रा येथून ऍम्बुलन्सही चालू केली. त्याचबरोबर आज आ. अनिल गोटे यांनी इशरतचा भाऊ जितेंद्र आव्हाड यांच्या ऑफिस मध्ये कामाला असल्याचा आरोप केला आहे. या सगळ्या घटना घडत असताना जाणते राजे मात्र  “अ”जाणते पणे हा राष्ट्रद्रोहीपणा पाहत आपल्या “राष्ट्रवादी” पक्षाची सूत्रे सांभाळीत बसले होते. आपल्या राष्ट्रवादी या पक्षात उघडपणे राष्ट्रद्रोह होत आहे आणि हे जे सगळे घडत होते ते सर्व मा. शरद पवार साहेबांच्या डोळ्यासमोर घडत होते. पण या सर्व प्रकरणात पवारसाहेब धृतराष्ट्र बनून राहिले होते. याबाबत मीडियाने तेंव्हाही आणि आताही कधी पवारसाहेबांना थेट प्रश्न केला नाही.   हा सर्व प्रकार  प्रचंड चीड आणि संताप आणणारा आहे. आज जेंव्हा हेडलीने इशरत दहशतवादी होती असे सांगितले तेंव्हा तर सर्व-सामान्य लोकांची तळपायाची आग मस्तकात गेली. एवढे सगळे घडूनही आव्हाड अजूनही आपल्या वक्तव्यावर ठाम आहेत. त्याहीपुढे जाऊन ते उन्मत्तपणे सांगताहेत की तिला ठार मारायला नको होते तिला जिवंत पकडायला हवे होते आणि अजूनही मा. शरद पवारसाहेब तोंड उघडायला तयार नाहीत हा कसला राष्ट्रवाद आहे?

click here to buy

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना ही देशद्रोह्यांना पाठीशी घालण्यासाठी केली आहे काय? असा प्रश्न आता लोकं विचारू लागली आहेत. शाहू, फुले, आंबेडकरांच्या नावाने तुम्ही पक्ष चालवता मते मागता आणि उघड-उघड राष्ट्रद्रोह करता ही शिकवण कोणाची? पवारसाहेब कुठे चालली आहे आपली राष्ट्रवादी? लोकशाही प्रक्रियेनुसार निवडून आलेल्या मुख्यमंत्र्याला मारायला आलेली ही दहशतवादी आणि तिचे तुम्ही समर्थन करता? पाकिस्तानच्या अतिरेक्यांच्या बरोबर ही काय करत होती? या प्रश्नाचे उत्तर जितेंद्र आव्हाड देऊ शकतील काय? ज्यावेळी तुम्ही इशरत ला पाठीशी घालता त्यावेळी तुम्ही तिच्याबरोबर मारल्या गेलेल्या इतरांच्याविषयीही बोला ना? एकीकडे आपल्या देशाचे जवान देशासाठी प्राणपणाने लढत असताना पवारसाहेब तुमच्या पक्षातील दोन नेते जितेंद्र आव्हाड आणि वसंत डावखरे हे राष्ट्रद्रोहीपणा करत होते तेंव्हा आपण काय करत होता? पवारसाहेब तुमच्या राष्ट्रवादाची आणि राष्ट्रप्रेमाची नोंद आम्ही आमच्या खात्यावर कशाच्या आधारे करायची? हे तरी आम्हाला सांगा.

इशरत2    बहुजन समाजाचे नेते म्हणून आपण ज्या व्यक्तीला भुजबळ साहेबांची खुर्ची द्यायला उतावीळ झाला आहात त्या व्यक्तीची काय लायकी आहे हे जरा तपासा. तुम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून सांगताय की आव्हाड बहुजन समाजाच्या हिताची लढाई लढत आहेत ती हि लढाई आहे काय? हा समस्त महाराष्ट्रातील बहुजन समाजाचा अपमान आहे. पवारसाहेब आज महाराष्ट्रातील जनता तुमच्या या लाडक्याला शिव्यांची लाखोली वाहते आहे. या व्यक्तीला तुम्ही भुजबळ आणि अजित दादांच्या खुर्चीवर बसवायला निघाला आहात त्या व्यक्तीविषयी आपल्या पक्षातीलच लोकांचे काय मत आहे हे जरा तपासून पहा. आता एवढ्या सगळ्या गोष्टी जगजाहीर झाल्या असताना राज्य सरकार का अजून गप्प आहे? अजूनही दहशतवादाला आणि दहशतवाद्यांना पाठीशी घालणाऱ्या आव्हाड यांचेवर राज्य सरकार कारवाई का करत नाही? अजूनही आव्हाड यांची फालतू बडबड चालूच आहे. ही हिंमत त्यांची का होते आहे तर त्यांना ना कायद्याची भीती आहे ना सरकारची भीती आहे. पवारसाहेब पाठीशी आहेत म्हणून तुम्ही वाट्टेल ते कराल तर जनता माफ करणार नाही आणि वाट्टेल ते करणारांना पाठीशी घातले तर पवारसाहेब तुम्हालाही त्याची किंमत मोजायला लागेल. तसेही हा सगळा राष्ट्रद्रोह ज्या मतांच्यासाठी केला गेला ती मते तर मिळाली नाहीतच गेल्या दोन्ही निवडणुकीत पक्षाला सपाटून मार खावा लागला. मग या दिवट्याला नाचवून पवारसाहेबांनी काय मिळवले? पवारसाहेब या असल्या उचापती करून काहीही साध्य होणार नाही वारं कोणत्या दिशेनं वाहते आहे त्याचा अंदाज घ्या.
पूर्वी लोकांच्यात एवढी जागृती नव्हती. आता लोकं सजग झाली आहेत. देशात आणि राज्यात तरुणांची संख्या जास्त आहे. आताची पिढी गांधी घराण्याला भीक घालणारी नाही आणि तुम्ही काहीही सांगितले तरी त्याची खात्री न करता आहे असे स्विकारनारी नाही. पूर्वी लोकांच्या विचारावर तुमचे कमांड होते. तुम्ही अथवा गांधी घराण्याचे वारसदार यांनी काहीही सांगितले तरी आताची पिढी त्याला भूलणार नाही. सोशल मीडियाच्या  जमान्यातील ही पिढी काळाबरोबर चालली आहे तिला तुमच्या भूतकाळाशी काहीही घेणे-देणे नाही. तुम्हाला तिच्या बरोबर चालावे लागेल तुम्हाला गती घ्यावी लागेल. जे आतापर्यंत तुम्ही करत आलात ते इथूनपुढे चालणार नाही. गांधी परिवाराच्या विचारधारेतून बाहेर पडावे लागेल. प्रत्येकाला कात्रजचा घाट दाखवायच्या नादात स्वतः पवारसाहेब आपण आता कात्रजच्या घाटात फक्त सातारा आणि अर्धा पुणे पुरते उरला आहात. उर्वरित महाराष्ट्रातील वर्चस्व नगण्यच आहे. आव्हाडांनीही आता साहेबांच्या जीवावर उडया मारून नको ती थेरं करू नयेत कारण आता जे ते करत आहेत उद्या भविष्यात त्यांना या गोष्टी जड जातील ते निस्तरायला त्यावेळी त्यांना पवारसाहेब मदत करतीलच हे आत्ता स्वतः पवारसाहेबही सांगू शकणार नाहीत. आता भुजबळांच्या प्रकरणावरून आव्हाड यांनी लक्षात घ्यावे.  आता भुजबळ भलेही जात्यात असतील पण आपण सुपात आहोत हे आव्हाड यांनी लक्षात घ्यावे नाहीतर ज्या इशरतचे गोडवे आव्हाड गात आहेत तिचेच भूत उद्या त्यांच्या मानेवर बसेल.
किशोर बोराटे.

आपले मत व्यक्त करा