चक्रव्यूव्ह

तीन वर्षांपूर्वी झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणूकांत मनसेचा मोठा पराभव झाला. त्यानंतर काही प्रमुख नेते आणि इतर छोटे-मोठे पदाधिकारी यांनी पक्षाला सोडचिट्टी दिली. तिथून पुढेही ही पराभवाची मालिका कल्याण-डोंबिवली, मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिक महापालिका निवडणूकीत कायम राहिली. एकमेव नाशिक महापालिकेत सत्ता होती ती ही गेली. नाशिकमध्ये एवढी विकास कामं करूनही पक्षाला निवडणूकीत आलेल्या अपयशाने राजसाहेब चांगलेच व्यथित झाले. वर्धापनदिनाच्या पदाधिकारी मेळाव्यात त्यांनी कामं करूनही जर मतं मिळत नसतील तर मग लोकांना नक्की हवं तरी काय? असा उद्दिग्नपणे सवाल केला. मी एवढी कामं करूनही तुम्ही यांना सत्ता दिली, मग आता यांनी जे फासे टाकले तेच फासे आता मी इथून पुढे टाकणार असे सांगून राज यांनी सैनिकांचा जोश वाढवण्याचा प्रयत्न केला. लोकसभा, विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतरही राज यांनी आपली सत्ता रस्त्यावर असे सांगून सैनिकांना धीर देण्याचा प्रयत्न केला होता. सैनिकांच्यात चैतन्य आणण्याच्या दृष्टीने म्हणून अशी वाक्य त्या-त्या वेळी बोलणे योग्य आहे. त्यात गैर काही नाही. उलट पराभवातून सावरण्याचे तात्पुरते बळ त्यातून मिळत असते. पण सारखे सारखेच पराभव जर पदरी पडत असतील तर मग या वाक्यांची धार ही बोथट होऊन जाते. मनसेची सध्याची अवस्था पाहता पक्ष खूप अडचणीतून जात आहे. एका बाजूला पक्ष, एका बाजूला घरगुती अडचणी संकट आली की ती पाठोपाठ येतात. याचा अनुभव सध्या राजसाहेब घेत आहेत. पक्षाबाबत बोलायचे झाले तर नुकतीच राजसाहेबांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन पुढील वाटचाली संदर्भात चर्चा केली. त्याच्या बातम्या मिडिया, सोशल मिडिया वरून वाचायला, ऐकायला मिळाल्या. पदाधिकाऱ्यांनी आपापली भूमिका स्पष्ट केली. त्यामध्ये काहींनी सांगितले की फक्त मराठी, मराठी न करता मराठी माणसाबरोबर इतरांनाही सामावून घेऊ, अनेक बाबतीत पक्षाची भूमिका स्पष्ट नसते. त्यामुळे आम्हाला फिल्डवर काम करताना अडचणी येतात. वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या बाबतीतही अनेकांनी तक्रारी केल्या. साहेबांनीही आपली भूमिका जनतेपर्यंत स्पष्टपणे पोहोचवली जात नसल्याबद्दल खंत व्यक्त केली. त्यानंतर बाळा नांदगावकर यांनी मिडियाशी बोलताना सांगितले की सर्वांचे साहेबांनी ऐकून घेतले. त्यानंतर साहेबांनी मी मराठीचा मुद्दा सोडणार नसल्याचे ठामपणे सांगितले. मला कोणी मतं देऊ अगर नको देऊ पण मी मराठी माणसाच्या भूमिकेवर ठाम आहे. अशी भूमिका राजसाहेबांनी घेतल्याचे समजले. नंतर राजसाहेब कधी मिडियाशी बोलतील तेंव्हा सर्व गोष्टी स्पष्ट होतीलच. पण आत्तापर्यंतच्या घडामोडी पाहिल्या तर एक लक्षात येते की मनसेने पक्षाच्या स्थापनेपासून घेतलेला मराठीचा मुद्दा मनसे सोडणार नाही.
मराठीचा मुद्दा हा मनसेचा आत्मा आहे. तो त्यांनी सोडूच नये. पण त्याबरोबर पक्षाचा दृष्टिकोन व्यापक कसा होईल हे ही इथं पाहिले गेले पाहिजे. २०१४ पासून भारतीय राजकारणाचे सर्व आडाखे बदलले आहेत. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात हिंदू आणि मुस्लिम असे मतांचे ध्रुवीकरण झाले आहे. बदलत्या राजकीय परिस्थिचा अभ्यास करून नेतृत्त्वाने स्वतःमध्ये, पक्षामध्ये काही आवश्यक ते बदल करणे ही काळाची गरज आहे. आज महाराष्ट्रातील प्रमुख शहरात परप्रांतीयांची संख्या प्रचंड वाढली आहे. प्रत्येक मतदारसंघात त्यांची मतं निर्णायक ठरत आहेत. मुंबईपुरता जर आपण विचार केला तर मध्यंतरी जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार मुंबई महापालिका कार्यक्षेत्रात मराठी माणसाचे मतदान सर्वसाधारण २२% आहे. ठाण्यात यापेक्षा २-३ % जास्त असेल. प्रॅक्टिकली विचार केला तर जरी मराठी माणसाचा मुद्दा घेतला तरी हे सर्व २२% मतदान मनसेला पडणे शक्य नाही. कोणत्याच पक्षाला पडणार नाही. २२% तील किमान दोन टक्के लोकं मतदान करत नाहीत असे धरून चालू, राहिले २०% या २०% त सर्व राजकीय पक्ष, अपक्ष उमेदवार आणि बंडखोर उमेदवार त्यांच्यात हे २०% मतदान विभागले जातेय. मग एकहाती सत्ता कशी येणार? हे झाले टेबलावरील आणि पेपरवरील गणित. पण इकडे संघटनात्मक पातळीवर देखील बोंब चालूच आहे. संघटनेत विस्कळीतपणा आलेला असेल तर मग पक्षाला मतदान होणार कसे? कोणी मतं देऊ अगर न देऊ असे म्हणून कसे चालेल? आपण राजकीय पक्ष काढलेला आहे, सामाजिक संघटना नाही. आपल्याबरोबर जी लोकं आहेत त्यांना मंत्री, नगरसेवक आमदार, खासदार, मंत्री व्हायचे आहे. ते एका अपेक्षेने तुमच्याबरोबर आहेत त्यांचे भविष्य काय?

Click on image to BUY

पक्षाच्या स्थापनेला १० वर्षे झाली. गेली १० वर्षे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, जिल्ह्यात, तालुक्यात, गावात, वाड्या-वस्त्यांवर राजसैनिक पक्षाची वाट पाहत आहेत. पण पक्ष मुंबई, ठाणे, नाशिक आणि पुण्याच्या पलीकडे लक्ष घालायला तयार नाही. यादरम्यान अनेक निवडणूका आल्या आणि गेल्या. पण पक्षाने त्याची दखल घेतली नाही. काही सैनिकांनी स्वतःच्या हिमतीवर अश्वत्थामा होऊन निवडणूक लढवली. तो द्रोणाचार्यांचा पुतळा उभा करून धनुर्विद्या शिकला. या राजसैनिकांनी राजसाहेबांचा फोटो बॅनरवर लावून निवडणूका स्वतःचे पैसे खर्च करून लढवल्या. पण त्यात त्यांना यश आले नाही. कारण त्यांना कुणाचीच मदत मिळाली नाही. काहींची अवस्था तर अशी की त्यांना प्रचाराचे साहित्य, पक्षाचे झेंडे सुद्धा मिळाले नाहीत. काहीजण जिंकून देखील पक्षाने त्यांची दखल घेतली नाही, त्यांना पुढे मार्गदर्शन केले नाही. मग कार्यकर्ता एकटा पडला. किती दिवस तो कोणाच्याही मदतीशिवाय प्रस्थापितांच्या विरोधात एकटा लढणार? वरिष्ठ नेत्यांचा तळागाळातील सैनिकांशी संपर्कच राहिला नाही. मग त्याला पक्ष सोडण्याशिवाय पर्याय तरी काय? काहीजण गेले तरी अजून खूपजण वाट पाहताहेत राजसाहेबांच्या प्रेमाखातर थांबलेत आज ना उद्या परिस्थिती बदलेल असा त्यांना विश्वास वाटतोय. राजसाहेबांनी ज्यांना मोठमोठी पदं दिली ते नेते राज्यात कधी फिरकलेच नाहीत. तरुणांचा पक्ष अशी ओळख असलेल्या मनसेत तरुणांचे, विद्यार्थ्यांचे संघटन उभे करण्यासाठी काय प्रयत्न झाले? मुंबई मध्ये बसून पदांच्या नियुक्त्या केल्या गेल्या. कार्यकर्त्यांनीच यांना मुंबईत बुके घेऊन भेटायला जायचे. यांनीच नेलेला बुके परत हे नेते कार्यकर्त्यांना देणार कार्यकर्ते फोटो काढून घेणार आणि त्याचा बॅनर करून गावात लावणार. सोशल मीडियात टाकणार, सोशल मिडियात तोच DP ठेवणार. साहेबांनी कधी या नेत्यांना का विचारले नाही की तुमच्याकडे राज्याची जबाबदारी आहे, किती वेळा राज्याचा दौरा केला? किती कार्यकर्त्यांना भेटला? सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्यात आणि नेत्यांच्यात कोणताही समन्वय नाही. नेत्यांच्यावर विश्वास ठेवून प्रत्येकाला जबाबदारी वाटून द्यायला हवी. गट-तट असतील तर ते मोडून काढायला हवेत. संपूर्ण संघटनेत विस्कळीतपणा आलेला आहे. खरंतर लोकसभा आणि विधानसभेतील पराभवानंतरच खडबडून जागे होऊन संघटना बांधणीचे काम हाती घेतले असते तर आत्ता होऊन गेलेल्या महापालिका निवडणूकीत काही चांगले परिणाम पाहायला मिळाले असते. स्वतः राजसाहेब जोपर्यंत पूर्ण क्षमतेने active होत नाहीत, पक्ष बांधणीत स्वतःला पूर्णपणे झोकून देत नाहीत, अगदी शेवटच्या कार्यकर्त्यांच्या पर्यंत संपर्क ठेवत नाहीत तो पर्यंत पक्षीय यंत्रणा हलणार नाही. देशातील, राज्यातील जर १०० प्रश्न असतील तर त्यातील ९९ प्रश्नांवर पक्षाची भूमिका काय आहे हेच राजसैनिकांना आणि जनतेला माहिती नसते. आम आदमी पार्टीची महाराष्ट्रात काय ताकत आहे? औषधालाही सापडणार नाही. पण वाहिन्यांच्यावर चर्चेला कायम त्यांचे प्रवक्ते हजर असतात. इतर सर्व पक्षांचे प्रवक्ते देशातील, राज्यातील सर्व छोट्या-मोठ्या प्रश्नांवर आपापल्या पक्षाची भूमिका मांडत असताना मनसैनिक आपला प्रवक्ता शोधत असतो. प्रत्येकवेळी या लोकांना बोलताना राजसाहेबांची परवानगी लागते का? जर लागत असेल तर मग पक्ष वाढणार कसा? स्वतः राजसाहेबही ३-३ महिने मिडियाशी बोलत नाहीत मग सर्वसामान्य सैनिकांनी काय समजायचे?

मराठीच्या मुद्द्याला मर्यादा पडत आहेत. सर्वसमावेशक भूमिका घ्यावी तर मुद्दा सोडला म्हणून परत टीका होणार. नक्की काय भूमिका घ्यावी अशा चक्रव्यूव्हात राजसाहेब असू शकतात. परंतू अशा टीकेची काळजी करण्याची काहीही आवश्यकता नाही. परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे. कोणतीही एखादी भूमिका घेतल्यानंतर आयुष्यभर त्यात बदल न करता तीच ठेवावी असे काही नाही. काळानुसार बदल हे घडत असतात. सर्व राजकीय पक्ष याच प्रोसेस मधून गेले आहेत. प्रत्येक गोष्टीचा एक काळ असतो, त्यावेळी त्या त्या गोष्टीचे महत्त्व असते. काही काळानंतर तीच महत्त्वाची गोष्ट कालबाह्य होते तेंव्हा त्यात बदल करावा लागतो. भाजपाने सुद्धा आपले समान नागरी कायदा, कलम ३७०, राम मंदिर यासारखे मुद्दे बाजूला ठेवले. सुरुवात मराठीच्या मुद्द्यापासून केलेल्या शिवसेनेनेही मराठीच्या मुद्द्याला बगल देऊन हिंदुत्त्वाच्या आडून सर्वांना मिठ्या मारायला सुरुवात केली. सोनियांच्या विदेशीपणाच्या मुद्द्यावर वेगळे झालेल्या पवारसाहेबांनी परत काँग्रेसशीच युती केली. जशी वेळ येईल त्याप्रमाणे बदल करायला हवेत. बदल स्विकारण्याची लवचिकता, मानसिकता हवीच. मोडेन पण वाकणार नाही या बाण्याने मोडून पडू. स्वतःचा पक्ष काढून जे नवनिर्माण घडवायचे आहे, जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र हा रस्त्यावरच्या सत्तेने घडणार नाही. त्यासाठी विधानभवनात सत्ता हवी. सत्ता हातात आली तर तत्त्वांना सुद्धा न्याय देता येतो. काही गोष्टी मनाला पटत नसल्या तरी शेवटी जे खपते तेच विकावे लागते. राजकारणात आक्रमकता हवीच पण त्याबरोबर मुत्सद्दीपणाही हवा. राजकारणाच्या पटलावर जनमताचा कानोसा घेता यायला हवा. लोकांना काय हवे हे ओळखता यायला हवे. त्यामुळे मराठीचा मुद्दा न सोडताही त्या मुद्द्याबरोबरच कट्टर हिंदुत्त्वाचा मुद्दा घेऊन वाटचाल केली तर जनाधार नक्कीच वाढेल. तसेच पक्षाच्या पहिल्याच जाहीर सभेत राज यांनी हिंदुत्त्वाबद्दल भूमिका जाहीर केली होती की हिंदुत्त्व हेच राष्ट्रीयत्त्व असेल तरच मला राष्ट्रीयत्त्व मान्य आहे. त्या भूमिकेशी एकरूप राहून पुढची वाटचाल झाली तर नक्कीच त्याचे चांगले परिणाम पाहायला मिळतील. पक्ष, पक्षाचे नेतृत्त्व आणि पक्षाचे कार्यकर्ते हे मराठीच असलेने तो मुद्दा सुटण्याचा प्रश्नच येत नाही. परंतु सध्याच्या परिस्थिनुसार त्याच्या जोडीला जाज्वल्य कट्टर हिंदुत्त्वाचा मुद्दा घेतला तर पक्षाचा जनाधार नक्कीच वाढेल. राजसाहेबांची सर्वात मोठी चूक हिच झाली की त्यांनी त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील मा. बाळासाहेब ठाकरेंना कधीच वाव दिला नाही. जनतेला त्यांच्यातील बाळासाहेब दिसत होते. पण त्यांना ते कधी दिसले नाहीत की त्यांनी दिसूनही त्याकडे दुर्लक्ष केले काय माहित? एवढी वर्षे काँग्रेसच्या राजवटीत हिंदूंची अवहेलना झाल्यामुळे हिंदू समाज दुखावला गेला होता. नरेंद्र मोदींची प्रतिमा कट्टर हिंदू नेत्यांची असल्याने व त्यांनी विकासाचा मुद्दा उचलल्याने जनतेने त्यांना भरभरून मतदान केले. ही पार्श्वभूमी विसरून चालणार नाही. त्यामुळे राजसाहेबांना आता पूर्ण विचार करून, सद्य राजकीय परिस्थितीचा आढावा घेऊन अंतिम निर्णय घ्यावा लागणार आहे. स्वबळावर सत्ता मिळेल तेंव्हा मिळेल पण तोपर्यंत तरी आपलं कोण परकं कोण याचा निर्णय घ्यावा लागणार आहे. सगळ्यांच्यावर टीका करून सर्वांना एकदम अंगावर घेण्यापेक्षा समविचारी पक्षाशी हातमिळवणी करून आपली ताकत वाढवावी लागेल. राजकारणात सत्ता हेच अंतिम लक्ष्य असते. सत्ता असेल तरच उद्दिष्ट साध्य करता येते. देशातल्या, राज्यातल्या प्रश्नांवर बोललं पाहिजे. त्यासाठी रस्त्यावर उतरलं पाहिजे. प्रश्नांचा शेवट लावला पाहिजे. देशात, राज्यात घडणाऱ्या घटनांच्यावर बारकाईने लक्ष हवे. त्याबाबत पक्षाची भूमिका जनतेला कळायलाच हवी. तुम्हाला काय वाटते यापेक्षा लोकांना काय वाटते हे महत्त्वाचे आहे. हातात घेण्यासारखे अनेक प्रश्न आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कर्जमाफी, दूधाला भाव, काश्मिरातील दगडफेक, राम मंदिर, तरुणांना रोजगार, नोकऱ्या, पिकाला हमीभाव, कायदा-सुव्यवस्था असे अनेक प्रश्न आहेत. कोणत्याही राजकीय पक्षाला राजकारणात यशस्वी व्हायचे असेल तर शेतकरी, कामगार, नोकरदार, व्यावसायिक, विद्यार्थी आणि महिला यांचे प्रश्न हाती घेऊन उभे राहावे लागेल. शेतकऱ्यांचे प्रश्न मुंबईत बसून नाहीत कळणार त्यासाठी त्यांच्या शेताच्या बांधावर जावे लागेल. राजकीय पक्ष काढून तो चालवायचा म्हटले तर कॉर्पोरेट कंपनी काढून चालवल्यासारखे आहे. कंपनी नावारूपाला येण्यासाठी जसे रात्रं-दिवस कष्ट करावे लागतात. जाहिरात करावी लागते, पैसे खर्च करावे लागतात, PRO नेमावे लागतात. जेवढे करेल एवढे कमीच आहे. राज्यात होणारी प्रत्येक निवडणूक तुम्हाला लढवावीच लागेल. स्थानिक स्वराज्य संस्था पासून ते विधानसभा, लोकसभा सर्व निवडणूका ताकतीने लढवाव्या लागतील. कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना जपावे लागेल. गेले ते कावळे, राहिले ते मावळे असे म्हणून चालणार नाही. बेरजेचे राजकारण करावे लागेल. त्यांच्यासाठी कायम उपलब्ध राहावे लागेल. प्रश्न अनेक आहेत. त्याची उत्तरे राजसाहेब कशी शोधतात, त्यावर निर्णय घेऊन ते किती ठाम राहतात आणि अनेक प्रश्नांचा हा चक्रव्यूव्ह ते कसे भेदतात हेच आगामी काळात पाहावे लागेल.

तूर्तास शुभेच्छा.

किशोर बोराटे.

22 comments

 1. २०१९ लक्ष्य ठेवुन साहेबांनी पदाधिकारींवर मतदार संघ विजयासाठी कोटा ठरवुन द्यावा. हे झालचं पाहीजे.. इतके मतदार संघ मनसेचे आलेच पाहीजेत. हे टार्गेट द्यावे.

  1. अगदी बरोबर प्रदीपजी, लक्ष्य ठेवूनच काम करायला हवे. २०१९ ची तयारी आत्तापासूनच सुरू करायला हवी.

 2. साहेब खरच खुप चागला विचार मानड्ला साहेबानि आता मुद्दा बाद्लाला हावा कारण एकच विषय धरुन चालनार नाहि महाराष्ट्र तिल जनता वाट शतीचा प्रशन काधि साहेब घेतात

  1. नक्कीच जाधव साहेब, शेवटी सत्ता असेल तर हवं ते साध्य करता येईल.

 3. उत्तम लेख….खरं तर प्रत्यक्ष साहेबांनीच कुठल्याही वजीरावर जास्त विश्वास न ठेवता प्रत्येक शहरात आणि जिल्ह्यात जाऊन आपण नेमून दिलेल्या काही शिलेदारांनी तिथे काय काम केलंय आणि काय बांधणी केली आहे हे स्वताहा बघावं..आणि याच काही मूठभर लोकांनी पक्ष बांधणी करताना नक्की कोणाला स्थान दिलय,त्यांचं कर्तृत्व काय,पक्षाबरोबर गेली ११ वर्ष ही माणसं खरंच एकनिष्ठ होती किंवा आहेत का,त्यांची समाजात,प्रभागात आणि विभागात काय पत आहे याचा लेखा जोखा घ्यावा!
  त्याचबरोबर खरोखर ज्यांनी गेली ११ वर्ष पक्षासाठी घाम गाळला,प्रसंगी रक्त सांडलं,लाठ्या काठ्या खाल्ल्या,प्रस्थपितांशी लढा दिला,पक्षवाढीसाठी माणसं जोडण्यापासून पैसा टाकण्यापर्यंत सर्व केलं,आंदोलन केली,केसेस घेतल्या त्यांना काय स्थान दिल या स्वार्थी लोकांनी तेही तपासून बघावं!

 4. खुप सुंदर किशोर दादा जोपर्यंत राज ठाकरे ग्रामीण राजकारणात स्वता लक्ष घालत नाहित महाराष्ट्र पिंजून काढत नाहित तोपर्यंत मनसेला भवितव्य नाही शहरी राजकारण दीर्घकाळ टिकणारे नाही हे बाळासाहेबनीं पब वेळीच ओळखून सेना ग्रामीण भागात विस्तारली होती वेळ प्रसंगी अनेक तडजोडी केल्या होत्या
  राजसाहेब बडव्यांच्या गराड्यातून बाहेर पड़ा

  1. मनोज देवधर साहेब आता इथून पुढे चौफेर यश मिळवायचे असेल तर तुम्ही बोलल्याप्रमाणे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात मनसेला लक्ष घालावेच लागेल.

 5. साहेब चक्रव्यूव्ह हा ब्लाँक अतिशय सुंदर पध्दतीने आपण त्यखत आपले विचार मांडले. नि तुम्ही म्हटल्याप्रमाणे राजसाहेबांनी आता समविचारी पक्षांसोबत हात मिळवणी करणे गरजेचे आहे . कारण एका काठीला कोणीही मोडु अथवा वाक ऊ शकतो पण तेच जर का चार पाच काठ्यांची मोळी एकत्र आली तर.मोडणे तर सोडवाच पण वाकवणे हि अशक्य आहे .

 6. स्वतः राजसाहेब जोपर्यंत पूर्ण क्षमतेने active होत नाहीत, पक्ष बांधणीत स्वतःला पूर्णपणे झोकून देत नाहीत, अगदी शेवटच्या कार्यकर्त्यांच्या पर्यंत संपर्क ठेवत नाहीत तो पर्यंत पक्षीय यंत्रणा हलणार नाही.
  हे शक्य झाल तरच पुढच भविष्य ठीक आहे

 7. खरच खुपच उत्तम लेख सादर केलाय
  लक्ष देण्याची गरज आहेच

 8. खरंच वरील सर्व बाबींचा विचार करायलाच हवा! पक्षाचे धोरण ठरायला हवे, तरच पुढे प्रगती साधता येईल. धन्यवाद! बोराडेजी.

 9. खरंच वरील सर्व बाबींचा विचार करायलाच हवा! पक्षाचे धोरण ठरायला हवे, तरच पुढे प्रगती साधता येईल. धन्यवाद! बोराडेजी.

 10. खरंच वरील सर्व बाबींचा विचार करायलाच हवा! पक्षाचे धोरण ठरायला हवे, तरच पुढे प्रगती साधता येईल. धन्यवाद! बोराडेजी.

 11. मी पण सहमत आहे तुमच्या मताशी. अजून पण वाट बघतो आहे. हिंदुत्व मुद्दा आता घेतलाच पाहिजे. आणि मला आशा आहे साहेब लवकरच घेतील.

  1. योगेश तसे त्यांनी करावे अशी अपेक्षा आहे.

 12. चक्रव्यूव्ह हा ब्लाँक खरच सुंदर लिहला आहे . तुम्ही जे म्हणताय ते योग्यच आहे की राज साहेबानी आता समविचारी पक्षाशी हात मिळवणी करणे गरजेचे आहे . कारण ला मोडणे या वाकवण कठीण नसत पण तेच जर चार पाच काठ्याएकत्र असल्यास त्यांना मोडण तर दुरच पण वाकवण हि अशक्य होत ……

आपले मत व्यक्त करा