छावणी बंद, लावणी चालू

barसबका साथ, सबका विकास, अच्छे दिन आयेंगे असे बेंबीच्या देठापासून ओरडत सत्तेवर आलेल्या महायुती सरकारने छावणी बंद करून जनावरांची तर वाट लावलीच आहे पण मुंबईतील छम, छम चालू करून आता जनतेचीही वाट लावायचा चंग बांधलेला दिसतो आहे. आर. आर. आबा गेले. त्यांच्याबरोबर त्यांचे विचारही गेले. आबांच्या मृत्यूनंतर त्यांच्या विचारावर राष्ट्रवादीची भावी आयुष्यात वाटचाल चालू राहील अशा वलग्ना राष्ट्रवादी नेत्यांनी केल्या होत्या त्याही हवेतच विरल्या. कारण सरकारच्या डान्सबार चालू करण्याच्या निर्णयावर राष्ट्रवादीचे नेते मूग गिळून गप्प आहेत. नाही म्हणायला आबांची कन्या म्हणतेय मी विरोध करणार पण तिचा आवाज ऐकणार कोण? विरोधाभास पण बघा कसा आहे समजा हाच निर्णय काँग्रेस आघाडी सरकारने घेतला असता तर हेच आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बेंबीच्या देठापासून ओरडले असते आणि डान्सबार चालू करण्याचा निर्णय कसा चुकीचा आहे आणि याचा जनमानसावर किती वाईट परिणाम होईल हे प्रत्येक चॅनलवर सांगत सुटले असते पण आता ते कोर्टाकडे बोट दाखवत आहेत.bar3
यावर्षी उन्हाळ्याची तीव्रता फेब्रुवारी महिन्यापासूनच चालू झाली असून जनावरांच्या चाऱ्याचा आणि पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. जनावरांचा तर प्रश्न आहेच पण माणसांच्याही पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न आहे. महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यात पाण्याचा खडखडाट आहे. लातूर सारखा जिल्हा फेब्रुवारीपासूनच पाण्यासाठी संघर्ष करतोय.
येत्या कालावधीत पाण्याचा प्रश्न गंभीर स्वरूप धारण करू शकतो. त्याच्याशी कसा सामना करायचा आगामी संकटावर कशी मात करायची? काय उपाययोजना करता येतील? याचा आराखडा बनवून त्यावर प्रत्यक्ष आतापासूनच हालचाली करायचे सोडून त्याबाबत चालढकल करून सरकार पायात घुंगरू बांधून नाचायला आसुसलेले आहे. दुष्काळ हा आपल्या पाचवीलाच पूजलेला आहे. दुष्काळबाबत कायमस्वरूपी उपाययोजना करायचे सोडून प्रत्येक वेळी सर्व राजकीय पक्ष त्याचे राजकीय भांडवल करून एकमेकांना दोष देण्याचेच काम करतात. फेब्रुवारीपासून ते जून-जुलै पर्यंत हाच तमाशा चालतो. पहिला पाऊस पडला की परत सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही शांत. आता फेब्रुवारीत चालू केलेल्या छावण्यापण सरकारने बंद केल्या. सरकारच्या या निर्णयाविरोधात सत्तेत राहून लोकांच्या प्रश्नासाठी झगडतोय असा आव आणणाऱ्या शिवसेनेने तर आवाज उठवलाच नाही. ना विरोधी पक्ष असणाऱ्या काँग्रेस- राष्ट्रवादीने उठवला. शिवसेनेचे युवराज तर रात्रीची मुंबई चालू करण्याच्या बाजूचे आहेत. त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार? सरकारने छावण्या बंद करण्याचा निर्णय घेतला आहे हे राज ठाकरे यांनी सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात संताप व्यक्त केला आणि सरकारला झापले तेंव्हा समजले.bar1
मेक इन इंडिया आणि मेक इन महाराष्ट्रच्या धर्तीवर सरकारने शेतकऱ्यांसाठी असा एखादा मोठा कार्यक्रम घेतला असता तर किमान वाटले तरी असते की सरकार शेतकऱ्यांसाठी काहीतरी करतेय. आज परिस्थिती गंभीर बनली आहे. देशात कोणतेही संकट आले मग तो सुका दुष्काळ असो, ओला दुष्काळ असो नाहीतर भूकंप असो त्यात भरडला जातो तो पहिला शेतकरी. प्रत्येक संकटाची सगळ्यात जास्त किंमत शेतकऱ्यालाच मोजावी लागते. आज पाणी नाही, त्यामुळे शेती नाही, शेती नाही त्यामुळे गुरांना चारा नाही, दूधाला दर नाही आणि त्यात दुष्काळ त्यामुळे शेतकरी आता जनावरांचे हाल नकोत म्हणून जनावरे विकायला काढतोय तर त्याला विकत घ्यायला कोणी तयार नाही. आज पाण्याची बाटलीला २०-२५ रु. किंमत आहे पण दूधाला १७-१८ रुपयालाही कोणी विचारेना. जनावरं खाटकाला द्यावीत तर सरकारने गो-हत्या आणि गो-वंश हत्या बंदी कायदा करून ठेवला आहे. दूधाला दर नाही, शेतकऱ्यांच्या पिकाला दर नाही, शेतीला पाणी नाही, प्यायला पाणी नाही. माणसांचे हाल चालले आहेत, जनावरांचे हाल चाललेत. सुशिक्षित बेरोजगार नोकऱ्या नाहीत म्हणून दुग्धव्यवसाय करून कसातरी स्वतःचे आणि कुटुंबाचे पोट भरतोय तर दुधाला दर नाही. एवढ्या सगळ्या अडचणी असताना त्या कशा सोडवायच्या याचा विचार करून कृती करायचे सोडून सरकारला डान्सबारचे पडलेय.
शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत सरकारची उदासीनता दिसून येते आहे. सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत फक्त बोलतेय पण करत काहीच नाही. देशातील असो अगर महाराष्ट्रातील कोणतीही निवडणूक असो मतदान करणारा सगळ्यात मोठा वर्ग आहे तो शेतकरी. एकूण होणाऱ्या मतदानापैकी शेतकऱ्यांचे मतदान अंदाजे ६०% किंवा त्यापेक्षाही जास्त आहे पण निवडून आल्यावर त्याच सरकारचे शेतकऱ्यांसाठी किती टक्के प्रभावी काम होते हा संशोधनाचा विषय आहे. दुष्काळाच्या समस्येशी आपण दरवर्षी झुंजतोय पण येणाऱ्या दुष्काळाशी लढण्याची पूर्वतयारी आपण करत नाही. शेतीप्रधान देशात आजपर्यंत आपण स्वतंत्र शेती बजट (कृषी बजट) मांडू शकलो नाही हे कुणाचे अपयश आहे? शेतकऱ्यांच्या प्रश्नांविषयी आज कुणालाही सवेंदनशीलता राहिलेली नाही. शेतकरी असाच पिचत आलाय आणि तो असाच दरिद्री पीचत राहणार आहे. असा समज अनेकांनी करून घेतलाय. इतर कोणत्याही क्षेत्रात बघा मग तो नोकरदार वर्ग असेल, व्यापारी वर्ग असेल, शिक्षक असेल सर्वांच्या संघटना असतात. त्यांना संपावर जायचा अधिकार असतो, ते बंद पुकारतात आणि शासन लगेच ताळ्यावर येते. त्यांच्या मागण्या मान्य करते. हे नोकरदार लोकं त्यांच्या संघटनांच्या माध्यमातून अधिवेशनं भरवतात, मंत्र्यांना बोलावतात, त्यांचे सत्कार करतात, आणि आपल्या मागण्या मान्य करून घेतात, संघटनेची मतांची ताकत मागे उभी राहावी म्हणून त्यांच्या मागण्या सरकारकडून मान्य केल्या जातात. त्याचबरोबर नोकरदार वर्गाला ५ वा. ६ वा. ७ वा. असे वेतन आयोग असतात, महागाई भत्ता, घरभाडे, मेडिकल सगळे मिळते. मिळू द्या तो विषय नाही. विषय हा आहे की मग या सगळ्याची गरज शेतकऱ्याला नाही का? त्याचीही काही स्वप्न आहेत त्याच्याही काही महत्त्वकांक्षा आहेत. सरकार तिकडची एवढी काळजी घेते तशी मग इकडचीही घेतली तर काय बिघडेल?


ADVERTISEMENT : BUY BOOKS ONLINE written by DR.MANOHAR SASANE Click Here

Banner_3


       आपल्याला माहित असते की महिनाभर काम केल्यावर आपल्याला पगार नक्की मिळणार आहे. पण शेतकऱ्याचे काय २-३ महिने कष्ट करतो. सोसायटीतून, बँकेतून अथवा पतसंस्थेतून कर्ज काढून शेती करतो आणि एखादे दिवशी अचानक पाऊस येतो किंवा पिकावर रोग पडतो आणि त्याची सगळी मेहनत वाया जाते. अशा वेळी त्या शेतकर्याने काय करायचे? नुकसान भरपाई म्हणून त्याच्या हातावर चवली-पावली ठेवली जाते, त्यातून त्याचा खर्चही निघत नाही. ती चवली-पावली पण सर्व शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहचत नाही. जेवढी काळजी उद्योगधंदे वाचावेत म्हणून घेतली जाते तेवढी काळजी शेतीच्य़ा बाबतीत घेतली जात नाही. तिथे आपल्या संवेदना आणि प्रयत्न दोन्ही कमी पडतात. तर असे व्हायला नको. इतर गोष्टींच्या इतकेच किंबहुना जास्तीत जास्त लक्ष शेती आणि शेतकरी यांच्यावर केंद्रीत करायला हवे. आपला देश शेतीप्रधान आहे, त्याचबरोबर देशातील तसेच राज्यातील बहुसंख्य वर्ग हा शेतीवर अवलंबून आहे, आणि मतदानासाठीही हाच वर्ग सगळ्यात जास्त बाहेर पडतो. त्यामुळे सरकारने विकासाचे धोरण आखताना शेतकर्यांना आणि शेतीला केंद्रस्थानी ठेऊन धोरणं आखायला हवीत. डान्सबारसाठी जेवढा उत्साह आहे, त्यापेक्षा जास्त उत्साह शेती, शेतकरी आणि जनावरांच्यासाठी दाखवला तर राज्यातील हा बहुसंख्य वर्ग निश्चित सुखी होईल.
किशोर बोराटे.

आपले मत व्यक्त करा