गरुडझेप

मनसेच्या वर्धापन दिनी हा आपला शेवटचा पराभव असे सांगून मनसेअध्यक्ष मा.राजसाहेबांनी मनसैनिकांच्यात जोश निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर जे शांत झाले ते अद्याप शांतच आहेत. त्यानंतर राजसाहेब पक्षांतर्गत काही बदल करतील. काही नवीन कार्यक्रम देतील अशी मनसैनिकांना आशा होती. साधारण १५ दिवसांपूर्वी साहेबांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांची मिटिंग घेऊन काही खलबतं केली. थोडं त्यांचं ऐकून घेतलं. तर थोडं त्यांना ऐकवलं. त्यावेळी अशी चर्चा होती की साहेब प्राथमिक टप्प्यात मुंबईतील लोकसभा मतदारसंघात काही ठिकाणी मेळावे घेणार आहेत. पण त्याचेही पुढे काय झाले ते समजले नाही. पक्षीय पातळीवर काहीच सकारात्मक हालचाल दिसत नसल्याने सैनिक पण गोंधळून गेले आहेत. पनवेल महानगरपालिकेची निवडणूक तोंडावर असताना त्याची काही तयारी दिसत नाही. त्यामुळे तेथील राजसैनिक काही आदेश येतो का त्याची वाट पाहत बसलेत. आगामी लोकसभा विधानसभा निवडणूकांना साधारण दीड ते दोन वर्षांचा कालावधी बाकी आहे. कदाचित दोन्ही निवडणूका एकत्र घ्यायच्या शासनाने ठरवले तर १९९९ प्रमाणे दोन्ही निवडणूका एकत्रच दीड वर्षांनी लागतील. तसे झाले तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची दोन्ही निवडणूका पूर्ण ताकतीने लढवण्याची तयारी आहे का? त्यासाठी लागणारी तयारी पक्षाने केली आहे का? या प्रश्नांची आज तरी उत्तरे सध्याच्या परिस्थितवरून नाही अशीच आहेत. लोकसभा, विधानसभा निवडणूकीतील पराभवानंतर त्यातून धडा घेऊन जर पक्षाने संघटना बांधणी केली असती तर त्याचा फायदा पक्षाला नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणूकीत झाला असता. पण तसे काही प्रयत्न झाले नाहीत. त्यामुळे लोकसभा, विधानसभा निवडणूकीनंतर महापालिका निवडणुकीतही पक्षाला मानहानीकारक पराभव पत्करावा लागला. नक्की काय चुकतंय हेच कुणाला कळत नाही. जय-पराजय हे राजकीय पक्षांना चुकत नाहीत. विषय पराभव होण्याचा नाही तर झालेल्या पराभवातून काहीतरी शिकून तुम्ही परत प्रभावीपणे कशी वाटचाल करता याचा आहे. एका राजकीय पक्षाची ज्या पद्धतीने किंवा गतीने वाटचाल व्हायला हवी तशी ती मनसेची होताना दिसत नाही. देशात, राज्यात एवढ्या घडामोडी घडत असताना प्रत्येक घटनेवर राजकीय पक्षांची एक भूमिका असते तशी कोणतीही भूमिका मनसेची सद्य स्थितीत दिसत नाही.

जोपर्यंत स्वतः राजसाहेब संघटनेची सर्व सूत्रं हातात घेऊन पूर्णवेळ लक्ष घालत नाहीत तोपर्यंत इंजिन चालू होणार नाही आणि त्याला अपेक्षित गती देखिल येणार नाही. पक्षाला विजयापर्यंत घेऊन जाईल असा एक कार्यक्रम बनवून त्या मिशनवर स्वतः सातत्याने काम करून निष्ठावान पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना जबाबदारी वाटून देऊन त्याचा वेळेवर आढावा घेत नाहीत तोपर्यंत मिशन २०१९ खूप दूर असेल. चमत्काराची वाट राजसाहेबांनी आणि मनसैनिकांनी पाहू नये. नक्की आपल्याला काय करायचे आहे आणि कसे करायचे आहे? याचा आराखडा बनवून त्यावर काम करावे लागेल. कारण समोर आव्हान तगडे आहे. भाजपा, सेना, काँग्रेस, राष्ट्रवादी असे चारही तगडे पक्ष आहेत. जोपर्यंत तुमची ताकत वाढत नाही तोपर्यंत कुणीही तुम्हाला जवळ करणार नाही. पुढच्याच्या मांडीला मांडी लावून बसायला तेवढी ताकत निर्माण करायला हवी. कारण युती ही बरोबरीच्या पक्षाशी होते. घरच्याने जवळ केले नाही मग बाहेरचा कसा करेल? हा विचार करून या चारही पक्षांना विशेषतः भाजपा-सेनेला हरवावेच लागेल. ते हरतील तेंव्हा मग आपण विजयी होऊ असे स्वप्न पाहणे शहाणपणाचे नाही. संघटनात्मक काम हातात घेऊन शासनाच्या विरोधात जाणारे मुद्दे हेरून त्यावर आंदोलनं करून सक्षम विरोधी पक्षाची भूमिका बजवावी लागेल. भाजपा सक्षम आहे त्यांची वोट बँक मजबूत आहे हे जरी खरे असले तरी सेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा जो जनाधार आहे तो आपल्याकडे कसा वळेल हे पाहायला हवे. भाजपाची मतं फुटू शकतात, कमी होऊ शकतात. तरीही जरी नाही झाली तरी इतर तिघांचे मतदान फुटू शकते. त्याच बरोबर २००९ साली जे १३ आमदार निवडून आले होते. परिस्थिती मध्ये आता जरी बदल झाला असला तरी जो मुळचा मनसेचा मतदार आहे त्याला परत पक्षाकडे कसे वळवता येईल हे पाहिले पाहिजे. आपल्याला सोडून जर ते तिकडे जाऊ शकतात तर त्यांना सोडून ते परत इकडे देखील येऊ शकतात. फक्त त्यांना येण्यासाठी कारण हवे ते तुम्ही द्यायला हवे. जे पदाधिकारी पक्ष सोडून गेले त्यांना परत आणण्यासाठी कंबर कसावी लागेल. गट-तट करणारांना तंबी द्यावी लागेल. तरीही जे ऐकणार नाहीत त्यांना खड्यासारखे बाजूला काढावे लागेल. इतर पक्षातील कोणी नेते पक्षात आणून पक्षाची ताकत वाढवावी लागेल. ज्याचा पडतळीचा काळ आहे शक्यतो त्याच्याबरोबर जायला सहसा कोणी इच्छुक नसतो. तरीही तिकिटासाठी किंवा अन्य कारणांसाठी कोणी स्वतःचा पक्ष सोडून येत असेल तर त्याला घेऊन ताकत वाढवावी लागेल. २००९ पासून जेवढ्या निवडणूका झाल्या त्याचा आढावा घेऊन १ नंबर आणि २ नंबरला मतदान झालेले मतदारसंघ निवडून तिथे जोर दिला आणि तिथली घट्ट मजबूत बांधणी केली तर त्याचा नक्की फायदा आगामी निवडणूकीत झालेला दिसेल. त्याच बरोबर केवळ मुंबई, पुणे, ठाणे आणि नाशिक इथपर्यंतच मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी काम चालू करावे लागेल. सहकाऱ्यांना सोबत घेऊन एक एक मतदारसंघ बांधावा लागेल. बांधणी करतानाच प्रत्येक मतदार संघात तीन-तीन उमेदवार हेरून त्यांना आगामी निवडणुकीसाठी तयार करावे लागेल. उमेदवारी देताना त्याचा जनसंपर्क, निष्ठा, निवडून येण्याची क्षमता, त्याची आर्थिक परिस्थिती आणि तेथील जातीय समीकरणे ही विचारात घेऊनच उमेदवार निवडले तर अपेक्षित परिणाम मिळतील. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र सोडला तर मराठवाडा आणि विदर्भात जातीय गणितांना खूप महत्त्व असते. भले तुम्ही जातीच्या चष्म्यातून कुणा व्यक्तीकडे नका बघू पण मतांच्याकडे जातीय चष्म्यातूनच पाहावे लागेल. आजपर्यंत राजसाहेबांनी कधीच या गोष्टींच्याकडे लक्ष दिले नाही. मनसे हा पक्ष पूर्णपणे राजसाहेबांच्यावर अवलंबून असल्याने प्रचाराच्या वेळी खूप गडबड होते तर एकखांबी तंबू असल्याने प्रचाराची सुरुवात साधारणपणे ६ ते ८ महिने आधीच करावी लागेल. मोदी साहेबांनी लोकसभा निवडणुकीचा प्रचार दीड वर्ष आधी सुरू केला होता हे लक्षात घ्या. जी पदं रिक्त आहेत ती भरून त्यांना आत्मविश्वासाने कामाला लावावे लागेल. सरकारचे अपयश जनतेपुढे सातत्याने मांडावे लागेल. प्रत्येक बुथ ना बुथ मजबूत करायला हवा. अमित शहा जिथे जातील तिथे सर्वसामान्य कार्यकर्ते आणि बुथधारक यांच्यातच बसतात. त्यांना कार्यक्रम देतात. त्याचा आढावा सातत्याने घेतात. प्रत्येकाला जबाबदारी वाटून दिली पाहिजे. जमिनीवर काम करणारे कार्यकर्ते हवेत. पक्षाला निवडणूक जिंकून देणारी यंत्रणा उभी करायला हवी. करण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत त्या करायला हव्यात. प्रवक्त्यांची फौज उतरवून त्यांना सातत्याने मिडीयाच्या संपर्कात ठेवायला हवे. चालू घडामोडीवर पक्षाची रोजची रोज भूमिका स्पष्ट व्हायला हवी. काळ बदलला आहे जग वेगाने पुढे चालले आहे. जगाचेही दोन पावलं पुढे जाण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. तुम्ही लोकांच्या सतत समोर असले पाहिजे. हा सोशल मिडीयाचा जमाना आहे. पक्षाचा प्रचार करण्यासाठी सोशल मिडियाची मजबूत टीम बनवून त्यांना कसा प्रचार करायचा याचे प्रशिक्षण देऊन त्यांच्या माध्यमातून जोरदार प्रचार आत्तापासूनच करावा लागेल. वातावरण निर्मितीसाठी सोशल मिडिया हे एक प्रभावी माध्यम आहे. मिडिया आणि सोशल मिडिया याचा योग्यपणे वापर करून घेतला तर प्रभावी प्रचार तर होईलच पण जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचता येईल. मोदी यांनी सुरुवातीपासूनच सोशल मिडियावर लक्ष केंद्रित केले होते. त्यांचा प्रभाव वाढायला लागल्यानंतर मग मिडिया स्वतःच्या TRP साठी मोदी यांच्या मागे ते माईकचे दांडके आणि कॅमेऱ्याचे खोके घेऊन पळायला लागला.

Click on image to BUY

शेतकरी सेना, कामगार सेना, विद्यार्थी सेना आणि वाहतूक सेना जेवढ्या पक्षाच्या अधिकृत सेना आहेत त्या सर्वांना आपापल्या क्षेत्रातील मुद्दे घेऊन रस्त्यावर उतरवले पाहिजे. वेळ कमी राहिला आहे. शांत राहून काहीही उपयोग नाही. दिवसेंदिवस राजकारण बदलत चालले आहे. सत्ताधारी पक्ष नेहमीच मजबूत वाटतो, असतोही मजबूत सगळ्याच बाबतीत त्यांची यंत्रणा सक्षम असते. तुम्ही शांत बसला तर प्रवाहाबाहेर टाकला जाल. घरात बसून राहिलात तर तुमची दखल कुणी घेणार नाही. धडपडतच जडणघडण होत असते. सत्ताधारी नाही होता आले तरी हरकत नाही. एक सक्षम विरोधक म्हणून मजबुतीने पुढे या. लोकं दखल घेतील. किंबहुना लोकांनी दखल घ्यावी असे काम तुमच्या हातून घडू द्या. जी आंदोलनं हातात घ्याल ती प्रामाणिकपणे तडीस घेऊन जा. आंदोलनं कशी करायची याचा अनुभव मनसेपेक्षा जास्त कुणाला असेल? केलेल्या आंदोलनांची, कामाची जाहिरात सर्वात प्रथम आणि प्रचंड प्रमाणात करायला हवी. प्रादेशिक पक्षांची संपूर्ण धुरा ही त्या पक्षाच्या प्रमुखवर अवलंबून असते. तरीही राजकीय पक्ष चालवणे हे एक टीमवर्क आहे. आपल्या खालोखाल नेत्यांची दुसरी फळी, तिसरी फळी उभी करणे त्यांना चांगले तयार करणे ही पक्षप्रमुखांची जबाबदारी असते. तेवढा विश्वास खालच्या लोकांच्यावर टाकायला हवा. त्यांच्यावर पूर्ण विश्वास टाकला तर ते अपेक्षित रिझल्ट देऊ शकतील. पक्षप्रमुख आणि त्यांच्यानंतरची नेत्यांची फळी यांचा जमिनीवरील कार्यकर्त्यांशी थेट संपर्क हवा. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील, तालुक्यातील प्रश्नांची जाण त्यांना हवी. केवळ प्रश्न माहिती असून चालणार नाही तर त्याची उत्तरेही तुम्हाला शोधावी लागतील. वरचेवर जिल्हा, तालुका, राज्य पातळीवर पदाधिकारी, कार्यकर्ते मेळावे आयोजित करायला हवेत. मेळावे, छोटी-मोठी आंदोलनं यातूनच स्थानिक स्तरावरील नेतृत्त्व घडत जाते. प्रत्येक राजकीय पक्षाने दरवर्षी संपूर्ण राज्यभरात सदस्य नोंदणी कार्यक्रम राबवायलाच हवा. त्यामुळे कोणत्या जिल्ह्यात, तालुक्यात आपली किती ताकत आहे हे लक्षात येते. एक एक मतदारसंघ मजबुतीने बांधायला हवा. बाहेर पडून सर्वसामान्य पदाधिकारी, मनसैनिक, सर्वसामान्य जनता यांना भेटायला हवे. घरातून बाहेर पडून लोकांच्यात गेले तर लोकं घरातून बाहेर पडून तुम्हाला मतदान करतील. राजकारण हे पार्ट टाईम करण्याचे दिवस संपले आहेत. निवडणूक असो अगर नसो अमित शहांची संपूर्ण देशभर भिरकीट चालूच असते. अजितदादा कसलीही छोटी-मोठी निवडणूक असू दे स्वतः प्रचाराला जातात. नुसते जात नाहीत तर प्रचाराचा आढावा घेणे, कामं वाटून देणे. कार्यकर्त्यांना सूचना देणे. त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे या गोष्टींना ते महत्त्व देतात. मग ती निवडणूक लोकसभा, विधानसभा असू दे अगर जिल्हा परिषद पंचायत समिती असू दे नाहीतर अगदी महानगरपालिका, नगरपालिका किंवा बाजार कमिटी असू दे. प्रत्येक ठिकाणी बारकाईने ते लक्ष घालतात. प्रचारावर लक्ष ठेवतात. स्वतः प्रचारसभा घेतात. या नेत्यांच्या राजकिय भूमिकेबाबत दुमत असू शकते, विषय तो नाही. पण जे चांगले आहे त्याचे कौतुक व्हायलाच हवे. राजकिय पक्ष चालवताना एखाद्या कॉर्पोरेट कंपनी प्रमाणे काम करावे लागते. कंपनी चालू करून ती नावारूपाला आणण्यासाठी प्रचंड कष्ट घ्यावे लागतात. जाहिरात करावी लागते. तेच कष्ट राजकीय पक्ष वाढवताना घ्यावे लागतात. कधी नव्हे एवढी राजकारणात स्पर्धा निर्माण झाली आहे. त्याला तोंड द्यायलाच हवे. यशस्वी व्हायचे असेल तर त्यातून माघार घेता येणार नाही. लोकांना रोज काहीतरी नवीन लागते. ते देण्याचा त्यांना प्रयत्न करावा लागेल. दरबारी राजकारणातून काही साध्य होणार नाही. मोदी साहेब थेट जनतेच्या संपर्कात राहण्यासाठी मन की बात करतात. लोकं पण मिडिया काय म्हणते यापेक्षा मोदी साहेब काय म्हणतात यावरच जास्त विश्वास ठेवतात. एवढा विश्वास जनतेत निर्माण करावा लावतो. निवडणूकांना दीड वर्षाचा अवधी आहे. या कालावधीत जर राजसाहेबांनी कष्ट घेतले तर मनसेला निश्चित गरूडभरारी घेता येईल. एक निश्चित रणनिती आखून त्यावर काम करावे लागेल.त्याला पर्याय पण नाही आणि शॉर्टकट पण नाही.

किशोर बोराटे.