इंटरनॅशनल खिलाडी

 

international khiladiगेली कित्येक वर्षे भारत-पाकिस्तान मध्ये दुश्मनी आहे. जम्मू-काश्मिर हा त्यातील कळीचा मुद्दा आणि पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद. गेली कित्येक दशके भारतीय जनता या दहशतवादाला त्रासली होती आणि एकदाचा पाकिस्तानला कायमचा धडा शिकवा असे म्हणत होती. पण भारत-पाक संबंध असो, जम्मू-काश्मिर प्रश्न असो, विभाजनवाद्यांचे पाक प्रेम असो, काश्मिर पासून कन्याकुमारी पर्यंतचा पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद, दहशतवादी हल्ले, बॉम्बस्फोट असो, बलुचिस्तान, पाकव्याप्त काश्मिर असो अगर चीनची घुसखोरी, दादागिरी असो या सर्व घटनांमध्ये काँग्रेसच्या राजवटीत कायम बोटचेपी भूमिका घेतली गेली. मोदींनीही सत्तेत आल्यानंतर सुरुवातीला पाकिस्तानला गोंजारून पाहिले पण शेपूट वाकडे ते वाकडे राहिले. मोदींनीही पाकिस्तानच्या बाबतीत काही कालबद्ध कार्यक्रम ठरवला असेल ठराविक एक मुदतीपर्यंत वाट पाहायची नाही सुधारले तर मग जशास-तसे उत्तर द्यायचे. ते परवा त्यांनी १५ ऑगस्टच्या भाषणात आपण कसे *इंटरनॅशनल खिलाडी* आहोत हे चीन आणि पाकिस्तानला एकाचवेळी दाखवून दिले. त्यांनी ज्या पद्धतीने चीन आणि पाकिस्तानचे थोबाड फोडले त्यावर फक्त हिंदुस्थानातीलच नव्हे तर बलुचिस्तानातील, गिलगिट आणि पाकव्याप्त काश्मीरमधील जनता सुद्धा जाम खुश आहे. पाकिस्तानी मिडीया आणि तेथील विचारवंत नवाज शरीफ यांच्यावर अक्षरशः शिव्यांचा भडिमार करताहेत. संपूर्ण पाकिस्तानवर मोदींचे सावट पडलेय. त्यामुळे काश्मिर घ्यायचे तर दूरच पण पाकिस्तानचे अस्तित्त्व टिकवणे हे नवाज आणि कंपनी पुढे आव्हान होऊन बसले आहे. कारण मोदी यांनी बलुचिस्तान, गिलगिट आणि पाकव्याप्त काश्मिरच्या प्रश्नाला हात घालून पाकिस्तानचे टेन्शन वाढवले आहे. आर एस एस च्या संस्कारात वाढलेले मोदी संघाचे अखंड हिंदुस्थानचे स्वप्न साकार करतात की काय ही भीती पाकिस्तानला सतावते आहे.? *पंतप्रधान मोदी यांचे भाषण हे अतिशय मुत्सद्दीपणाचे होते. या भाषणावर ज्यांनी टीका केली त्या बैलांना ते समजले नाही आणि समजणार पण नाही. त्यासाठी अक्कल हवी आणि त्यांचे दुर्दैव असे की ती विकत मिळत नाही.

international khiladi1
click on image to buy

मोदींनी बलोच, गिलगिट आणि पाकव्याप्त काश्मिरच्या नेत्यांचे आणि जनतेचे आभार मानून त्यांचा जो पाकिस्तान सरकार बरोबर जो संघर्ष चालू आहे त्याला एक प्रकारे नैतिक बळचं दिले आहे. पाकिस्तान सरकार आपल्याच लोकांच्यावर हल्ले करून त्यांना कसे मारत आहे आणि तिथे मानवी हक्कांची कशी पायमल्ली होत आहे याकडे मोदी यांनी जगाचे लक्ष वेधले आहे. पाकिस्तानी आर्मी त्यांचा कशाप्रकारे छळ करतेय हे पाकिस्तानी मिडीया दाखवत नाही. त्यामुळे बलुचिस्तान, पाकव्याप्त काश्मिर, गिलगिट, सिंध येथे जो काही रक्तपात होत आहे तो जगासमोर येत नाही. त्याकडे मोदी यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष वेधले आणि प्रश्न जम्मू-काश्मिरचा नसून *पाकव्याप्त काश्मिरचा आहे जो की हिंदुस्थानचा भाग आहे आणि पाकने तो बेकायदेशीरपणे आपल्या ताब्यात ठेवला आहे हे ठासून सांगतानाच पाकिस्तानने बलुचिस्तानच्या संदर्भात जगापुढे यावे असे आव्हान मोदी यांनी पाकिस्तानला दिले. त्यामुळे पाकिस्तानात अक्षरशः भूकंप आला त्याचे हादरे चीनला ही बसले. हे सर्व करण्याआधी पंतप्रधान मोदी यांनी याप्रश्नी सर्व पक्षीय बैठक बोलावून आपल्या रणनितीची कल्पना सर्व सहकारी पक्ष तसेच विरोधी पक्षांना दिली. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादीसह सपा, लालू, नितीश, ममता, जयललिता यांच्यासह सर्व पक्षांनी मोदी यांना समर्थन देऊन एका जबाबदार विरोधी पक्षाच्या भूमिका पार पाडतानाच आम्ही आमच्या घरात भांडू पण शत्रूच्या विरोधात एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून संघटितपणे उभे राहू हा संदेश जगाला दिला. पुढचा धोका ओळखून चीनने आज खुलासा केला की आम्ही भारत आणि पाकिस्तानपासून समान अंतर ठेवून आहोत. आम्हाला दोघेही सारखेच आहेत. आम्ही कुणाचीही बाजू घेणार नाही. भारत आणि पाकिस्तानने आपसातले प्रश्न आपसातच सोडवावेत, चीन त्यामध्ये लक्ष घालणार नाही. *जो चीन आजपर्यंत अगदी आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा उघडपणे पाकिस्तानची बाजू घ्यायचा, त्याच चीनचे आज असे स्टेटमेंट आले. एवढेच नव्हे तर आत्तापर्यंतच्या इतिहासात प्रथमच चीनच्या सरकारी वृत्तपत्रांनी पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीरचा उल्लेख पाकव्याप्त काश्मिर असा केला. हे मोदी आणि सुषमा स्वराज यांच्या परराष्ट्र धोरणाचे यश आहे. त्याला कारणही तसेच आहे. *चीनचा महत्त्वकांक्षी प्रकल्प ग्वादेर पोर्ट हा बलुचिस्तान मध्ये उभा राहतोय. बलुचिस्तानला ७२० कि. मी. दीर्घ समुद्रकिनारा लाभला आहे. पाकिस्तानच्या एकूण क्षेत्रफळापैकी बलुचिस्तानचे क्षेत्रफळ हे ४२% आहे. या प्रकल्पासाठी चीनने जवळ-जवळ २०० अब्ज डॉलर्स इतके प्रचंड भांडवल गुंतवले आहे. परंतू *बलुचिस्तानची जनता पाकिस्तानपासून स्वतंत्र होण्यासाठी पाकिस्तान सरकार बरोबर सशस्त्र संघर्ष करत आहे. त्यामुळे चीनचा ग्वादेर पोर्ट हा महत्त्वकांक्षी प्रकल्प अडचणीत सापडला आहे. बलोचच्या जनतेचा या प्रकल्पाला विरोध आहे. त्यांना अशी भीती वाटते आहे की या प्रकल्पाच्या माध्यमातून चीन इथे बस्तान बसवू पाहतोय आणि चीन एकदा का इथे स्थिरावला की मग बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची लढाई अवघड होऊन जाईल.* त्यांची ही भीती खोटी नाही. पुढं काय वाढून ठेवले आहे हे त्यांना दिसतेय, त्यामुळेच या प्रकल्पावरील इंजिनियर, कामगार यांच्यावर बलोच जनतेने हल्ले करून तो प्रकल्प बंद पाडला आहे.
ग्वादेर पोर्टला बलोच जनतेचा होत असलेला विरोध ही चीनची मोठी डोकेदुखी आहे. तो प्रकल्प मार्गी लावावा म्हणून चीनने पाकिस्तानच्या मागे तगादा लावला आहे. पाकिस्तान बळाच्या जोरावर बलोच जनतेची मुस्कटदाबी करत असतानाच पंतप्रधान मोदी यांनी बलुचिस्तान प्रश्नाला हवा देऊन आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष बलुचिस्तानकडे वेधले आणि एनएसजी मध्ये चीनने जो भारताच्या प्रवेशाला उघड विरोध केला त्याचा बदला घेतला. चीनच्या ही लक्षात आले आहे की भारताच्या विरोधात जाऊन आपल्या हाती काहीच लागणार नाही त्यामुळे त्यांनी आता सध्यातरी त्यांची भारतविरोधी भूमिका बदलली आहे असे त्यांच्या प्रतिक्रियेवरून दिसते. बलुचिस्तान मधील भारताचा हस्तक्षेप हा चीनसाठी नक्कीच त्रासदायक असणार आहे. हे टाळायचे असेल तर चीनला एनएसजी मध्ये भारताला पाठिंबा द्यावा लागेलच. त्याचबरोबर पाकव्याप्त काश्मीर प्रश्नीही त्यांना भारताच्या बाजूने भूमिका घ्यावी लागेल. धरलं तर चावतंय आणि सोडलं तर उरावर बसतयं अशी अवस्था चीनची मोदी यांनी करून ठेवली आहे. मोदी यांची ही भूमिका जनतेनेही प्रचंड उचलून धरल्याने झकमारत काँग्रेसलाही मोदी यांच्या भूमिकेचे समर्थन करावे लागले. माजी पंतप्रधान इंदिराजी गांधी यांनी जसा पाकिस्तानवर हल्ला करून स्वतंत्र बांग्लादेशची निर्मिती केली त्याच धर्तीवर मोदी पाकिस्तानवर हल्ला करून स्वतंत्र बलुचिस्तानची निर्मिती करून पाकव्याप्त काश्मिर ताब्यात घेतात की काय या विचाराने पाकिस्तान चिंताग्रस्त आहे. १५ ऑगस्टच्या भाषणात मोदी यांनी पाकिस्तानला दम भरला असला तरी त्यांच्या निशाण्यावर खऱ्या अर्थाने चीनच होता. तरीही एका दगडात त्यांनी चीन, पाकिस्तान आणि काँग्रेस असे तीन पक्षी मारुन आपणच इंटरनॅशनल खिलाडी असल्याचे दाखवून दिले.

किशोर बोराटे.

आपले मत व्यक्त करा