तिसरा डोळा भाग- ३२

unnamed.jpg*तिसरा डोळा भाग- ३२*

परवा काश्मिरमध्ये दगडफेक करून पळून जाणारा एक तरुण सैन्याच्या गाडीखाली सापडून ठार झाला. त्याच्या कुटुंबियांच्या सांत्वनासाठी काही फुटीरतावादी नेते त्याच्या घरी गेले. त्या तरुणाच्या मृत्यूचे भांडवल करून काश्मिरात अजून आग भडकवण्याचा डाव फुटीरतावाद्यांच्याच अंगलट आला. संबंधित तरुणाच्या कुटुंबीयांनी त्याच्या मृत्यूसाठी फुटीरतावाद्यांनाच जबाबदार धरले. सांत्वनासाठी म्हणून आलेल्या फुटीरतावादी नेत्यांना संबंधित तरुणाच्या कुटुंबीयांनी खूप काही ऐकवले. तुमच्यामुळेच काश्मिरात शांतता नांदत नाही. तुमची मुलं सुरक्षित ठेवून तुम्ही आमच्या मुलांच्या हातात दगड देता. शब्बीर शहा यांच्या मुलीने CBSC बोर्डातून शिक्षण घेतले. पण तुम्ही मात्र आमच्या मुलांना शाळेत घालून देत नाही हे असे किती दिवस चालणार? हे असे नेतृत्त्व असते का? गिलानी यांची मुलेही अमेरिकेत शिक्षण घेताहेत.

जे घडलं ते एक प्रकारे चांगलेच घडले. आतातरी काश्मीरीचें डोळे उघडतील अशी अपेक्षा आहे. फुटीरतावादी नेत्यांचे सगळे लागेबांधे हे पाकिस्तानशी आहेत हे आता लपून राहिलेले नाही. यासिन मलिक खुलेआम हाफिज सईद बरोबर पाकिस्तानात फिरत असतो. दोघांचे फोटोही प्रसिद्ध झालेले आहेत. हिंदुस्थान बाबत काश्मिरींच्या मनात सातत्याने द्वेष निर्माण करण्याचे काम फुटीरतावादी नेते करत आलेले आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळातील काश्मिरींना काश्मिरचा इतिहास माहिती आहे. ती पिढी आता किती राहिली आहे? त्यानंतर आलेल्या पिढीच्या मनावर हिंदुस्थान हा आपला शत्रू आहे आणि त्यांनी बेकायदेशीरपणे सैन्याच्या जोरावर काश्मिरवर कब्जा केला आहे हेच बिंबवण्यात आले. त्यामुळे आत्ता जी पिढी मावळतीकडे झुकली आहे आणि जी उगवते आहे. काहीजण तर अंड्यातून बाहेर पडताहेत त्यांच्या मनात हिंदुस्थान विषयी द्वेषच आढळून येतोय. ते हिंदुस्थानला शत्रू मानून पाकिस्तानला जर आपला हितचिंतक मित्र मानत असतील तर मग काश्मीरचे पुढचे भविष्य सांगायला ज्योतिषाची गरज आहे काय?

काश्मिर बाबत विचार करायचा तर आपणाला प्रथम हे लक्षात घ्यायला हवे की पाकिस्तानपेक्षाही मोठा धोका आपल्याला फुटीरतावादी नेत्यांच्याकडून आहे. हेच ते काश्मिरातले हिरवे नाग आहेत जे तिथं विष ओकत आहेत. यांच्या जीवावरच तर पाकिस्तान काश्मीरमध्ये रक्ताची होळी खेळत आहे. स्थानिकांच्या मदतीशिवाय एवढी वर्षे काश्मिरात दहशतवाद तग धरूच शकत नाही. दहशतवादाविरुद्धच्या कारवाईत तेथील जनता अडथळे आणते सैन्याला अडवून धरते आणि अतिरेक्यांना लपवते. या फुटीरतावादी नेत्यांनी आझाद काश्मीरच्या नावाखाली पाकिस्तानसह मिळेल तिथून पैसा घेऊन स्वतःच्या तुंबड्या भरल्या. मध्यंतरी NIA ने या फुटीरतावादी नेत्यांच्या घरावर धाडी टाकून शब्बीर शहा सह अनेकांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता डोळे फिरतील एवढी यांची मालमत्ता असल्याचे चौकशीत आढळून आले. एकट्या शब्बीर शहाची मालमत्ता २०० कोटींच्या पुढे आहे. एवढी संपत्ती जमवली, काय यांचे व्यवसाय आहेत? काय उद्योगधंदे आहेत? काश्मिरात दहशतवादाच्या छायेखाली साधी चहाची टपरी चालवणे मुश्किल आहे मग यांनी कोणत्या व्यवसायातून एवढा अमाप पैसा कमावला? हे सगळे करोडपती, अरबपती झाले. पण काश्मिरी माणूस फक्त पती आणि रोडपतीच झालाय. त्यांना खायचे वांदे आहेत. ५००/- ₹ मिळताहेत म्हणून तिथले मुलं-मुली शिक्षण घेत घेत सैन्याला दगडी मारण्याचा पार्ट-टाईम जॉब करताहेत. खरंतर या फुटीरतावाद्यांच्या मागे NIA ची चौकशी लावून मोदींनी एक चांगले काम केले होते. पण ती मधेच का थांबली कळले नाही? सर्वसामान्य काश्मिरी जनतेला फुटीरतावाद्यांच्या पासून तोडणे आणि फुटीरतावाद्यांना एकटे पाडणे हे मोदी सरकार समोरील सर्वात मोठे आव्हान आहे. फक्त मोदी सरकारच असे नाही तर सर्व राजकीय पक्षांचेच ते ध्येय असायला हवे. पण फुटीरतावाद्यांना जावई असल्याप्रमाणे ज्या काँग्रेसने वागवले आणि मोदी सरकार पाडण्यासाठी जे काँग्रेस नेते पाकिस्तानला साकडे घालतात ती काँग्रेस या चांगल्या कामाला सहकार्य करेल याची शाश्वती कोण देणार? मध्यंतरी काश्मिर प्रश्नासंदर्भात हुर्रीयतसह इतर विविध गटांशी व तेथील राज्य सरकारशी चर्चा करण्यासाठी मोदी सरकारने दिनेश शर्मा यांनी नियुक्ती केली होती. पण त्याबाबत परत फारसे काही ऐकायला किंवा वाचायला मिळाले नाही. चर्चा चालू झाली की नाही याबाबत काही माहिती उपलब्ध नाही.

media-20160825 (1)
click on image to buy

काश्मिरला हिंदुस्थान पासून वेगळे करणे हेच हुर्रीयतचे ध्येय आहे. त्यांना पाकिस्तान खतपाणी घालत आहे. पाकिस्तानने जरी आझाद काश्मिरचा नारा दिला असला तरी त्यांच्या मनात काश्मिरवर कब्जा करण्याचा इरादा आहे. पाकिस्तान याच हुर्रीयत (फुटीरतावादी) नेत्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपल्यावर गोळ्या झाडत आहे. काश्मिर मध्ये जी आत्तापर्यंत रक्ताची होळी खेळली जात आहे ती याच फुटीरतावादी नेत्यांच्या मदतीने खेळली जातेय. आत्तापर्यंतच्या काश्मिरच्या संघर्षात तेथील काश्मिरी पंडित मारले गेले, अनेक जवान मारले गेले. पण एकही फुटीरतावादी नेता अगर त्याच्या कुटुंबातील कोणी व्यक्ती मारली गेली नाही हा निव्वळ योगायोग नाही. काश्मिरी जनतेची फुटीरतावादी नेत्यांच्याकडून दिशाभूल केली जातेय. याबाबत तेथील जनतेला जागृत करणे हे भारतीय नेत्यांचे काम आहे. त्यामाध्यमातून भाजपाने पीडीपी बरोबर युती करून सत्तेत सहभागी होण्याचा घेतलेला निर्णय मला तरी सकारात्मक वाटतो. कारण त्यामाध्यमातून केंद्र सरकारचा थेट हस्तक्षेप काश्मिरमध्ये होतोय ही चांगली बाब आहे. त्याचबरोबर भाजपा जर सरकारमध्ये सहभागी झाला नसता तर कदाचित पीडीपी आणि नॅशनल कॉन्फरन्स या दोन काश्मिरी पक्षांची युती झाली असती आणि हे दोन्ही पक्ष पाकिस्तानच्या आणि फुटीरतावाद्यांच्या हातचे बाहुले आहेत. राज्य सरकारमध्ये भाजपा असल्याने तेथील निर्णयप्रक्रियेत थेट त्यांचा सहभाग होत आहे. काही झाले तरी मेहबूबाला मनमानी करता येणार नाही. त्याचबरोबर आत्ता काश्मिरात जेवढे फुटीरतावाद्यांचे नुकसान होईल, अतिरेकी मारले जातील त्याला फुटीरतावाद्यांच्याकडून मुख्यमंत्री मेहबूबाला जबाबदार धरले जाईल. त्यामुळे नाही म्हटले तरी त्यांच्या नजरेत पीडीपीची इमेज डाऊन होईल.

तसेही दहशतवादाविरुद्धच्या लढाईत तेथिल सरकारची आत्तापर्यंत फारशी मदत होत नव्हती. कारण तेथील प्रशासनात व पोलिस दलात जे अधिकारी, कर्मचारी आहेत त्यात बरेचसे हुर्रीयत नेत्यांची मुले, सूना आणि इतर नातेवाईक आहेत तर काही त्यांच्याशी संबंधित आहेत. पण आता तेथील सत्तेत भाजपाचा सहभाग असल्याने त्यांच्या दबावापोटी का होईना इच्छा नसतानाही राज्य पोलिस दलाला दहशतवाद्यांच्या विरोधातील कारवाईत सैन्याच्या बरोबरीने भाग घ्यावा लागत आहे. तरीही जोपर्यंत तेथील जनतेचे मतपरिवर्तन होत नाही तोपर्यंत काश्मिरची समस्या सुटणे अवघड आहे. केवळ सैन्याच्या बळावर हा प्रश्न सुटणार नाही. फारतर आपण दबाव ठेवू शकतो. दुसरा पर्याय म्हणजे जे परवेज मुशर्रफ यांनी बलुचिस्तान मध्ये केले ते मोदींनी काश्मिरात करावे. या फुटीरतावादी नेत्यांनाच उडवले तर बराचसा त्रास कमी होईल. कारण काश्मिर प्रश्न सुटण्यात हे हिरवे नागच जास्त अडथळे आणत आहेत. धोका पाकिस्तानकडून जास्त नाही. धोका यांच्याकडूनच जास्त आहे. यांनाच ठेचावे लागेल. पाहू या मोदी आता काय भूमिका घेतात? जयहिंद

किशोर बोराटे.

आपले मत व्यक्त करा