शक्तीशाली नेता

तिसरा डोळा भाग – ५१

शक्तिशाली नेता- नरेंद्र मोदी

भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी साहेबांचा आज वाढदिवस आहे. एका साध्या सर्वसामान्य कुटुंबातून येऊन पंतप्रधान झालेल्या या व्यक्तिमत्त्वाचा प्रवास हा अतिशय थक्क करणारा आहे. नरेंद्र मोदी यांचा उल्लेख एका वाक्यात करायचा म्हटले तर मी एक ध्येयवेडा मनुष्य असाच करेन. नरेंद्र दामोदरदास मोदी यांचा जन्म १७ सप्टेंबर १९५० रोजी गुजरात मधील एका खेडेगावात झाला. वडिलांचे नाव दामोदरदास मूळचंद मोदी तर आईचे नाव हिराबेन असे आहे. सहा अपत्यांपैकी नरेंद्र हे ३ रे अपत्य. मोदींनी लहान वयात आपल्या वडिलांच्या व भावाच्या समवेत चहाचे दुकान चालवले. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्णवेळ प्रचारक बनले. १९९१ मध्ये कन्याकुमारी-श्रीनगर एकता यात्रेपासून त्यांचा राजकारणात उदय झाला. १९९५ मध्ये भाजपचे राष्ट्रीय सचिव म्हणून त्यांनी ५ राज्यांची जबाबदारी सांभाळली. तद्नंतर २००१ ते २००२ व नंतर २००२ ते २००७ तसेच २००७ ते २०१२ या काळात ते गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर सप्टेंबर २०१३ मध्ये पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून भाजपा तर्फे त्यांच्या नावाची घोषणा झाली. मोदींचा जीवनप्रवास हा तसा अतिशय थरारक तसाच धक्कादायक आहे. भाजपाच्या कार्यालयात सचिव म्हणून काम करणारे नरेंद्र मोदी हे एक सर्वसामान्य कार्यकर्ते होते. भाजपा कार्यालयात ते सचिव म्हणून जरी होते तरी तिथे ते जे काम समोर येईल ते करायचे. कधी वाजपेयी, आडवाणी, मुरली मनोहर जोशी यांच्यासारखे जेष्ठ आणि मोठे नेते कार्यालयात येणार असतील तर सर्व ऑफिस स्वच्छ ठेवणे. टेबल, खुर्च्या व्यवस्थित लावून ठेवणे. टेबलवर पाण्याचा तांब्या भरून ठेवणे असली कामं त्यांनी सुरुवातीला केली आहेत.

भाजपा कार्यालयात त्यांची नियुक्ती असल्याने अनेक मोठ्या नेत्यांचा त्यांना सहवास लाभला. त्यांची कार्यपद्धती त्यांना जवळून पाहता आली. गुजरातमध्ये उसळलेल्या दंगलीनंतर तिथे मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली चालू झाल्या आणि अचानकपणे मोदी यांच्यावर ती जबाबदारी येऊन पडली. गुजरात दंगलीत गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम करत असताना त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रचंड टीका झाली. पण त्याच दंगलीने आणि त्यातील त्यांच्या भूमिकेने नरेंद्र मोदींना एक मोठा सशक्त हिंदू नेता अशी ओळख मिळवून दिली. तिथून पुढे त्यांचे आयुष्यच बदलून गेले. गुजरातच्या दंगलीचा त्यांना तसा खूप त्रास झाला. अनेक आरोप-प्रत्यारोप झाले. पंतप्रधान असलेल्या वाजपेयी यांनी त्यांना गुजरातमध्ये येऊन आपला राजधर्म योग्य पद्धतीने निभावण्याची तंबी दिली. त्यानंतर केंद्रात सत्तेत आलेल्या काँग्रेसने सीबीआय सह अनेक संस्थांच्या मार्फत त्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावला. सोनिया गांधींनी त्यांना मौत का सौदागर अशी उपाधी लावून मोदींच्यावर जळजळीत टीका केली. पण मोदी या सर्वांना पुरून उरले. एक एक संकट तुडवत विरोधकांच्यावर कुरघोडी करत ते पंतप्रधान पदापर्यंत पोहोचले. गुजरातचे मुख्यमंत्री ते भारताचे पंतप्रधान हा प्रवासही तसा सोपा नव्हता. पण संघाचा वरदहस्त लाभलेल्या मोदींनी लालकृष्ण आडवाणी यांच्यासारख्या मोठ्या नेत्याला बाजूला करून पंतप्रधान पद मिळवले. एवढ्या मोठ्या देशाचे पंतप्रधान पद मिळवणे ही सोपी गोष्ट निश्चितच नाही. आयुष्यभर ज्यांनी पंतप्रधान होण्याचे स्वप्न पाहिले. तरीही त्यांना होता आले नाही. पण नरेंद्र मोदी हे नाव कुणाच्या ध्यानी-मनी नसताना अचानकपणे पुढे आले आणि ते पंतप्रधान झाले. २०१४ ची निवडणूक ही तशी नरेंद्र मोदी विरुद्ध सर्व विरोधक अशीच झाली आणि ती त्यांनी स्वकर्तृत्त्वावर जिंकली. त्यानंतर आपला उजवा हात समजल्या जाणाऱ्या अमित शहा यांना भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष करून नरेंद्र मोदी यांनी पक्ष संघटनेवर पूर्णपणे आपला ताबा मिळवला.

मोदींची पंतप्रधानपदाची इनिंग पण आपल्या धडाकेबाज निर्णयाने गाजते आहे. नोटबंदी, जीएसटी, सर्जिकल स्ट्राईक सारखे निर्णय त्यांनी अत्यंत धाडसीपणाने घेतले. त्याचबरोबर तीन तलाक असेल किंवा हलाला सारखे निर्णय असतील ते अत्यंत मुत्सद्देगिरी दाखवून कोर्टाच्या माध्यमातून घेतले. सत्तेत आल्यापासून परराष्ट्र धोरण मजबूत करण्यावर भर दिला. प्रचंड प्रशासकीय अनुभव आणि प्रशासनावर वचक असलेला हा नेता थेट जनतेत मिसळून त्यांच्याशी संवाद साधत जनमताचा कानोसा घेत सर्वसामान्य लोकांना रुचेल असे निर्णय घेत आहे. नरेंद्र मोदींचे चाहते जेवढे आहेत, तेवढेच त्यांना विरोधक पण आहेत. त्यांच्या एवढी टीका भारतात क्वचितच इतर कोणत्या नेत्याने झेलली असेल. मोदींच्या कार्यपद्धती बाबत दुमत होऊ शकते. पण त्यांची जिद्द, चिकाटी, सातत्य, संयम, कष्ट करण्याची वृत्ती, आत्मविश्वास, सकारात्मक विचारसरणी, अभ्यासू वृत्ती आणि धडाकेबाज निर्णय घेण्याची क्षमता याबाबत विरोधकही मोदींना मान देतात. त्यांच्या या गुणांची दखल न घेणे हा कपाळकरंटेपणा ठरेल. जे मनात येईल ते कृतीत उतरवण्याची क्षमता या नेत्याकडे आहे. पंतप्रधानपदाची चौकट मोडून ते नेहमी विचार करतात. मग ते बेटी बचाओ अभियान असेल किंवा स्वच्छ भारत अभियान असेल, नाहीतर योग दिवस असेल त्यांनी नेहमी सर्वसामान्यांना रुचतील, फायदेशीर होतील असे निर्णय घेतले. अर्थातच त्यांच्या अशा काही निर्णयावर विरोधी पक्षांच्याकडून टीकाही झाली. पण जनतेने हे निर्णय उचलून धरले. तसेच योगाला तर जगात प्रसिद्धी मिळाली. जागतिक योग दिवस मोदी यांच्या प्रयत्नाने चालू झाला. अनेक गोष्टी आहेत ज्या त्यांनी गेल्या ४ वर्षात केल्या. काही निर्णयांचे कौतुक झाले, तर काही निर्णयावर टीका ही झाली. पण त्याची त्यांनी कधी तमा बाळगली नाही. माझी बांधिलकी जनतेशी अशा वृत्तीने ते सतत काम करताहेत. जो काम करतो तो चुकतो. गेल्या ४ वर्षातील लेखाजोखा मांडण्याची वेळ आता आली आहे. २०१९ ला लोकसभा निवडणूक आहे. त्याचा जो काही निकाल लागायचा तो लागेल. पण या चार वर्षातील मोदींच्या कामाचा उरक चांगला आहे हे मान्य करावेच लागेल.
भारतीय संस्कृती ही सर्वांना सामावून घेणारी आहे. वेळप्रसंगी राजकीय मतभेद बाजूला ठेवून एकत्र यायची भारतीय राजकारणाची रीत आहे. नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत आणि त्यांचा, त्यांच्या पदाचा मान राखणे हे आपले कर्तव्य आहे. त्यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच त्यांच्या नेतृत्त्वाखाली देशाची भरभराट होवो. परमेश्वराने त्यांना उदंड निरोगी आयुष्य प्रदान करावे हीच परमेश्वर चरणी प्रार्थना. धन्यवाद, जयहिंद

-किशोर बोराटे

3 comments

आपले मत व्यक्त करा